Devendra Fadnavis : संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर फडणवीस दिल्लीत ; शहांची भेट घेऊन होणार अंतिम निर्णय

सरकारमधून बाहेर पडून विधानसभेपर्यंत फक्त पक्षकार्याची जबाबदारी द्या, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेनंतर ज्येष्ठ भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून ‘प्रत्यक्ष भेटीत बोलू’, असा निरोप दिला आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis sakal

मुंबई : सरकारमधून बाहेर पडून विधानसभेपर्यंत फक्त पक्षकार्याची जबाबदारी द्या, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेनंतर ज्येष्ठ भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून ‘प्रत्यक्ष भेटीत बोलू’, असा निरोप दिला आहे. नागपूर येथे सकाळी पोहोचल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या भेटीत राजकीय स्थितीवर चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस दिल्लीला रवाना झाले. ‘आता पक्ष स्वत:च्या पायावर उभा आहे. पूर्वी निर्णयात असे-तसे अवलंबून राहणे संपले हे,’ हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नुकतेच काढलेले उद्‍गार, नड्डांचा संपलेला कार्यकाळ या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे.

नवी दिल्लीत ‘एनडीए’शी संबंधित सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची बैठक बोलावण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाची बैठकही दिल्लीत होणार आहे. उद्या (ता.८) होणाऱ्या या बैठकांसाठी फडणवीस दिल्लीला पोहोचले आहेत. तेथे ते शहा तसेच पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी चर्चा करतील, असे समजते. राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही दिल्लीला रवाना झाल्याचे समजते. फडणवीस त्यांच्या भुमिकेवर ठाम रहाणार काय, पक्षनेतृत्व त्यांची मागणी मान्य करणार का, या चर्चा आज राजकीय वर्तुळाबरोबरच मंत्रालयातही सुरु होत्या.

विधिमंडळ अधिवेशनाबाबत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस दूरदृश्‍य प्रणालीव्दारे सामील झाले. आज त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेहमीप्रमाणेच सहभाग घेतल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, फडणवीस यांना सरकारमधून वजा केल्यास मंत्रिमंडळात त्यांची भूमिका कोण निभावणार, याची चर्चा सुरु आहे.

पक्षाने त्यांना प्रदेशाध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष नेमले तर त्यांचे नेतृत्व महाराष्ट्रात कायम राहील पण याचा फायदा होईल का जातीय वातावरणाने पोखरलेल्या महाराष्ट्रात त्यांच्याकडेच पक्षकार्याची जबाबदारी ठेवणे पुन्हा बहुजन समाजाची मते दूर नेणारे ठरेल, याबद्दलही अनेक तर्क केले जात आहेत.

फडणवीस यांनी आता दिल्लीच्या राजकारणातच कर्तृत्व गाजवावे, असे म्हणणार्यांची संख्याही लक्षणीय आहे. महाराष्ट्राबद्दलचे सगळे निर्णय दिल्लीने घ्यायचे अन् त्यानंतर अपयश आले तर फडणवीस यांनी राजीनामा का द्यायचा, असा प्रश्न एक गट करतो आहे. त्याचबरोबर फडणवीसांनी समकालीन नेत्यांना संपवले. २०१४ च्या धवल यशाला ते कायम ठेवू शकले नाहीत असे बोलणाराही मोठा गट आहे. येत्या दोन तीन दिवसांत केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्राबाबत काही निर्णय घेईल, असे समजते.

तावडे राज्यात...

आज दिवसभर राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे महाराष्ट्रात सरकार किंवा संघटनेत परत येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. सत्तास्थापनेच्या घडामोडीत तावडे यांचा सक्रीय सहभाग असल्याने त्यांच्या नावाची चर्चा अधिकच वेगाने सुरु झाली होती. प्रदेश भाजप कार्यालयात सर्वत्र सामसूम पसरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com