Lok Sabha Election : दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी पाच हजार स्वयंसेवकांची नियुक्ती

लोकसभा निवडणूक मतदान; समाजकल्याण अधिकारी कोरगंटीवार यांची माहिती
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionSakal

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दिव्यांग मतदारांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करता यावे, यासाठी दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने पाच हजार ११८ स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. हे स्वयंसेवक दिव्यांग मतदारांना मतदानादिवशी मदतीचा हात देणार आहेत.

यानुसार दिव्यांगांना मतदान सुरक्षितपणे मतदान केंद्रात पोचण्यासाठी हे स्वयंसेवक मदत करणार आहेत. यासाठी मतदान केंद्रांवर ३ हजार ३५३ तीनचाकी गाड्या (व्हील चेअर) उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे लोकसभा निवडणूक दिव्यांग कक्षाचे समन्वयक आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी गुरूवारी (ता.२) सांगितले.

पुणे जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात दिव्यांगांना सुलभतेने मतदान करता यावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या विविध सुविधांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कोरगंटीवार यांनी ही माहिती दिली.

दिव्यांगत्वानुसार करण्यात आलेल्या विविध सुविधांची माहिती ही दिव्यांग क्षेत्रात कार्यरत सर्व संस्था-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी प्रहार अपंग संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. या मागणीवरून आज पुणे जिल्हा परिषदेत ही बैठक घेण्यात आली.

यावेळी जिल्हा समाजकल्याण विभागातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ, निमवैद्यकीय अधिकारी किरण बोडके, सुदेशना राव, पुणे महापालिकेच्या समाजविकास विभागाचे अधिकारी रामदास चव्हाण, भावना मोहोड, प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सातव, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा ढवळे,

पुणे शहर पदाधिकारी सुनंदा बामणे, सुजाता पवार,सचिन ओव्हाळ, संगीता राऊत, संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे, दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे प्रदीप कामठे, पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशनचे रफिक खान,आकाश कुंभार, राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या नीता ढवाण, रेडक्रॉस मूकबधिर स्वयंरोजगार संस्थेचे सुजित गोयर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात ७५ हजार दिव्यांग मतदार

पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी ३ हजार ११७ ठिकाणी मिळून एकूण आठ हजार ३८२ मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण ७५ हजार ३९ दिव्यांग मतदार आहेत.

या सर्वांच्या मदतीसाठी विविध मतदान केंद्रांवर एकूण ३ हजार ३५७ तीनचाकी गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय पाच हजार ११८ स्वंयसेवक नियुक्त करण्यात आलेले आहेत.

दिव्यांग मतदारांच्या प्रमुख मागण्या

- निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सक्षम ॲपद्वारे मागणी केलेल्या मतदारांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

- दिव्यांगांसाठी इमारतींच्या तळ मजल्यावर मतदान केंद्र करण्यात यावे

- रॅम्प, पुरेशा व्हीलचेअरची सोय करावी

- दिव्यांग मतदारांची स्वतंत्र रांग असावी

- दिशादर्शक फलक, पिण्याचे पाणी, प्रतीक्षा शेड, पार्किंगची सोय उपलब्ध करावी

- गरजेनुसार स्वयंसेवक, प्रथमोपचार पेटी, मदत कक्ष आदी सुविधा उपलब्ध कराव्यात

- अंशतः: अंध दिव्यांगांसाठी भिंगाच्या काचा, ब्रेल लिपीतील साहित्य उपलब्ध करून द्यावे

- कर्णबधिर दिव्यांगांसाठी साइन लॅंग्वेज दुभाषक, ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था असावी

मतदान करण्याचे दिव्यांगांना संघटनांचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सातव, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा ढवळे आणि संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांना केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com