Sangli Result : विशालचा विजय एक आणि परिणाम अनेक..; दोघांना हलक्यात घेणं भाजपला पडलं महाग, सांगली काँग्रेसचाच बालेकिल्ला

हा निकाल केवळ विशाल (Vishal Patil) खासदार होण्यापुरता मर्यादित नसून, सांगली काँग्रेसचा (Sangli Congress) आजही बालेकिल्ला आहे, हे सिद्ध करणारी आहे.
Congress Rebel Candidate Vishal Patil Won in Sangli Lok Sabha Result
Congress Rebel Candidate Vishal Patil Won in Sangli Lok Sabha Resultesakal
Summary

गत वेळी गोपीचंद पडळकर यांना पडलेल्या मतांचा ‘वंचित फॅक्टर’ यावेळी विशाल यांना आत्मविश्‍वास दुणावणारा ठरला. दलित, मुस्लिम मतांचा हा पासंग जमेचा ठरला.

Sangli Lok Sabha Result : सांगली राज्यात गाजली, ती महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) जागांच्या घोळामुळे. तिथूनच विशाल पाटील यांनी जिल्ह्याचेच नव्हे, तर राज्याचे लक्ष वेधून घेतले. महाविकास आघाडीमध्ये मोठी रस्सीखेच झाली होती आणि काँग्रेसला डावलून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हट्टाने ही जागा लढवली होती. मात्र विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत भाजपला एकतर्फी वाटणाऱ्या या मतदारसंघात स्वतः एकहाती विजय मिळवला.

हा निकाल केवळ विशाल (Vishal Patil) खासदार होण्यापुरता मर्यादित नसून, सांगली काँग्रेसचा (Sangli Congress) आजही बालेकिल्ला आहे, हे सिद्ध करणारी आहे. या निकालाचे परिणाम अटळ असून, जिल्ह्यातील नेतृत्वाची कूस बदलली आहे. जयंत पाटील बॅकफूटवर गेले असून आता विशाल पाटील- विश्वजित कदम जोडी केंद्रस्थानी येण्याचेच संकेत आहेत.

सलग दोन वेळा लोकसभा जिंकणाऱ्या भाजपचा (BJP) आत्मविश्‍वास यावेळी भलताच वाढला होता. विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख, अजितराव घोरपडे यांनी आळवलेला विरोधाचा ‘राग’ भाजपनेतृत्वाने दुर्लक्षित केला. ‘उमेदवार बदला’ हा स्थानिकांचा संदेश धुडकावला. ‘मविआ’ने चंद्रहार पाटील या नवख्या उमेदवाराला संधी दिल्यानंतर, तर भाजपच्या मंडळींनी ही निवडणूक ‘वन वे’ असल्याचा समज करून घेतला. मात्र संपूर्ण प्रचार काळात विशाल यांना व्यक्त होत असलेली सहानुभूती मात्र स्पष्ट दिसत होती. ती हवा असेल, असाही भाजपचा समज होता. मात्र विश्वजित कदम व विशाल पाटील यांनी रणनीती बदलत ‘परफेक्ट’ खेळी खेळत शिवसेना व राष्ट्रवादी या सहकारी पक्षनेत्यांनाही संदेश दिला.

राज्य व दिल्लीतून काँग्रेस नेतृत्वाने या निवडणुकीत विशाल यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई टाळत कार्यकर्त्यांना संदेश दिला. हे सारे जुळून आले, तरी विशाल यांच्यासाठी निवडणूक सोपी नव्हती, हे तितकेच खरे. पक्ष नाही... चिन्ह नाही.... नेते नाहीत, तरीही आत्मविश्‍वास ढळू न देता त्यांनी लोकसभेला बंडखोरीही यशस्वी होऊ शकते, याचा धडा सर्वांना दिला. अर्थात ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विशाल यांच्यासाठी दिलेली नेतृत्वाची रसद निर्णायक ठरली. गत वेळी गोपीचंद पडळकर यांना पडलेल्या मतांचा ‘वंचित फॅक्टर’ यावेळी विशाल यांना आत्मविश्‍वास दुणावणारा ठरला. दलित, मुस्लिम मतांचा हा पासंग जमेचा ठरला.

Congress Rebel Candidate Vishal Patil Won in Sangli Lok Sabha Result
Sangli Constituency Lok Sabha Election Result: विशाल पाटलांचा लिफाफा दिल्लीत पोहचला, कदमांनी केला संजयकाकांचा करेक्ट कार्यक्रम?

भाजपच्या पराभवाची कारणे शोधताना भाजपला दोनदा खासदारकी, तीन आमदार, महापालिका, जिल्हा परिषद असे सारे काही देऊनही सांगलीच्या पदरात काय पडले, हा प्रश्‍न उरतोच. ‘सकाळ’ने उघड केलेली विमानतळाच्या जागेतील, ‘ड्रायपोर्ट’च्या घोषणेतील संजय पाटील यांची लपवाछपवी मतदारांची फसवणूक करणारी ठरली. सिंचन योजनाची कामे खासदार आपली म्हणून सांगतात. त्याचवेळी त्यांनी घेतलेल्या उद्योग मेळाव्याचे काय झाले, याचा हिशेब मात्र त्यांनी मांडला नाही. जिल्ह्यातून महामार्गाचं जाळं पसरलं. याचं ‘मार्केटिंग’ करताना त्या जाळ्याचा उद्योग उभारणीसाठी काय लाभ झाला, याचे उत्तर भाजपने दिले पाहिजे. मोदींनी सांगलीत टाळलेली सभा भाजपच्या अंतर्गत गोटात चर्चेची ठरली.

या निवडणुकीचे कवित्व आता येत्या निवडणुकांमध्ये दिसेल. दोन मतदारसंघांपुरती जिल्ह्यात काँग्रेस उरली, अशी टीका केली जात होती. आता पुन्हा एकदा काँग्रेसला बाळसे येईल. काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येण्याची सुरवात आहे, असे स्पष्ट संकेत आहेत. सांगली, मिरज, शिराळा हे मतदारसंघ काँग्रेसकडे होते. त्यातही सांगली-मिरजेत काँग्रेससाठी ‘फील गुड’ वातावरण तयार झाले आहे. काँग्रेसला कोंडीत पकडण्याची प्रत्येक वेळी ‘हिट’ खेळी खेळणारे जयंत पाटील यावेळी मौनात होते. मात्र त्यांच्या धूर्त खेळींनी त्यांची तयार झालेली प्रतिमा विशाल यांना सहानुभूती देऊन गेली. आता भाजप पूर्वाश्रमीचा ‘जेजेपी’ राहिलेला नाही, याची जाणीवही यानिमित्ताने जयंत पाटील यांना झाली. चंद्रहार पाटील यांच्यासाठी त्यांनी उभारलेला ‘आघाडी धर्म’ आता जयंत पाटील यांनी उलगडून सांगितला पाहिजे.

Congress Rebel Candidate Vishal Patil Won in Sangli Lok Sabha Result
Belgaum Politics : चार आमदार अन् एक खासदार; बेळगावच्या राजकारणात जारकीहोळी घराण्याचा दबदबा कायम

निकालाचा धडा...

  • जिल्ह्याचे नेतृत्व विश्वजित, विशाल या तरुणाईकडे

  • जयंत पाटील यांना काँग्रेससमवेत जुळवून घेण्याचा जनादेश

  • सांगली-मिरज विधानसभेतील जागा टिकवण्याचे भाजपपुढे आव्हान

  • संजय पाटील यांच्या भाजपमधील नेतृत्वाला आव्हान

  • जिल्ह्यातील भाजपवाढ ही वास्तव की सूज, हे यथावकाश स्पष्ट होणार

  • केंद्र, राज्य आणि जिल्ह्यातील सत्तास्थाने ताब्यात असूनही भाजप हतबल

  • वंचित, अल्पसंख्याक मतांचा विशाल यांना लाभ

  • विमानतळ-ड्रायपोर्टसह विकासकामे दुर्लक्षितचा भाजपला फटका

  • खासदारांना निष्क्रियतेचा शिक्का शेवटपर्यंत पुसता आला नाही

‘आखिर कब तक रोकोगे मुझे?’

खरे तर प्रकाशबापूंच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत विशाल यांनाच उमेदवारीचा निर्णय झाला होता. मात्र त्यावेळी त्यांच्याविरोधात पक्षात आणि घरातूनही कारस्थाने झाल्याची चर्चा होती. तेव्हा विशाल यांनी, ‘माझाही एक दिवस येईल,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. लोकसभेतील एका पराभवाने त्यांना अनेक धडे मिळाले, जे यावेळी कामी आले. त्यामुळे तिकीट कापण्याच्या कारस्थानाला त्यांनी सकारात्मक घेत आपण कच्च्या गुरूचे चेले नाहीत, हे सिद्ध केले. आज त्यांचा दिवस आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com