Mallikarjun Kharge Interview : सत्तेत राहण्यासाठी मोदींना भ्रष्ट लोक हवेत ; काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा पंतप्रधानांवर थेट हल्ला

काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर एखाद्या मराठी वर्तमानपत्राला प्रथमच मुलाखत देताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी यंदाच्या निवडणुकीसंदर्भात तसेच निवडणुकीनंतर तयार होणाऱ्या संभाव्य समीकरणावर मत मांडले.
Mallikarjun Kharge Interview
Mallikarjun Kharge Interviewsakal

विकास झाडे, सुरेश भुसारी: सकाळ न्यूज नेटवर्क

काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर एखाद्या मराठी वर्तमानपत्राला प्रथमच मुलाखत देताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी यंदाच्या निवडणुकीसंदर्भात तसेच निवडणुकीनंतर तयार होणाऱ्या संभाव्य समीकरणावर मत मांडले. दलित कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीने काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करून देशातील सर्वांत जुन्या पक्षाचे नेतृत्व करण्यापर्यंत झेप घेतली आहे. मूळ कर्नाटकातील असलेल्या खर्गेंना मराठी भाषाही चांगली अवगत आहे. जवळपास ४५ मिनिटांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले.

नवी दिल्ली : ‘‘भाजपचे मुख्य मिशन सत्तेत राहण्याचे आहे. एकीकडे राजा हरिश्चंद्राचा अवतार असल्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे देशातील सर्व भ्रष्ट व्यक्तींना भाजपमध्ये सामावून घ्यायचे. केवळ सत्तेत टिकून राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्ट व्यक्तींना अभय देतात,’’ अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

प्रश्न : मतदानाचे दोन टप्पे संपले आहेत. यात काँग्रेसला यश मिळेल का?

- या दोन्ही टप्प्यांत काँग्रेस व इंडिया आघाडीला चांगले यश मिळणार आहे. जवळपास १९० मतदारसंघांत मतदान संपले आहे. तमिळनाडू, केरळ, तेलंगण, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम, हिमाचल प्रदेशात काँग्रेसच्या खासदारांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे.

काँग्रेसला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे पंतप्रधान मोदी अधिक आक्रमक झाले आहेत का?

- निश्चितच. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतरचा कल बाहेर आल्यामुळे त्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे. मोदींनी त्यामुळेच काँग्रेस, गांधी कुटुंबावर हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. संपत्ती वाटपाचा मुद्दाही त्यांनी काढला. हिंदू-मुस्लिम मुद्दे समोर आणले. मतदारांत भीती निर्माण करायचा उद्देश त्यामागे आहे.

या मागचे कारण काय असावे?

- केवळ निराशा. निराशेमुळे माणूस भ्रमित होतो. परंतु पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीने

अशी वक्तव्ये करायला नकोत. संपत्ती वाटप आणि मंगळसूत्र काढून घेण्याचा मुद्दा काँग्रेसच्या जाहीरनाम्यातच नाही.

लोकांमधील असंतोष मतपेटीतून दिसेल?

- लोकांचा मोदी सरकारवर राग आहे. हा अंतर्प्रवाह आहे. इंडिया आघाडीचा मतदार हा अदृश्य आहे. बेरोजगारीमुळे लोकांमध्ये खूपच असंतोष आहे. हा असंतोष यावेळी मतदानातून दिसणार आहे.

महिलांना एक लाख रुपये देण्याची काँग्रेसची घोषणा आहे. हे सयुक्तिक आहे का?

- ही गॅरंटी देण्यासाठी मोदी सरकारनेच काँग्रेसला भाग पाडले आहे. लोकांच्या हाताला काम नाही, नवे रोजगार नाहीत. या लोकांनी करायचे काय? हा गरीब उपाशी मरत आहे. तेव्हा त्याला मदत करण्याची आवश्यकता आहे. देशातील गरीब जगला पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे. मोदी सरकारची दहा वर्षे काँग्रेसला शिव्या देण्यात गेली. दोन कोटी रोजगाराचे आश्वासन दिले होते. किती नोकऱ्या दिल्या? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते. पण ट्रॅक्टर, कृषीसाठी आवश्यक सर्व सामुग्रीवर जीएसटी वाढविला. पेट्रोल, गॅस महागला. सर्वसामान्यांसाठी मोदी सरकारने नेमके केले काय? हा प्रश्‍नच आहे.

Mallikarjun Kharge Interview
Loksabha Election 2024 : ‘व्होट जिहाद’ हीच ‘इंडिया’ची रणनीती ; आणंदमधील सभेत पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

मोदीजी म्हणतात, ‘मोदी की गॅरंटी’ आहे.

- पंधरा लाख रुपये देण्याची गॅरंटी त्यांनीच दिली होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन त्यांचेच आहे. दहा वर्षांपूर्वी दिलेल्या गॅरंटीचे काहीही झाले नाही, आता कोण विश्‍वास ठेवणार?

काँग्रेस यंदा कमी जागा लढवीत आहे.

- प्रत्येक राज्यात चर्चा करून जागावाटप करण्यात आले. इंडिया आघाडीतील पक्षांना अधिक जागा देण्यासाठी आम्ही काही जागा सोडल्या. ही आघाडी मजबूत असावी ही काँग्रेसची भूमिका आहे. यासाठी काँग्रेसने एक पाऊल मागे घेतले.

असे असतानाही नितीशकुमार आघाडीतून बाहेर का पडले?

- नितीशकुमार आयाराम गयाराम आहेत. ‘राजद’सोबत इतके वर्षे काम केल्यानंतर आता ते म्हणतात की, लालूप्रसाद यादव हस्तक्षेप करतात. नितीशकुमारांचे हे वागणे म्हणजे पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे. परंतु त्यांना भाजपकडे जाऊन पश्चात्तापच होईल.

काँग्रेसच्या खासदारांची संख्या तीन आकड्यांवर जाईल काय?

- जितकी माझी राजकीय समज आहे, त्यानुसार सांगतो. आम्ही भाजपला सत्तेपासून रोखणार आहोत. तेवढ्या जागा इंडिया आघाडीला निश्चितपणे मिळतील.

मोदींच्या भाषणात मटण, मच्छी, मंगळसूत्र, मुघल या शब्दांचा बराच वापर होतो.

- पंतप्रधान असलेल्या व्यक्तीला अशी भाषा शोभा देत नाही. असे शब्द वापरून आपण देशाला मोठे करू शकतो का? यापूर्वी जे कोणते नेते होते, त्यापैकी एकाही नेत्याने अशा भाषेचा वापर केला नाही. भाजप पराभूत होत असल्याचे मोदींना समजले आहे.

तुम्ही म्हणता, ते राज्यघटना बदलतील. याला काय आधार?

- रा. स्व. संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत याबाबत बोलले आहेत. नंतर त्यांच्यावर उलटल्यानंतर मात्र त्यांनी नकार दिला. आता म्हणतात आरक्षणाची गरज आहे. त्यांचे खासदार व आमदारही हीच भाषा बोलत आहेत. राज्यघटना बदलण्यासाठी चारशे जागांची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले होते. जेव्हा अशी भाषा पक्षातील जबाबदार लोक बोलतात व पंतप्रधान मोदी यावर मौन बाळगतात, तेव्हा अर्थ काय घ्यायचा? त्यामुळेच काँग्रेसने ‘राज्यघटना वाचवा’, ‘लोकशाही वाचवा’ असे अभियान सुरू केले आहे.

अमेठी व रायबरेली हे मतदारसंघ गांधी परिवाराकडेच राहतील का?

- नुकतीच केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली असून तीन मे पर्यंत स्पष्टता येईल.

पंतप्रधानपदाबद्दल चर्चा सुरू आहे. याकडे आपण कसे पाहता?

- भाजपला पराभूत करणे, हे आमचे पहिले लक्ष्य आहे. यानंतर ‘इंडिया’ आघाडीचे नेते एकत्रित बसून याबाबत निर्णय घेतील. आमचा पक्ष सत्तेपेक्षा जे तत्त्वाची लढाई लढतात, त्यांच्यासोबत राहतो. यात पक्षाला नुकसान झाले तरी पर्वा नाही. यामुळे ‘इंडिया’ आघाडीचे नेते निवड करेल, तीच व्यक्ती पंतप्रधान होईल.

पंतप्रधान मोदी त्यांच्या शब्दकोशात असलेल्या सर्व शिव्यांचा वापर गांधी-नेहरू परिवारातील नेत्यांसाठी करतात. शब्दकोशातील एक एक शब्द शोधून काढून ते शिव्या देतात. पंतप्रधान मोदी हे पुजारी आहेत. राममंदिराची पूजा त्यांनीच केली. संसदेच्या इमारतीच्या उद्‌घाटनाची पूजा त्यांनीच केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व रामनाथ कोविंद यांना हा अधिकार मिळाला नाही.

- मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, काँग्रेस

महाराष्ट्रात ३-१३ -९-१८ पक्ष

महाराष्ट्रात सर्व जागा जिंकू, असे मोदींना वाटते. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर महाराष्ट्रात ३-१३-९-१८ पक्ष झाले. परंतु लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. आता महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींना दररोज सभा घ्याव्या लागत आहेत.

शरद पवार हे युवकांची प्रेरणा

शरद पवार हे ८३ व्या वर्षी गावोगावी उन्हातान्हात फिरत आहेत. मनात आणले असते तर ते घरी बसून राहू शकले असते. परंतु जेव्हा राज्यघटना वाचविण्याची वेळ आली, तेव्हा शरद पवार घराबाहेर पडले. त्यांचा हा उत्साह युवकांना प्रेरणा देणारा आहे. माझे वय ८२ वर्षे आहे. मी सुद्धा फिरत आहे. इच्छाशक्ती असली की सर्व काही होते.

गांधी परिवाराशी सलोख्याचे संबंध

गांधी कुटुंबाशी माझे अत्यंत सौहार्दाचे संबंध आहेत. सोनियाजी असो किंवा राहुल गांधी असो, ते नेहमीच माझा सन्मान करतात. माझ्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली आहे. यामुळे राहुल गांधी मला आधार देतात. हे सर्व प्रेमातून होते.

सांगली गेल्याचे दुःख

महाराष्ट्रातील काही जागांवर काँग्रेसला पाणी सोडावे लागले, याचे दुःख आहे. दक्षिण-मध्य मुंबई हा एकनाथ गायकवाड यांचा मतदारसंघ होता. परंतु उद्धव ठाकरेंनी यासाठी आग्रह धरला. त्याचप्रमाणे सांगली तर आमच्या वसंतदादा पाटील यांचा मतदारसंघ होता. परंतु आघाडीमध्ये काही तडजोडी कराव्या लागतात. हे मतदारसंघ गेल्याचे दुःख आहेच. पक्षाने या जागा सोडल्या तरी या मतदारसंघांत मोठ्या मताधिक्याने विजय व्हावा यासाठी काँग्रेस आणि मित्रपक्ष काम करत आहेत.

चीनवर डोळे कधी वटारणार?

चीनने आपल्या देशावर आक्रमण केले आहे. अनेक गावे काबीज केली आहेत. या चीनवर डोळे वटारण्याची हिंमत पंतप्रधान मोदींमध्ये नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com