Loksabha election 2024 : मोदींचा धडाका जेडीयूला तारणार? मतदान असलेल्या भागांलगत ‘एनडीए’ने घेतल्या सभा

Modi and Nitish Kumar
Modi and Nitish Kumar esakal

पाटणा (बिहार) : बिहारमध्ये अल्पसंख्याकाचे प्रभाव क्षेत्र मानल्या जाणाऱ्या सीमांचल भागातील पाच मतदारसंघांमध्ये ५३ टक्के मतदान झाले. एकीकडे हे मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळच्या अररिया आणि मुंगेर या दोन मतदारसंघांमधील सभांद्वारे राममंदिर आणि मुस्लिमांना ओबीसी श्रेणीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न या दोन मुद्द्यांवरून विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला आक्रमकपणे लक्ष्य करणे, हा एनडीएचा घटक पक्ष संयुक्त जनता दलासाठी भाजपने पुढे केलेला मदतीचा हात मानला जात आहे.

सीमांचल भागातील किशनगंज, भागलपूर, कटिहार, पूर्णिया आणि बांका या पाच मतदारसंघांमध्ये आज मतदान झाले. या पाचही मतदारसंघांची मतदानाची सायंकाळी पाचपर्यंतची सरासरी ५३ टक्के होती. यातील किशनगंज वगळता उर्वरित चारही ठिकाणी २०१९ मध्ये संयुक्त जनता दलाचे खासदार निवडून आले होते. मित्रपक्षांची हीच कामगिरी याही निवडणुकीत कायम राखण्यात हातभार लागावा यासाठी मतदानाच्या दिवशी बिहारमधील अन्य मतदारसंघांमध्ये पंतप्रधान मोदींच्या सलग दोन सभा घेण्याची रणनिती एनडीएतर्फे आखण्यात आली होती. अररिया आणि मुंगेर या दोन्ही मतदारसंघांमध्ये अनुक्रमे ७ मे आणि १३ मे रोजी मतदान आहे. असे असताना पंतप्रधान मोदींची शुक्रवारची सभा आणि त्यातील मुद्दे दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना चांगलेच लक्षवेधी ठरले.

Modi and Nitish Kumar
Nasim Khan: नसीम खान यांचा काँग्रेसच्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा; खर्गेंना लिहिलं सविस्तर पत्र

बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्ला चढविताना, राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याकडे ‘इंडिया’आघाडीच्या नेत्यांनी फिरवलेली पाठ तसेच कर्नाटकमध्ये कॉंग्रेसने मुस्लिमांना ओबीसी श्रेणीतून आरक्षण देण्याचा केलेला प्रयत्न हे मुद्दे आक्रमकपणे मांडले. राममंदिराच्या विरोधात दोन पिढ्यांपर्यंत न्यायालयीन खटला लढणाऱ्या अन्सारी कुटुंबीयांनी राममंदिर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य केला.

एवढेच नव्हे तर रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातही अन्सारी स्वतः सहभागी झाले होते. मात्र, कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली. ही मंडळी स्वतःला रामापेक्षा मोठे मानतात असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केला. तर कर्नाटकमध्ये कॉंग्रेस धर्माच्या नावाखाली आरक्षणाचा धोकादायक खेळ खेळत असल्याचे शरसंधान पंतप्रधानांनी केले. एका रात्रीत कागदावर शिक्का मारून मुस्लिमांना कॉंग्रेसने ओबीसी बनविले. हेच काम त्यांना बिहारमध्ये आणि देशाच्या इतर भागात करायचे आहे. यातून यादव, कुर्मी, निषाद, कुशवाहा आणि अन्य मागास जातींच्या अधिकारांवर दरोडा घालायचा आहे, असाही हल्लाबोल करून पंतप्रधान मोदींनी भावनिक साद घातली.

अशा आहेत लढती

सीमांचल भागातल्या किशनगंजमध्ये कॉंग्रेस विरुद्ध संयुक्त जनता दल विरुद्ध ‘एमआयएम’ या तीन पक्षांच्या तीन मुस्लिम उमेदवारांमध्ये तिरंगी लढत आहे. २०१९ मध्ये किशनगंजमधून कॉंग्रेसचे महम्मद जावेद विजयी झाले होते. त्यांनाच कॉंग्रेसने येथून पुन्हा उमेदवारी दिली. तर त्यांच्या विरुद्ध संयुक्त जनता दलाचे मुजाहिद आलम उमेदवार असताना ‘एमआयएम’ने अख्तरुल इमान यांना मैदानात उतरविले.

जवळच्याच कटिहारमध्ये कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते तारिक अन्वर तर संयुक्त जनता दलाचे खासदार दुलालचंद गोस्वामी यांचा मुकाबला होता. तर पुर्णियामध्ये देखील संयुक्त जनता दलाचे विद्यमान खासदार संतोष कुशवाहविरुद्ध राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार बीमा भारती यांची मुख्य लढत असून कॉंग्रेसचे बंडखोर नेते पप्पू यादव यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे पुर्णियाची लढत तिरंगी झाली आहे. याखेरीज भागलपूर आणि बांका मतदारसंघांमध्ये देखील संयुक्त जनता दलाने खासदार अनुक्रमे अजय मंडल व गिरिधारी यादव यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरुद्ध भागलपूरमध्ये कॉंग्रेसचे अजित शर्मा आणि बांकामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे जयप्रकाश नारायण यादव उमेदवार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com