महामुंबईचा कौल कुणाला? आजच्या मतदानाकडे लक्ष; तीन मतदारसंंघांत शिवसेना वि. शिवसेना

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दक्षिण-मध्य मुंबई या मतदारसंघात अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे अशा दोन्ही शिवसेना उमेदवारांत लढत आहे.
mumbai lok sabha election voting day know who will win know here
mumbai lok sabha election voting day know who will win know hereSakal

Mumbai News : मुंबईत तीन मतदारसंघांत शिवसेना विरुद्ध शिवसेना, दोन ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप; तर एका मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत रंगली आहे. दक्षिण मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांच्याविरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव अशी लढत रंगली आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दक्षिण-मध्य मुंबई या मतदारसंघात अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे अशा दोन्ही शिवसेना उमेदवारांत लढत आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबई या मतदारसंघात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील उभे आहेत.

उत्तर-पश्चिम मुंबई मुख्य लढत ही शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर विरुद्ध शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात आहे. उत्तर-मध्य मुंबई या मतदारसंघात वर्षा गायकवाड यांची लढत भाजपच्या ॲड. उज्ज्वल निकम यांच्याशी आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघात मिहीर कोटेचा यांच्याविरुद्ध ठाकरे शिवसेनेचे संजय दिना पाटील यांच्यात जोरदार लढत आहे.

ठाण्यात तीन जागांसाठी सात जणांमध्ये चुरस

लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवाचे काउंटडाउन सुरू झाले असून, आज ठाणे जिल्ह्यात मतदान होत आहे. पाचव्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघातून संसदेत जाण्यासाठी तब्बल ७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

यात प्रमुख सात उमेदवारांमध्ये ‘कांटे की टक्कर’ आहे. त्यामुळे चुरस शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी तिन्ही मतदारसंघांत थेट लढत असली तरी दोन ठिकाणी दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

ठाणे लोकसभा मतदारसंघात २४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये शिवसेनेचे (शिंदे) नरेश म्हस्के विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यात थेट लढत आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक २८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यात शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे विरुद्ध शिवसेना ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर-राणे यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात महायुतीचे विद्यमान खासदार कपिल पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्यात प्रमुख लढत आहे; मात्र या दोघांनाही अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांचे आव्हान असल्याचे मानले जाते.

पालघरमध्ये तिरंगी लढत

पालघर लोकसभा मतदारसंघात १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महायुतीचे डॉ. हेमंत सवरा, महाविकास आघाडीच्या भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे.

कामडी यांच्या प्रचारासाठी पालघरमध्ये उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा सभा घेतल्या आहेत, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रत्येकी एक सभा झाली. अन्य पक्षाचे व अपक्ष उमेदवारदेखील या निवडणुकीत महत्त्वाची मते घेतील अशी चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com