कोल्हेंकडून भले भले चितपट

सलग तीन वेळच्या विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या आढळराव पाटील यांना गतवेळच्या निवडणुकीत नवख्या असलेल्या डॉ. कोल्हे यांनी पराभवाचा धक्का दिला होता.
amol Kolhe had given shock of defeat to Adhalrao Patil  lok sabha election 2024 shirur
amol Kolhe had given shock of defeat to Adhalrao Patil lok sabha election 2024 shirurSakal

- नितीन बारवकर

वैयक्तिक प्रतिमेचा प्रभाव, प्रतिकूल राजकीय स्थितीत जपलेली पक्षनिष्ठा, स्वपक्षासह महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेसच्या दिलेर कार्यकर्त्यांची लाभलेली भरभक्कम साथ, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयीची सहानुभूती आणि सुप्त लाटेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांनी गतवेळेपेक्षा या निवडणुकीत मोठा विजय मिळविला.

त्यांनी या वेळी दीड लाखाच्या आसपास मताधिक्क्य खेचले. या वेळी भोसरी वगळून सर्वच विधानसभा मतदारसंघांनी त्यांना उचलून धरले. महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना दलबदल आणि अतिआत्मविश्वासाचा फटका बसला. महायुतीच्या नेते, आमदारांनी दिलेले दिखाऊ, पण काहीशी मतलबी साथ त्यांना पराभवाच्या गर्तेत घेऊन जाणारी ठरली.

सलग तीन वेळच्या विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या आढळराव पाटील यांना गतवेळच्या निवडणुकीत नवख्या असलेल्या डॉ. कोल्हे यांनी पराभवाचा धक्का दिला होता. त्या वेळी साधारण ५९ हजारांचे मताधिक्क्य मिळविणाऱ्या डॉ. कोल्हे यांना या निवडणुकीत जनसंपर्काच्या अभावाचा मुद्दा तापवून महायुतीने घेरले.

मात्र त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी डॉ. कोल्हे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांच्यासाठी अवघा मतदारसंघ पिंजून काढला. त्यांच्या निष्ठेची कदर करीत पवार यांनी ‘तुतारी’च कशी निणादेल, यासाठीचे समीकरण पक्के करून टाकले.

जुन्नरच्या होमपिचवर पकड

जुन्नरने डॉ. अमोल कोल्हे यांनी सुमारे ५१ हजारांचे मताधिक्क्य दिले. डॉ. कोल्हे यांचे होमपिच म्हणून हे मताधिक्क्य समजण्यासारखे असले तरी तेथील विद्यमान आमदारांसह, माजी आमदार, विधानसभेसाठी धार लावून बसलेले अनेक दिग्गज आढळरावांच्या बाजूने उभे ठाकले होते. मात्र सत्यशील शेरकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर डॉ. कोल्हे यांनी जोरदार मुसंडी मारली.

शिरूरमध्ये विरोधकांनी मोठे रान तापवले होते. यात खुद्द अजित पवारही मागे नव्हते. मात्र नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा, शरद पवार यांच्या सभा आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मायक्रो प्लॅनिंग करत डॉ. कोल्हे यांनी तब्बल तीस हजारांची आघाडी मिळवली. हडपसरमधील माळी व मुस्लिम समाजाच्या मताधिक्क्यावर डॉ. कोल्हे आघाडी घेतील, हा अंदाजही खरा ठरला.

आंबेगावमध्ये आढळराव पाटील यांना एकतर्फी मताधिक्क्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, साडेअकरा हजारांच्या आसपास मताधिक्क्य मिळवत डॉ. कोल्हे यांनी मी-मी म्हणविणाऱ्यांची बोलती बंद केली.

खेडची दणदणीत साथ

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव, आमदार दिलीप मोहिते यांचा खेड, आमदार अतुल बेनके यांचा जुन्नर, आमदार चेतन तुपे यांचा हडपसर हे चार मतदारसंघ राष्ट्रवादीच्या, तर भोसरी मतदारसंघ आमदार महेश लांडगे यांच्या रूपाने भाजपच्या ताब्यात होता. आमदार मोहिते व आढळराव यांच्यात अनेकदा संघर्षाचे प्रसंग घडले.

त्यातून त्यांनी आढळराव यांचे काम न करण्याची जाहीर भूमिकादेखील घेतली होती. अखेर अजित पवारांच्या मध्यस्थीनंतर ते नरमले. पण त्यांची ही नरमाई मनापासूनची नसल्याचेच खेडमधून मिळालेल्या ५५ हजारांच्या दणदणीत मताधिक्क्याने अधोरेखित झाले.

आढळरावांची नाळ जुळलीच नाही

दुसरीकडे उमेदवारीसाठी म्हणून करावे लागलेले पक्षांतर आणि एका हातात घड्याळ असले तरी दुसऱ्या हातातील शिवबंधन कायम असल्याचे सूतोवाच राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांतही द्विधावस्था निर्माण करणारे ठरले.

त्यातून आढळराव यांची राष्ट्रवादीशी शेवटपर्यंत नाळ जुळताना दिसलीच नाही. ग्रामीण भागात मोदी सरकारविषयी असलेली नाराजी कॅश करताना शरद पवार यांनी शहरी जनतेलाही साद घातली. त्यासाठी डॉ. कोल्हे यांच्यासारखा हुशार, कर्तृत्ववान, प्रभावी चेहरा पुढे केला.

शिरूर लोकसभा

डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) - ६,९८,६९२ मिळालेली मते

शिवाजीराव आढळराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) - ५,५७,७४१ मिळालेली मते

  • टपाली मतदानापासूनच डॉ. अमोल कोल्हेंची आघाडी

  • सर्व फेऱ्यांमध्ये आघाडी कायम राखण्यात डॉ. कोल्हेंना यश

  • आढळराव पाटील दिवसभर केंद्राकडे फिरकलेच नाहीत

  • आढळराव पाटलांच्या कार्यकर्त्यांचा काढता पाय

  • मतमोजणी केंद्रापासून अमोल कोल्हे यांची विजयी मिरवणूक

  • कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून अमोल कोल्हे यांचे मतमोजणी केंद्रात आगमन

  • ‘नोटा’ला ९ हजार ६३० मते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com