International Women's Day : विश्‍वाला प्रतिष्ठित करणारी स्त्री..

स्त्री प्रतिष्ठा म्हणजे स्त्रीचा स्वतःबद्दलचा आत्मविश्‍वास, स्त्री प्रतिष्ठा म्हणजे समाजासाठी किंवा एकूणच निसर्गासाठी स्त्रीच्या अस्तित्वाला असलेले महत्त्व. तेव्हा स्त्री प्रतिष्ठा हा विषय कोणावरही अवलंबून नाही.
women in philosophy you should know international women day
women in philosophy you should know international women daySakal

स्त्री प्रतिष्ठा म्हणजे स्त्रीचा स्वतःबद्दलचा आत्मविश्‍वास, स्त्री प्रतिष्ठा म्हणजे समाजासाठी किंवा एकूणच निसर्गासाठी स्त्रीच्या अस्तित्वाला असलेले महत्त्व. तेव्हा स्त्री प्रतिष्ठा हा विषय कोणावरही अवलंबून नाही.

गृहलक्ष्मी ही उपाधी असणारी स्त्री प्रतिष्ठित असायलाच हवी. स्त्री ही फक्त स्वतःच्या घराचा आधार असते असे नाही, तर संपूर्ण भावी पिढी, संपूर्ण समाज हासुद्धा स्त्रीच्या ठिकाणीच प्रतिष्ठित असतो, स्त्रीवरच अवलंबून असतो.

आयुर्वेदात स्त्रीचे महत्त्व या शब्दात सांगितले आहे, ''स्त्री ही रक्षति रक्षिता.....अष्टांग संग्र'' स्त्रीला प्रयत्नपूर्वक जपले, तिचे रक्षण केले तर ती संपूर्ण समाजाचे रक्षण करू शकते. अर्थात या ठिकाणी स्त्रीला जपणे यामागे स्त्रीने स्वतःचे स्त्रीत्व जपणे, स्त्रीविशिष्ट अवयवांच्या आरोग्यासाठी तत्पर राहणे, शारीरिक-मानसिक-भावनिक स्तरावर संतुलित राहण्यासाठी प्रयत्न करणे या सर्व गोष्टी अपेक्षित आहेत.

म्हणूनच स्त्रीआरोग्य या विषयाला आयुर्वेदशास्त्राच्या अष्टांगामध्ये वेगळे व विशेष स्थान आहे. स्त्रीची विशिष्ट शरीररचना, गर्भाशयादी अवयव, मासिक पाळी वगैरेच्या अनुषंगाने ती पुरुषांपेक्षा खूपच वेगळी असते.

संपूर्ण आरोग्यासाठी जबाबदार असणारा शरीरातील अग्नी, जो शरीरातील हॉर्मोनल संस्थेशी जोडलेला आहे, तो स्त्रियांच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतो, त्यामुळे स्त्रियांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्‍यक असते.

स्त्री-पुरुषांचे दोघांचेही आरोग्य खालावलेले आहे असे चित्र गेल्या चाळीस वर्षांत दिसू लागले आहे. परंतु यातही स्त्रीच्या आरोग्याला अधिक महत्त्व आहे कारण ती ज्या अपत्यांना जन्म देणार त्यांना कुठल्याही प्रकारचा रोग वा व्यंग उत्पन्न झाले तर हलके हलके सर्व समाजाचाच ऱ्हास होत जातो.

या दृष्टीने स्त्री प्रतिष्ठेला अधिक महत्त्व द्यायला पाहिजे अर्थातच स्त्रीनेच स्वतःच्या आरोग्याला खूप महत्त्व द्यायला पाहिजे.सध्या स्त्रियांच्या हॉर्मोनल संस्थेमध्ये बरेच बिघाड झालेले दिसतात. गर्भधारणेसाठी आवश्‍यक असलेले गर्भाशय किंवा तत्संबधी अवयवात सूज येणे, गाठ येणे, नलिका अवरोधित होणे,

अशा प्रकारच्या तक्रारी खूप प्रमाणात वाढलेल्या दिसतात. या रोगांचे जोपर्यंत उच्चाटन होत नाही तोपर्यंत स्त्री प्रतिष्ठा वाढविण्याची आवश्‍यकता आहे असे म्हणावे लागेल. दुसऱ्या कोणी यासाठी प्रयत्न करायचे नसून तिने स्वतःची प्रतिष्ठा स्वतःच वाढवायची आहे. शिक्षणामुळे, कष्ट करण्याच्या प्रवृत्तीमुळे,

सृजनात्मक कार्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढते परंतु वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी व आरोग्यासाठी स्वतःच प्रयत्न करावे लागतात. एकवेळ मला कोणी शिकवले नाही असे म्हणता येते, माझ्यात असलेली सुप्त कला विकसित व्हावी यासाठी कोणी मला वाव दिला नाही असेही म्हणता येते, पण मला कोणी आरोग्य दिले नाही असे म्हणता येत नाही, त्यामुळे प्रतिष्ठा स्वतः मिळविण्याची गोष्ट आहे व त्यात आरोग्य हे सर्वप्रथम आहे.

गर्भाशयाचा काही त्रास झाला की गर्भाशय काढून टाक, बीजाशयाचा काही त्रास असला की बीजाशय काढून टाक, अशा तऱ्हेने हा प्रश्र्न सुटणारा नाही. स्त्रीच्या सौंदर्यासाठी बाहेरून सौंदर्यप्रसाधनांची लिंपापोथी केली, सुडौलपणासाठी बाहेरून काही प्रयत्न केले तरी ते आरोग्यासाठी योग्य असेलच असे नाही.

आरोग्य टिकविण्यासाठी स्त्रियांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे व त्यासाठी आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही. स्त्रियांनी फार तंग कपडे वापरणे, केस एकदम छोटे ठेवणे, त्वचा स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी त्वचा खरवडणे (स्क्रॅपिंग), त्वचेवर केमिकल्स असलेली सौंदर्यप्रसाधने वापरणे, या सगळ्यामुळे आरोग्य मिळणार नाही.

स्त्री-संतुलनाच्या दृष्टीने योगासने व स्वास्थ्यसंगीत हेही अतिशय प्रभावी उपचार होत. फुलपाखरू क्रिया, ‘संतुलन समर्पण क्रिया’, मार्जारासन, ‘संतुलन अमृत क्रिया’, अनुलोम-विलोम श्र्वसनक्रिया, नियमित चालायला जाणे हे सर्व स्त्रीआरोग्य टिकून राहण्याच्या दृष्टीने उत्तम असतात. स्त्रीमधील संवेदनशील हॉर्मोनल संस्था आणि मानसिकता यांचा खूप जवळचा संबंध असतो.

संगीताच्या माध्यमातून स्त्रीची मानसिकता प्रसन्न ठेवता आली तर त्यामुळे तिचे स्त्रीत्वही सुरक्षित, प्रतिष्ठित राहू शकते. त्यातही हे संगीत जर वैदिक संस्कृतीवर, शास्त्रोक्त रागदारीवर आधारलेले असेल, मंत्र, वाद्यांच्या साहाय्याने सुसंस्कृत बनविलेले असेल तर त्याचा उत्कृष्ट उपयोग होताना दिसतो.

स्त्री वा पुरुषाचे शरीराचे वय वाढत असताना त्याची परिपक्वता मात्र एका विशिष्ट वेळी येते. स्त्री-पुरुष संबंध आला नाही पण चुकीच्या वयात मानसिक उत्तेजना मिळाली तरी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

स्त्री-पुरुषांच्या मिलनाचा, लग्नाचा, मुले होण्याचा एक विशिष्ट काळ असतो. म्हणून लहानपणी व तारुण्यात अनुशासन पाळणे खूप आवश्‍यक असते. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन चुकीच्या गोष्टी चुकीच्या वेळी करणे म्हणजे स्वातंत्र्य असे नसून तसे केल्यास संपूर्ण शरीराला परिणाम भोगावे लागतात.

स्त्रीसाठी गर्भारपण, बाळाचा जन्म या गोष्टी फार मोलाच्या असतात. गर्भारपणात स्त्रीविशिष्ट शरीरक्रियांमध्ये खूप बदल होत असतात. हे बदल सहजतेने व्हावेत व शरीरासाठी, आतल्या गर्भासाठी अनुकूल असावेत यासाठीही स्त्रीला काळजी घेणे भाग असते.

म्हणूनच गर्भसंस्कार हा विषय आयुर्वेदाने अतिशय सविस्तरपणे समजावलेला आहे. गर्भधारणा होण्याअगोदरपासून ते बाळंतपणानंतर बाळ स्तन्यपान करत असेपर्यंत स्त्रीने तिच्या आहार-आचरणाबद्दल काय काय काळजी घ्यायला हवी याविषयी आयुर्वेदाने जे काही सांगितले आहे त्याचा अवलंब करण्याने स्त्रीसंतुलन तर साधले जातेच व भावी पिढीही सुदृढ निपजते.

बऱ्याचदा गर्भारपण-बाळंतपणानंतर स्त्रियांमध्ये वजन वाढणे, उत्साह कमी होणे, केस गळणे, पाळी बिघडणे, थायरॉईड बिघडणे वगैरे त्रास होऊ लागतात. योग्य पद्धतीने गर्भसंस्कार केले असता हे त्रास टाळता येतात.

रजोनिवृत्तीचा काळ म्हणजे पाळी थांबायचा काळही स्त्रीच्या आयुष्यातला अतिशय संवेदनशील असतो. या काळात स्त्रीशक्ती टिकविण्यासाठी वातशामक उपचार करता येतात. वास्तविक सुरुवातीपासून स्त्रीसंतुलनासाठी प्रयत्न केले असले तर रजोनिवृत्ती अगदी सहज होताना दिसते.

सध्या मात्र रजोनिवृत्ती दिवसेंदिवस अवघड होताना दिसते आहे. अनेक स्त्रियांना गर्भाशय गमवावे लागत आहे. यामुळे त्रास थांबला असा आभास झाला तरी मूळ स्त्रीशक्तीवर न भरून येण्याजोगा आघात होत असल्याने स्त्रीचे गर्भाशय काढल्यामुळे नुकसानच होत असते.

स्त्रीत्त्वाचे नीट संरक्षण केले, स्त्रीशक्तीची जोपासना केली तर स्त्रीमध्ये स्वतःबरोबरच संपूर्ण विश्र्वालाही प्रतिष्ठित करण्याचे सामर्थ्य आहे.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com