Loksabha Election : भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचे ‘मविआ’समोर आव्हान

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील ५० टक्के जागांवर म्हणजेच २४ जागांसाठी मागील तीन टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे. १३ मे आणि २० मेला होणाऱ्या दोन टप्प्यांमध्ये उर्वरित २४ जागांवर मतदान प्रक्रिया पार पडेल.
Loksabha Election
Loksabha Electionsakal

मतदानाची तारीख : १३ मे

नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, बीड, अहमदनगर, शिर्डी, शिरूर, मावळ, पुणे

(११ मतदारसंघ)

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील ५० टक्के जागांवर म्हणजेच २४ जागांसाठी मागील तीन टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे. १३ मे आणि २० मेला होणाऱ्या दोन टप्प्यांमध्ये उर्वरित २४ जागांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. पैकी ११ जागांसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे. निवडणूक हळूहळू ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे वळत आहे. भाजपने मागील दोन तीन निवडणुकांमध्ये तंबू ठोकला आहे, अशा भाजपच्या बालेकिल्ल्यात निवडणूक येऊन पोहोचली असल्याने महाविकास आघाडीचा कस चौथ्या टप्प्यासाठी लागणार आहे.

- दीपा कदम

लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात भाजपच्या सात, शिवसेनेच्या दोन अशा एकूण नऊ जागा आहेत. तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि एक जागा एमआयएमकडे आहे. चौथ्या टप्प्याच्या प्रचारादरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे भाष्य एका मुलाखतीत केले आणि नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीने भाजपमध्येच सहभागी व्हावे, असे निमंत्रण दिले. अर्थातच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी यावरून मोदींवर उलटवार केला. राजकीय आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या असल्या तरी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात होत असलेल्या या निवडणुकीत प्रश्नांना मात्र स्पर्श झाला नाही. बीड, जालना, संभाजीनगरमधील पिण्याच्या पाण्यापासून शेतीच्या पाण्याचे प्रश्न, मराठा समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनासारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले गेले. मावळ, पुणे, शिरूरमधील रोजगाराचे प्रश्न, एमआयडीसीची मागणी हे प्रश्न चर्चेला आले नाहीत.

यापूर्वीच्या तिन्ही टप्प्यांपेक्षा लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा वेगळा आहे. पहिल्या तिन्ही टप्प्यात ग्रामीण भागात मोडणारे मतदारसंघ अधिक होते. शिवाय ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर अवंलबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक होते. तसेच शिवसेनेत झालेल्या फुटीचे परिणाम त्या मतदारसंघांमध्ये दिसून येत होते. शेतकर्यांनी शेतीमालाचे भाव, पीकविमा योजनेसारख्या प्रश्नांवर प्रखरपणे मत व्यक्त केले होते. विशेष म्हणजे महाविकास आघाडीने एकत्रितपणे तिसऱ्या टप्प्यामध्ये महायुतीसमोर आव्हान उभे करण्यास यश मिळवले होते. ते ट्युनिंग चौथ्या टप्प्यात दिसले नाही. महायुतीला तो फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांमुळे मिळत आहे. त्याचा फायदा महायुतीने घेतला आहे. चौथ्या टप्प्यातील प्रत्येक मतदारसंघात स्थानिक जात समीकरणाची वेगवेगळी गणिते आहेत. त्याचे परिणाम या निवडणुकीतही दिसून येतील. शिवसेना ठाकरे गटाच्या फुटीचे परिणाम मावळ, शिरुर आणि अहमदनगर मतदारसंघात दिसण्याची शक्यता होती. मात्र मावळ आणि शिरुर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर चर्चा झाल्याने शिवसेनेच्या फुटीचा परिणाम मतदारसंघात ‘मविआ’ला साधता आला नाही.

मावळचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजोग वाघेरे यांनी उमेदवारीसाठी राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश केल्याचा त्यांच्यावरचा ठपका शेवटपर्यंत त्यांना पुसता आला नाही. अजित पवारांसोबतचे त्यांचे जवळचे संबंध देखील त्यास कारणीभूत होते. पुरेसे आव्हान वाघेरेंनी शेवटपर्यंत उभे केले नसल्याने बारणेंविषयीच्या नाराजीचा फायदा वाघेरेंना मिळताना दिसत नाही. शिरूरमध्ये मात्र दोन्ही माजी शिवसैनिक आता एकमेकांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून निवडणूक लढवत आहेत. आढळराव यापूर्वी शिवसेनेचे खासदार जरी असले तरी त्यांना या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे गणिताचे नीट आकलन होते. त्याचा फायदा त्यांना अजित पवारांमुळे होणार आहे. मात्र अमोल कोल्हेंनी किल्ला शेवटपर्यंत लढवला आहे. कोल्हेंसाठी हे अवघड आव्हान असले तरी शरद पवारांचे वजन कोल्हेंसाठी महत्वाचे ठरण्याची शक्यता आहे. पुणे मतदारसंघासाठी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचीही सभा पार पडली. विधानसभेत बाजी उलथवणाऱ्या रविंद्र धंगेकरांना लोकसभेचे गणित जुळवताना अवघड गेले. तर भाजपने हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा उघड प्रयत्न सुरु केला. राज ठाकरे यांनी महायुतीला मतदान करण्याचा ‘फतवा’ काढत निवडणुकीला ‘रंग’ देण्याचा प्रयत्न केला. मात्र चारही नगरसेवकांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत सुरुवातीला प्रचारात आघाडीवर असणारे वंचितचे उमेदवार वसंत मोरे अखेरच्या टप्प्यात पिछाडीवर राहिले.

मराठवाड्यात जातीय ध्रुवीकरण

मराठवाड्यातील मराठा आंदोलनाचा परिणाम या टप्प्यातील बीड, जालना आणि काही प्रमाणात अहमदनगर जिल्ह्यावर होणार आहे. बीडमध्ये दोन्ही प्रमुख उमेदवार ओबीसी असले तरी वंजारी आणि मराठा अशी सरळ लढत होत आहे. बीडमध्ये प्रथमच विखुरलेले मराठा एकत्रित येण्याची जादू दिसणार असली तरी वंजारा समाज देखील पंकजा मुंडेंसाठी एक झाला आहे. ‘काटे की टक्कर’ असा उल्लेख करता येईल अशी ही लढत झाल्यास आश्चर्य वाटू नये. त्याचप्रमाणे भाजपसाठी खात्रीच्या असणार्या जालन्याच्या जागेवर देखील काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी मराठा आंदोलनाच्या बळावर तगडे आव्हान उभे केले आहे. अखेरच्या टप्प्यात दानवे यांना मोठी झुंज द्यावी लागत आहे. .

जळगाव-रावेरमध्ये भाजपची पकड

जळगाव-रावेर या दोन्ही मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीने पुरेसे आव्हान उभे केलेले नाही. मराठा आंदोलनाचा परिणाम या मतदार संघावर तुरळक आहे. मात्र भाजपने सुरुवातीपासून या मतदारसंघावरील अंकुश ढळू दिलेला नाही. नंदुरबारच्या जागा पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न केले आहेत. माजी मंत्री के. सी. पाडवी यांच्या मुलाला गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या विद्यमान खासदार डॉ.हीना गावित यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजीचा फायदा गोवाल पाडवी यांना मिळू लागल्याने ही लढत शेवटपर्यंत रंगतदार होणार आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना नंदुरबारच्या सभेला मिळालेला प्रतिसाद देखील उल्लेखनीय होता.

नगरला लंके- विखेंत चुरस

अहमदनगरची जागा शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोघांसाठी वेगवेगळ्या अर्थाने प्रतिष्ठेची आहे. भाजपने मागील तीन निवडणुकीत अहमदनगरची जागा राखली आहे. तर अजित पवार गटात असलेले आ. निलेश लंके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून शरद पवारांनी हुकमाचे पान टाकले आहे. सुरुवातीपासून भाजपचे सुजय विखेंच्या बाजून निवडणूक झुकलेली असली तरी निलेश लंकेंच्या बाजूने सहानुभूतीचे वलय काम करताना दिसत आहे. चौथ्या टप्प्यातील भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीला मोठे आव्हान असले तरी चारपेक्षा अधिक जागांवर सुखद धक्का मिळण्याची शक्यता नक्कीच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com