Uddhav Thackeray : ठाकरे गटाची खरी कसोटी विधानसभेला! लोकसभा निवडणुकीत कोकणात फटका; 'हे' दोन्ही उमेदवार पराभूत

आजवर कोकणवासीयांचे (Konkan Lok Sabha Elections) धनुष्यबाण या चिन्हाशी एक भावनिक नाते होते.
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Summary

शिवसेना फुटल्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक पक्षाबरोबर राहतील की, नाही याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या.

चिपळूण : आजवर कोकणवासीयांचे (Konkan Lok Sabha Elections) धनुष्यबाण या चिन्हाशी एक भावनिक नाते होते; पण महायुतीत कोकणातील दोन्ही जागा या मित्रपक्षांना गेल्याने तिथे धनुष्यबाण हे चिन्ह नव्हते. अशावेळी कोकणातील मतदार नेमके कोणाला साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे असताना कोकणातील दोन्ही जागा महायुतीने पटकावल्या. त्यामुळे धनुष्यबाण या चिन्हानंतर ठाकरेंची शिवसेना लोकसभा निवडणुकीतून कोकणातून हद्दपार झाली आहे. आता खरी लढाई विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

१९९१ ला पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी आपला उमेदवार राजापूर मतदार संघातून उतरविण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक यांनाच बाळासाहेबांनी राजापूरमधून तिकीट दिले होते. ही खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरली होती कारण, शिवसेनेच्या उमेदवारीमुळे तब्बल पाच टर्म खासदार म्हणून निवडून आलेल्या मधू दंडवते यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. इथून काँग्रेसचे सुधीर सावंत हे निवडून आले होते. शिवसेनेचे वामनराव महाडिक हे दुसऱ्या क्रमांकावर होते.

Uddhav Thackeray
Sangli Lok Sabha Result : वसंतदादांच्या नातवाला डावललं गेलं, षड्‌यंत्र रचलं गेलं; पण तरीही 'डबल करंट'ने जिंकला डाव!

विद्यमान खासदार मधू दंडवते हे थेट तिसऱ्या स्थानी फेकले गेले. त्यानंतर १९९६ ला पहिल्यांदाच शिवसेनेचे उमेदवार सुरेश प्रभू हे इथून निवडून आले. त्यानंतर सलग तीनवेळा म्हणजे १९९८, १९९९ आणि २००४ ला सुरेश प्रभू हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले. तेव्हापासूनच शिवसेना आणि कोकण यांचे नाते अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

बाळासाहेबांची शिवसेना फुटल्यानंतर धनुष्यबाण हे चिन्ह मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कायदेशीर लढा दिला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हवी होती; मात्र, या जागेसाठी भाजपने हट्ट धरला. अखेर ही जागा भाजपला मिळाली. रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली. रायगडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यासमोर ठाकरे गटाचे अनंत गीते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात भाजपचे नारायण राणे यांच्यासमोर ठाकरे गटाचे विनायक राऊत उभे होते.

निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी प्रथमच धनुष्यबाण हे चिन्ह कोकणातून लोकसभेच्या निवडणुकीत गायब झाले. मशाल हे चिन्ह घेऊन बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना टिकवण्यासाठी विनायक राऊत आणि अनंत गीते यांनी प्रयत्न केले; मात्र दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील शिवसैनिक ठाकरे गटाबरोबर राहिल्याचे दिसून आले; मात्र खरी लढाई विधानसभा निवडणुकीत असणार आहे.

Uddhav Thackeray
'लोकसभेच्या पराभवाने मी संपणार नाही, कोणाला वाटत असेल शिंदे संपले, पण..'; शशिकांत शिंदेंचा कोणावर रोख?

फुटीनंतरही शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीशी

शिवसेना फुटल्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक पक्षाबरोबर राहतील की, नाही याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. केवळ रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या तिन्ही मतदार संघातून विनायक राऊत यांना मताधिक्य मिळाले आहे. यातील रत्नागिरी आणि चिपळूण मतदार संघातील शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. रायगड मतदार संघात येणाऱ्या दापोली आणि गुहागर या दोन्ही मतदार संघातून शिवसेनेचे अनंत गीते यांना मताधिक्य मिळाले आहे. दापोली मतदार संघात शिवसेनेत बंडखोरी झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com