बुकीश : पाडस

माधव गोखले
Saturday, 1 February 2020

‘द इर्लिंग’ लिहिली गेली सात दशकांपूर्वी; कादंबरीचा काळ आहे अमेरिकेतल्या नागरी युद्धाचा, म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावरचा. पण, ‘द इर्लिंग’ आजही तितकीच भावते.

‘द इर्लिंग’ची मोहिनी खूप दिवस मनावर होती. ही गोष्ट आहे बारा वर्षांचा ज्योडी बॅक्स्टर आणि हरणाच्या पाडसाची-फ्लॅगची. एकमेकांमध्ये गुंतून गेलेली ही दोन आयुष्यं एका अपरिहार्य क्षणी वाचकांना एका अनगड वळणावर घेऊन जातात. ‘द इर्लिंग’ लिहिली गेली सात दशकांपूर्वी; कादंबरीचा काळ आहे अमेरिकेतल्या नागरी युद्धाचा, म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावरचा. पण, ‘द इर्लिंग’ आजही तितकीच भावते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्योडी बॅक्स्टर राहतो फ्लोरिडाच्या अगदी आतल्या भागात. त्याच्या आई-वडिलांबरोबर. स्वभावाचं विचाराल तर सीनिअर बॅक्स्टर्स म्हणजे दोन ध्रुवच जणू. ज्योडी हे सहा मुलांवर जगलेलं बाळ. त्यामुळं पेनीचा, ज्योडीच्या वडिलांचा, (त्याचं खरं नाव इझ्रा, पण दिसायला लहानखुरा असल्यामुळं त्याला टोपण नाव पडलं आहे पेनी) त्याच्यावर प्रचंड जीव आहे. आणि ज्योडीही वडिलांचं शेपूट आहे. पेनीकडून ज्योडीला नकळत शिकवण मिळत असते, अरण्याबरोबर समरस झालेल्या निसर्गाबरोबरच्या सहजीवनाची.

एक दिवस शिकार करताना एका दुर्दैवी योगायोगाने एक अगदी लहानगं पाडस ज्योडीच्या आयुष्यात येतं. पाडसाचं नामकरण होतं फ्लॅग. आता ज्योडीला खऱ्या अर्थानं एक मित्र मिळालाय. ज्योडीची कथा आता ज्योडी आणि फ्लॅगची होते आणि अनेक वळणं घेत पुढं जाते.

पाडस वयात यायला लागतं, तसं स्वप्नवत वाटणाऱ्या आयुष्यामध्ये चोरपावलांनी जगण्याचं वास्तव प्रवेश करायला लागतं. एक दिवस फ्लॅग बॅक्स्टर कुटुंबीयांच्या शेतातलं उभं पीक फस्त करतो आणि बॅक्स्टर कुटुंबासमोर एक नवीनच मुद्दा उभा रहातो. पोरपण संपत असताना अनेक प्रश्न ज्योडीला छळत असतात. अचानक त्याच्यासमोर आणखी एक प्रश्न उभा राहतो निवडीचा. ज्योडीला आता निवड करायची असते - फ्लॅग की कुटुंब...

पुस्तकांच्या विश्वात स्वतःचं असं एक स्थान निर्माण करणाऱ्या मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांच्या या पुस्तकाच्या काही लाख प्रती पहिल्याच वर्षी विकल्या गेल्या होत्या. कित्येक दिवस हे पुस्तक वाचक-पसंत पुस्तकांच्या यादीतही होतं. रॉलिंग्ज यांना १९३९ मध्ये या कादंबरीसाठी ‘पुलित्झर’नं सन्मानित करण्यात आलं. या पुस्तकावर चित्रपट निघाला, संगीतिका लिहिली गेली, टीव्ही सीरिअल झाली, कार्टून स्ट्रीप्सही झाल्या. स्पॅनिश, जर्मन, चिनी, इटालियन, रशियनसह बावीस इतर भाषांमध्येही या पुस्तकाचे अनुवाद झाले आहेत. मराठीमध्ये राम पटवर्धनांनी या कादंबरीचा ‘पाडस’ या नावानं अनुवाद केला आहे. अनुवाद आहे यावर विश्वास बसू नये, असे काही थोडे अनुवाद वाचायला मिळतात. ‘द इर्लिंग’चा अनुवाद निःसंशयपणे या कोटीतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the yearling book