
Womens Day Special: अदितीने दाखवला दुष्काळग्रस्त परिस्थितीशी दोन हात करण्याचा लातूर पॅटर्न!
मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया...हे स्टेटस आहे अदिती पाटील यांच. या स्टेटस प्रमाणेच त्यांनी एकटीनेच एका चांगल्या कामाची सुरूवात केली आणि हळूहळू लोकही त्यात सामिल होत गेले. आणि साकार झालं ‘कारवाँ फाऊंडेशन’ च स्वप्न.
लातूर जिल्ह्यातील उदगीर या गावी सुमारे सहा वर्षांआधी प्रचंड दुष्काळ पडला होता. अनेक गावं ओस पडली होती. लोक पाण्याविना तडफडत होते. त्यातच एक गाव होतं उदगीर. त्याच गावची कन्या अदिती गावी आली. आणि तिने गावातील लोक पाण्याविना कसे जगत आहेत हे पाहिले तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचे तिने ठरवले.
अदितीने 2018 मध्ये सीडबॉल मोहीम सुरू केली. सहा वर्षांच्या प्रवासात तिने आपल्या 'कॅराव्हा' या संस्थेचे भक्कम नेतृत्व केले आहे. आणि आपल्या सहकाऱ्यांसह दोन मिनी जंगलेही वाढवली आहेत. या जंगलात 1200 हून अधिक झाडे आहेत.
त्याच वेळी, लातूर जिल्ह्यातील 150 हून अधिक शाळांमध्ये, तिने 15,000 हून अधिक मुलांना सीडबॉल मोहिमेशी जोडले आहे. जेणेकरून हिरवळीचा कारवा सतत आपल्या पृथ्वीवर सुरू राहील. अदितीने सांगितले की, तिने पर्यावरणासाठी काम करणाऱ्या लोकांचे सहकार्य घेतले.
अदितीने लातूर उदगीरला दुष्काळापासून वाचवण्यासाठी 2018 मध्ये ‘कारवां फाऊंडेशन’ची स्थापना केली. ती सांगते की, मराठवाड्यातील हा जिल्हा नैसर्गिक आपत्तींना अत्यंत संवेदनशील आहे. येथे वनक्षेत्र केवळ एक टक्का आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे योग्य व्यवस्थापन नसणे ही लातूरची मोठी समस्या म्हणून समोर आली आहे.
अदिती म्हणाली, “जलसंकट दूर व्हावे म्हणून आम्हाला झाडे वाचवणे गरजेचे होते. आम्ही पावसाळ्यात वृक्षारोपण मोहीम राबवताना पाहतो. आपणही अशी मोहीम राबवू शकतो. पण ते खर्चिक ठरू शकते. त्यावेळी सीडबॉलचा पर्याय आमच्यासमोर होता. याबद्दल आपण यापूर्वीही वाचले होते. आम्हाला हिरवळ वाचवण्याचा आणि वाढवण्याचा हा एक सुरक्षित आणि स्वस्त मार्ग वाटला.
सीडबॉल हे जपानी शास्त्रज्ञ मासानोबू फुकुओका यांनी दिलेले जपानी तंत्रज्ञान आहे. यामध्ये भाजीपाला आणि फळांच्या बिया एकत्र करून माती आणि शेणाचा गोळा तयार केला जातो. त्यानंतर हा गोळा जमिनीवर, डोंगराळ भागात टाकला जातो. जिथे ते झाड रूजते आणि जन्म घेते.

मुलांना सीडबॉलचं प्रशिक्षण देताना अदिती

अदिती सांगते की एक सीडबॉल तयार करण्यासाठी दोन भाग माती आणि एक भाग कंपोस्ट घेतला जातो. नंतर त्यामध्ये बिया टाकल्या जातात आणि पाणी घातल्यानंतर त्याचा आकार बॉल होतो. त्यानंतर दोन दिवस उन्हात वाळवले जाते. सुकल्यानंतर तो अशा ठिकाणी टाकला जातो जिथे आपल्याला हिरवळ बनवायची असते.
पाऊस पडताच हा सीडबॉल भिजतो आणि त्यातील बियांना पाणी मिळाले की त्यातून छोटी रोपटी जन्म घेतात. सीडबॉल्सची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बियाणे त्याच्या आत सुरक्षित असतात. पक्षी इत्यादी ते खाऊ शकत नाहीत, ज्यामुळे बीज वाढण्यास आणि पृथ्वी हिरवीगार होण्यास मदत होते.

सीडबॉल्स बनवताना अदिती
उदगीरमध्ये राहणाऱ्या अदितीने कायद्याचे शिक्षण घेतले आहे. मात्र तिचा भर पर्यावरण वाचवण्यावर अधिक आहे. ती, तिच्या मित्रांसोबत मुलांना खेळकर पद्धतीने सीडबॉल कसे बनवायचे ते शिकवते. या मोहिमेशी मुलांना जोडण्यामागचा उद्देश हा आहे की, मुलांना त्यांच्या पर्यावरणाची सुरुवातीपासूनच जाणीव असावी.
कोरोना महामारीच्या काळात शाळा दोन वर्षांपासून बंद असताना आणि त्यांचा मुलांशी थेट संपर्क होत नसताना त्यांनी लोकांना सीडबॉल्सची ऑनलाइन जाणीव करून दिली. सीडबॉल ऑनलाइन कसे बनवायचे ते शिकवले. सीडबॉल मोहिमेची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी त्यांच्या संस्थेने ७२५ किलोमीटरहून अधिक सायकल रॅलीही आयोजित केली होती.
अदितीचा हा प्रवास थक्क करणारा आहे. तिने लोकांना निसर्गाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना ते जतन करण्यास भाग पाडले. झाडे लावली ती जगवली तरच आपला जिल्हा दुष्काळापासून वाचू शकेल हे तिने लोकांच्या मनात रूजवले. तिच्या कार्याला आमचा सलाम!