Coimbatore Lok Sabha Result : भाजपच्या 'या' फायरब्रँड नेत्याचा द्रमुकच्या उमेदवाराने मोठ्या फरकाने केला पराभव

तामिळनाडूतील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या कोईम्बतूरमध्ये दिग्गजांमध्ये चुरशीची स्पर्धा होती.
Coimbatore Lok Sabha Result
Coimbatore Lok Sabha Resultesakal
Summary

1967 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ही जागा जिंकली होती. सीपीएमचे उमेदवार के. रामाणी विजयी झाले होते.

Coimbatore Lok Sabha Result : कोईम्बतूर लोकसभा जागेवर झालेल्या मतमोजणीत द्रमुकचे राजकुमार पी विजयी झाले आहेत. निवडणूक निकालांमध्ये कोईम्बतूर लोकसभा जागेच्या शर्यतीत के. अन्नामलाई दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

तामिळनाडूतील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या कोईम्बतूरमध्ये दिग्गजांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. येथे भाजपचे फायरब्रँड नेते आणि तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई (Annamalai) यांचा द्रमुकचे उमेदवार पी. राजकुमार यांनी पराभव केला. इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलच्या निकालांनी DMK उमेदवार पी. राजकुमार यांचा कोईम्बतूर मतदारसंघातून विजयाचा अंदाजही वर्तवला होता.

दक्षिण भारतातील तमिळनाडू (Tamil Nadu) राज्यात लोकसभेच्या एकूण 39 जागा आहेत, त्यापैकी एक कोईम्बतूर संसदीय मतदारसंघ आहे, जो अनारक्षित आहे. राजधानी चेन्नईपासून त्याचं अंतर सुमारे 500 किलोमीटर आहे. हे एक व्यापारी शहर असून राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. या जागेवर डाव्या पक्षांचं वर्चस्व राहिलं आहे. इथं डाव्या पक्षांनी 8 वेळा विजय मिळवला, तर काँग्रेसनं 6 वेळा विजय मिळवला आहे. यावेळी ही जागा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि युवा नेते अन्नामलाई यांच्यामुळं चर्चेत आली.

कोईम्बतूर मतदारसंघात तमिळींबरोबरच बिहारी, उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत. राज्यात द्रमुक व अण्णा द्रमुक या प्रादेशिक पक्षांचा पगडा असला तरी कोईम्बतूर मतदारसंघातून काँग्रेस, डावे पक्ष, भाजप या राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार निवडून आले आहेत. 1998 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या सभेपूर्वी कोईम्बतूर शहरात बॉम्बस्फोट झाले होते. तेव्हा मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपला विजय मिळाला होता. अशा या जातीयदृष्ट्या संवेदनशील आणि यंत्रमागाचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोईम्बतूर मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. 1998 आणि 1999 च्या विजयानंतर तब्बल 25 वर्षांनी भाजपने विजय संपादन करण्याकरिता सारी ताकद पणाला लावली होती.

कोण-कोणत्या पक्षाचे उमेदवार?

भारतीय जनता पक्षाने (भाजप) कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांना मैदानात उतरवलं. अन्नामलाई हे तरुण नेते आहेत. तर, AIADMK ने जी. रामचंद्रन यांना उमेदवारी दिली. द्रविड मुन्नेत्र कळघमनं (डीएमके) या जागेवरून गणपती पी. राजकुमार यांना उमेदवारी दिली होती. या जागेवर या तिन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत होती.

कोणता पक्ष किती वेळा जिंकला?

कोईम्बतूर लोकसभा जागेवर सीपीएमचं वर्चस्व राहिलं आहे. या डाव्या पक्षानं सर्वाधिक 8 वेळा विजय मिळवला आहे. तर, काँग्रेस पक्ष 6 वेळा विजयी झाला आहे. डीएमके आणि भाजपनं ही जागा 2-2 वेळा जिंकली आहे. तर, AIADMK फक्त एकदाच जिंकला आहे.

2019 च्या निवडणुकांचे निकाल

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सीपीएमचे पीआर नटराजन कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. सीपीएमने भाजपचे सीपी राधाकृष्णन यांचा पराभव केला होता. नटराजन यांना 5 लाख 71 हजार 150 मते मिळाली, तर राधाकृष्णन यांना 3 लाख 92 हजार 7 मते मिळाली. या जागेवर सीपीएम उमेदवाराच्या विजयाचे अंतर 1 लाख 79 हजार 143 इतके होते.

या जागेचा काय आहे इतिहास

कोईम्बतूर लोकसभा जागेसाठी 1952 मध्ये पहिल्यांदा मतदान झालं होतं. यामध्ये प्रसिद्ध वकील आणि काँग्रेसचे उमेदवार टीए रामलिंगम चेट्टियार विजयी झाले होते. पण, 1957 मध्ये काँग्रेसचे उमेदवार एनएम लिंगम खासदार म्हणून निवडून आले. 1952 मध्ये काँग्रेसने पीआर रामकृष्णन यांना उमेदवारी दिली. त्यांनीही विजयाची नोंद केली.

Coimbatore Lok Sabha Result
Thoothukudi Lok Sabha Election Results : DMK च्या कनिमोझींनी थुथुक्कुडी मतदारसंघातून 3,50,390 मतांच्या फरकाने आघाडीवर

1967 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ही जागा जिंकली होती. सीपीएमचे उमेदवार के. रामाणी विजयी झाले होते. 1971 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सीपीआयचे उमेदवार के. बालधनदयुथम जिंकले होते. CPI च्या पार्वती कृष्णन यांनी 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला.

1980 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) उमेदवार युग मोहन विजयी झाले. तर, 1984 मध्ये काँग्रेसचे सीके कुप्पुस्वामी विजयी झाले. कुप्पुस्वामी यांनी 1989 आणि 1991 च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. तर, 1996 च्या सार्वत्रिक निवडणुकीत डीएमकेचे एम. रामनाथन विजयी झाले.

1998 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) पहिल्यांदा कोईम्बतूर लोकसभा जागा जिंकली. या जागेवर भाजपचे सीपी राधाकृष्णन विजयी झाले. 1999 च्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सीपीआयचे उमेदवार के. सुब्बारायन आणि 2009 मध्ये सीपीएमचे पीआर नटराजन विजयी झाले.

सन 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) चे उमेदवार पी. नागराजन आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सीपीएमचे पी.आर. नटराजन विजयी झाले होते.

या जागेचं जातीय समीकरण

2011 च्या जनगणनेनुसार, कोईम्बतूरची लोकसंख्या 21 लाख 85 हजार 424 आहे. ज्यामध्ये 17.4 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि 82.6 टक्के लोक शहरी भागात राहतात. या जागेवर 13.38 टक्के लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे, तर अनुसूचित जमातीची (एसटी) लोकसंख्या 0.3 टक्के आहे. जनगणनेनुसार, या जागेवर मुस्लिमांची लोकसंख्या 5.9 टक्के आहे आणि ख्रिश्चनांची लोकसंख्या 5.06 टक्के आहे. जैन 0.08 टक्के आणि शीख 0.03 टक्के आहेत.

विधानसभेच्या 6 जागांचं गणित

कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 6 जागा आहेत. यामध्ये सुलूर, कवुंडमपालयम, कोईम्बतूर उत्तर, कोईम्बतूर दक्षिण, पल्लडम आणि सिंगनाल्लूर यांचा समावेश आहे. त्यापैकी 5 जागांवर अण्णाद्रमुकचे तर एका जागेवर भाजपचे आमदार आहेत. भाजपचे वनाथी श्रीनिवासन दक्षिण कोईम्बतूरचे आमदार आहेत. तर पल्लडममधून एमएसएम आनंदन, सुलूरमधून व्हीपी कंडासामी, कवुंडमपलायममधून पीआरजी अरुणकुमार, कोईम्बतूर उत्तरमधून अम्मान के. अर्जुनन आणि केआर जयराम हे सिंगनाल्लूरचे आमदार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com