रुजवू उद्यमशीलता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

women entrepreneur women day 2023 business

कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान कौतुकास्पद

रुजवू उद्यमशीलता

डाॅ. जयश्री फडणवीस

प्रत्येक महिलेला राणीसारखा जगण्याचा हक्क आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य आणि कर्तृत्व या बळावर ती ते नक्कीच मिळवू शकते. आणि हे सर्व साध्य करण्याचा एक पर्याय म्हणजे महिला उद्योजिका बनणे, स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे.

कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान कौतुकास्पद आहे. नवनवीन क्षेत्रांत महिलांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधे उच्चपदस्थ महिला आहेत.

अपेक्षा हीच आहे, की यातूनच एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाज निर्माण होत राहील; पण अनेक ठिकाणी एक वेगळेच चित्रही पाहायला मिळत आहे. उच्चशिक्षण, मग उच्चपदस्थ नोकरी हे सर्व टिकवून ठेवताना अनेक महिलांना त्यांचे सर्वांगीण आयुष्य जगणे,

घरदार, मुलेबाळे या सर्वांमध्ये समतोल साधणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. लग्नाचे लांबत चाललेले वय आणि त्याचा पुढील परिणाम म्हणजे, आता इतके वय झाल्यावर मातृत्वाची जबाबदारी घ्यायची, की आपलेच आयुष्य आनंदाने जगायचे, अशाही विचारांचे वारे वाहताना जाणवतात.

खरे म्हणजे स्त्रीमध्ये सृजनता, स्नेह, शिस्त आणि एकाच वेळी अनेक कामे भराभर उरकण्याची क्षमता आहे. एकाच वेळी अनेक भूमिका ती आनंदाने पार पाडत असते. हेच सर्व गुण तिला एक यशस्वी उद्योजिका होण्यास मदत करणार आहेत.

स्वतःची कारकीर्द घडविताना प्रथम काही वर्षे आपल्या आवडत्या क्षेत्रात नोकरी करून त्या क्षेत्रातील बारकावे समजून घ्या. त्यातूनच पुढे महिला उद्योजिका बनण्यास सुरवात करा. जेणेकरून हळूहळू प्रत्येक कामाचे नियंत्रण व संतुलन स्वतःच्याच आयुष्यात राहील. स्वतःला, आपल्या घरादाराला काही कारणाने सुट्टी हवी असल्यास हक्काने थोडे थांबता येईल आणि प्रत्येक कर्तव्य वेळेत पार पाडल्याने एक वेगळेच समाधान प्राप्त होईल.

चला तर मग, महिला उद्योजिका होण्याच्या पूर्वतयारीला लागा!

कोणताही व्यवसाय करण्यासाठी खूप सारे कष्ट, अनेक गोष्टींचे समर्पण; तसेच आपल्या व्यवसायास आवश्यक असणाऱ्या प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करण्याची तयारी ठेवावी लागेल. आपण कोणत्या क्षेत्रात निपुण आहोत, आपल्याला कशाची आवड आहे व ज्याचा थोडाबहुत अनुभव पण आपल्याला आहे असे क्षेत्र शोधा, निवडा. त्यात व्यवसाय सुरू करा. जेणेकरून प्रत्येक क्षण मनापासून जगता येइल.

निवडलेल्या व्यवसायाचा मार्केट रिसर्च करा. किती स्पर्धक आहेत, ते कोणत्या स्तरावर काम करतात याची माहिती घ्या. आपल्या मालाला किती मागणी असेल, आपला ग्राहक कोण, बाजारभाव काय, नफातोट्याचा अंदाज आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विक्रीचे नियोजन.

व्यवसाय योजना (Business Plan) बनवा. ज्यातून तुम्हाला येत्या पाच वर्षांत आपल्या व्यवसायास काय हवे, त्याची ध्येये आणि उ‌द्दिष्टे लिहिता येतील, ती साध्य करण्याचा मार्ग मिळेल.

त्यानंतर येतो तो व्यवसाय निधी (funding). अनेक मार्गांनी हा निधी जमवता येतो. उदा. बँक कर्ज, अनुदाने, अनेक गुंतवणूकदार; तसेच राज्य सरकारच्या महिला व्यवसाय योजना.

ठरविलेल्या व्यवसायाची कायदेशीर नोंदणी करा. कोणते कर भरणे आवश्यक आहेत ते बघा. याकरिता एखाद्या सीए अथवा कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. आपल्या व्यवसायास लागणाऱ्या प्रत्येक विषयातील तज्ज्ञाचा सल्ला नक्कीच घ्या. तिथे पैसा वाचविणे नुकसानीचे ठरेल.

आपल्या कंपनीचा ब्रँड तयार झाला पाहिजे. त्यासाठी उत्तम लोगो, वेबसाइट, सोशल मीडिया प्रेझेन्स आणि मार्केटिंग मटेरिअल या सर्वांचा विकास भरपूर वेळ देऊन विचारपूर्वक करावा लागेल. कारण हे सर्व एकदाच करावे लागते; पण सतत त्याला अपग्रेड करावे लागते. सातत्य महत्त्वाचे.

वरील सर्व उद्योजिका होण्याच्या पायऱ्या चढल्या, की नियोजनपूर्वक अपल्या व्यवसायाचा शुभारंभ करा. ग्राहकांशी उत्तम संवाद ठेवून व्यवसायाचा पाया भक्कम करा. छोट्या प्रमाणात सुरू केलेला व्यवसाय हा प्रामाणिकपणा, उत्तम व्यवस्थापनकौशल्य आणि कष्ट यांच्या संयोगातून निश्चितच गगनभरारी घेईल! Hey Womania! Turn your dreams into reality.