Hyderabad Lok Sabha Election Results : हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवैसींचा मोठा विजय; माधवी लतांचा दारुण पराभव

ओवैसी यांना आतापर्यंत 5 लाख 25 हजार मते मिळाली आहेत.
Hyderabad Lok Sabha Election Results
Hyderabad Lok Sabha Election Resultsesakal
Summary

चार वेळा खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी कधीही हैदराबाद लोकसभा निवडणूक लढवली नाही, फक्त ते जिंकत राहिले.

Hyderabad Lok Sabha Election Results : देशात लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. आता त्याचे निकाल येऊ लागले आहेत. सध्या हैदराबादमध्ये एआयएमआयएमचे प्रमुख आणि विद्यमान लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांना भाजपच्या उमेदवार माधवी लता कोम्पेल्ला (Madhavi Latha Kompella) यांच्यावर २ लाख ५० हजारांची आघाडी आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ओवैसी यांना आतापर्यंत 5 लाख 25 हजार मते मिळाली आहेत. तर, माधवी लता यांना २ लाख ७४ हजार मते मिळाली आहेत. त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

चार वेळा खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी कधीही हैदराबाद लोकसभा निवडणूक लढवली नाही, फक्त ते जिंकत राहिले. त्यांच्या विजयाचं अंतरही लाखात आहे. कोणताही पक्ष एवढा तगडा उमेदवार उभा करू शकला नाही की, त्यांना निवडणूक लढवावी लागली. त्यामुळं ते 20 वर्षांपासून अपराजित आहेत. त्यांचे वडीलही 20 वर्षांपासून असेच जिंकत होते. मात्र, यावेळंचं चित्र खूप वेगळं होतं. त्यांची थेट लढत भाजपच्या डॉ. माधवी लता यांच्याशी होती. त्या राजकारणात नवख्या उमेदवार होत्या.

ओवैसी कुटुंबाच्या तीन पिढ्यांशी हैदराबादवासीयांचे राजकीय संबंध आहेत. सध्याचे खासदार ओवैसी यांचे आजोबा अब्दुल वाहिद ओवैसी यांनी 1957 मध्ये हैदराबाद महापालिकेतून राजकारणाला सुरुवात केली होती. त्यानंतर ओवैसी यांचे वडील सुल्तान सलाहुद्दीन ओवैसी 1980 ते 1999 या काळात सलग सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

Hyderabad Lok Sabha Election Results
Belgaum Lok Sabha Election Results : बेळगावात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांचा मोठा विजय; काँग्रेसच्या मृणाल हेबाळकरांचा पराभव

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सांगतात की, 'ओवैसी यांच्या वडिलांना 1996 मध्ये भाजपचे व्यंकय्या नायडू आणि 1999 मध्ये बी. बाल रेड्डी यांच्याकडून जोरदार आव्हान मिळालं होतं. त्यानंतर 2008 मध्ये हैदराबाद जागेचे परिसीमन झाले आणि ग्रामीण भागातील तंदूर, विकाराबाद आणि चेवल्ला विधानसभा मतदारसंघ तोडण्यात आले. त्यामुळे हैदराबादची जागा जुन्या शहरापुरती मर्यादित राहिली. येथून त्यांना पराभूत करणं फार कठीण आहे.'

हैदराबादमधील सातपैकी सहा विधानसभेच्या जागा ओवैसींच्या पक्षाकडे आहेत, हे या युक्तिवादामागचं सबळ कारण आहे. त्यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी हे चंद्रयांगुट्टा येथून आमदार आहेत. भाजपने फक्त गोशामहलमधून विजय मिळवला. तिथं आमदार टी. राजा सिंह स्वतः लोकसभेचे तिकीट मागत होते, पण पक्षाने डॉ. माधवी लता यांना तिकीट दिलं. यावरून ते नाराज असल्याचे उघड झाले.

ओवैसी गेल्या निवडणुकीत अडीच लाख मतांनी विजयी झाले होते. ही दरी भरून काढणे सोपे नाही. ओवैसी बनावट मतांच्या जोरावर जिंकत असल्याचा आरोप माधवी लतांनी केला होता. त्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी माधवींच्या प्रचारासाठी रोड शो केला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रबोधनपर संमेलनही केलं. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेत्यांचे प्रचारदौरेही येथे झाले. ओवैसी यांनी समर्थकांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी रॅली काढून पहिल्यांदाच उमेदवारी दाखल केली. या प्रचाररॅली दरम्यान बीफ शॉप जिंदाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. त्यावर टीका झाल्यानंतर ओवैसींनी इडली शॉप जिंदाबाद असं म्हटल्याचं स्पष्ट केलं होतं.

'काँग्रेस-बीआरएसचे डमी उमेदवार'

ओवैसींना भाजपची बी-टीम म्हणणाऱ्या काँग्रेसला त्यांच्या विरोधात कधीही तगडा उमेदवार उभा करता आला नाही. बीआरएसचीही तीच परिस्थिती आहे. ओवैसी उघडपणे काहीही बोलले, तरी तेलंगणात सत्तेत असलेल्यांना ते नेहमीच सहकार्य करतात, असं म्हटलं जातं. पूर्वी ते बीआरएसच्या जवळ होते, आता ते काँग्रेसच्या जवळ आहेत. माधवी लता म्हणतात, 'काँग्रेसने जिल्हाध्यक्ष मो. वलीउल्लाह समीरची ओळख डमी स्वरूपातच झाली आहे. बीआरएस ते जी. श्रीनिवास यादव हे नावापुरतेच उमेदवार आहेत.'

मतदानाची टक्केवारी कमी

संपूर्ण मतदारसंघात पसरलेल्या १९ लाखांहून अधिक मतदारांच्या मतांची टक्केवारी कमी होत आली आहे. १९८४ मध्ये ७६.७६ टक्के मतदान होते, ते २०१४ मध्ये ५३.३ टक्के व २०१९ मध्ये फक्त ४४.८४ टक्क्यांवर आले. हैदराबादमध्ये जवळपास ७० टक्के मतदार मुस्लीम आहेत. त्यातील अधिकाधिक मुस्लीम एआयएमआयएमचे समर्थक आहेत.

2019 मध्ये ओवैसींकडून भाजप उमेदवाराचा 2.82 लाख मतांनी पराभव

1984 ते 2019 या लोकसभा निवडणुकीत हैदराबादच्या जागेवर ओवैसी कुटुंबाला कोणीही पराभूत करू शकले नाही. असदुद्दीन ओवैसी यांचे वडील सलाहुद्दीन ओवैसी यांनी हैदराबादमधून 6 वेळा निवडणूक लढवली आणि प्रत्येक वेळी विजयी झाले. त्यांच्यानंतर असदुद्दीन ओवैसी विजयी होत आहेत. असदुद्दीन 2004 पासून खासदार आहेत. प्रत्येक वेळी त्यांच्या विजयाचे अंतर गेल्या वेळेपेक्षा जास्त राहिले आहे. 2019 मध्ये त्यांनी भाजप उमेदवार डॉ. भगवंत राव यांचा 2.82 लाख मतांनी पराभव केला.

हैदराबादमध्ये AIMIM अजिंक्य होण्याची कारणे

-एकूण 19.5 लाख मतदारांपैकी 11.5 लाख मुस्लिम आहेत, म्हणजे हे सुमारे 60 टक्के मतदार आहेत. हे AIMIM चे मूळ मतदार आहेत.

-हैदराबाद लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 7 जागा आहेत. त्यापैकी 6 एआयएमआयएम आमदार आहेत. भाजपकडे एक जागा आहे.

-ओवैसी कुटुंबाच्या आसरा-क्वीन्स हॉस्पिटलमध्ये लोकांना मोफत उपचार मिळतात. ओवैसी ग्रुप ऑफ स्कूल गरीब कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण देते. त्याचा परिणाम मतदारांवर दिसून येत आहे.

-खासदार म्हणून असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिमा 'मुस्लिम नेते' अशी आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव अधिक आहे.

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून भाजप कधीही जिंकला नाही. मात्र, येथे पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने डॉ. भगवंत राव यांना ओवैसी यांच्या विरोधात उभे केले होते. ओवैसी यांना 5,17,471 आणि भगवंत राव यांना 2,35,285 मते मिळाली. 2014च्या निवडणुकीत ओवैसी यांना 5,13,868 आणि भगवंत राव यांना 3,11,414 मते मिळाली होती.

ओवैसींसमोर भाजपच्या माधवी लतांचं आव्हान

गेल्या 10 वर्षांत भाजपने तेलंगणात आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली होती. विधानसभा निवडणुकीत पक्षाची मते 7 टक्के वरून 15 टक्के पर्यंत वाढली आहेत. यावेळी ओवैसींसमोर भाजपने माधवी लता यांना उभे केले. माधवी त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहतात. त्यांनी हैदराबादेत तिहेरी तलाकच्या प्रथेविरोधात मोहीम चालवली आहे. त्या पसमांदा मुस्लिम महिलांमध्ये आणि जुन्या शहरात लोकप्रिय आहेत. त्यांनी मुस्लिम महिलांसाठी बँकही तयार केली आहे. यातून त्या मुलांच्या लग्नात आणि उपचारासाठी मदत करतात. यामुळे हैदराबाद जिंकण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न होते.

-2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 27-27% मते मिळाली, याचा अर्थ त्यांची मतांची टक्केवारी स्थिर आहे.

-2018 च्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणात भाजपला फक्त 1 जागा मिळाली. 2023 मध्ये जागा वाढून 8 झाल्या. मतांची टक्केवारी 7 वरून 14 टक्के पर्यंत वाढली.

-हैदराबादच्या जागेवर भाजपचा सर्वात मोठा मुद्दा 'हिंदुत्व' आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासह पक्षाचे नेते ते हैदराबादचे नाव बदलून 'भाग्यनगर' करणार असल्याचे सांगतात.

BRS हैदराबादमधील तिसरा सर्वात मोठा पक्ष

ओवैसींच्या विरोधात बीआरएसने हैदराबादचे समाजसेवक गद्दम श्रीनिवास यादव यांना तिकीट दिले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत AIMIM आणि BJP नंतर TRS तिसऱ्या क्रमांकावर होती. त्यांना 7.2 टक्के मते मिळाली. गद्दम श्रीनिवास यांनी हैदराबादच्या मुस्लिम वसाहतींना भेटी देल्या आणि मतं मागितली. तेलंगणात सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने 1980 मध्ये हैदराबादची जागा जिंकली होती. 1984 ते 2019 या काळात पक्षाने उमेदवार उभे केले, परंतु प्रत्येक वेळी त्यांचा पराभव झाला. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मोहम्मद फिरोज खान यांना तिकीट दिले होते, मात्र त्यांना केवळ 49,944 मते मिळाली होती. पक्ष येथे चौथ्या क्रमांकावर होता.

जुन्या शहरात 8 लाख बिगर मुस्लिम मतदार

हैदराबाद मतदारसंघातील 19 लाख मतदारांपैकी 8 लाख गैर-मुस्लिम आहेत. यामध्ये यूपी आणि राजस्थानमधील मारवाडी समाजातील लोकांचा समावेश आहे. भाजप त्यांना आपली ताकद मानतो. हैदराबादच्या गोशामहल आणि मलकपेट मतदारसंघात मुस्लिमेतर समाजातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापैकी बहुतेक पिढ्यानपिढ्या येथे राहतात. बहुतेक लोक हार्डवेअर आणि प्लंबिंगमध्ये काम करतात. या मतदारांमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपने गोशामहलची जागा जिंकली होती. टी राजा सिंह हे येथून आमदार आहेत. बिगर-मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नोव्हेंबर 2023 मध्ये हैदराबाद न्यू टाऊन ते ओल्ड सिटी आणि पुन्हा मार्च 2024 मध्ये रोड शो केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com