Loksabha Election Voting : आयर्लंड, अमेरिकेहून येत दांपत्य, युवतींचे मतदान; मराठवाड्यातील परदेशस्थ भारतीयांनीही बजावले राष्ट्रीय कर्तव्य

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यावेळी प्रशासनाने जोरकस प्रयत्न केल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे नवमतदारांसह देश-विदेशातील भारतीय नागरिकांमध्येही मतदानाबाबत उत्साह पाहावयास मिळाला.
Loksabha Election Voting
Loksabha Election Votingsakal

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यावेळी प्रशासनाने जोरकस प्रयत्न केल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे नवमतदारांसह देश-विदेशातील भारतीय नागरिकांमध्येही मतदानाबाबत उत्साह पाहावयास मिळाला. नोकरीनिमित्त आयर्लंड, अमेरिकेत असलेल्या मराठवाड्यातील अनेक मतदारांनी सोमवारी (ता. १३) गावी येत आपला मतदानाचा हक्क बजावला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील अमोल अरुणराव पदे हे नोकरीनिमित्त आयर्लंडची राजधानी असलेल्या डब्लिनजवळील किल्कीनी शहरात वास्तव्यास आहेत. ते एका नामांकित कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. भारतीय लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते खास सुटी घेऊन काही दिवसांपूर्वीच भारतात आले. सोमवारी (ता. १३) अमोल पदे व त्यांच्या पत्नी पल्लवी पदे यांनी गंगापुरातील जि.प. शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

बीड जिल्ह्यातील माजलगावच्या प्रीती जुगलकिशोर मानधने या काही वर्षांपासून अमेरिकेतील न्यू जर्सी येथे नोकरी करत आहेत. त्याही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी न्यू जर्सीहून नागपूरला पोचून तेथून माजलगावात दाखल झाल्या होत्या. त्यांनी सोमवारी मतदान केले.

माजलगावातीलच सिद्धी प्रभाकर साळेगावकर या आयर्लंडची राजधानी डब्लिन शहरातील आयरीश बॅंकेत नोकरी करत आहेत. सिद्धी या दोन दिवसांपूर्वीच खास सुटी घेऊन आपल्या गावी दाखल झाल्या. माजलगावातील महात्मा फुले विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन सकाळीच कुटुंबीयांसमवेत त्यांनी मतदानाचा हक्‍क बजावला. याचबरोबर छत्तीसगड येथे असलेल्या डॉ. जगन्नाथ विजयकुमार कुलकर्णी यांनीही माजलगावात मतदानाचा हक्क बजावला.

मतदान हे राष्‍ट्रीय कर्तव्य असून, भारतीय लोकशाही संपूर्ण जगभरात समृद्ध आणि प्रगल्भ समजली जाते. त्यामुळे मी लोकसभा निवडणुकीत मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी गावी आलो. मातृभूमीतील लोकशाहीच्या या उत्सवात मला सपत्नीक सहभागी होता आले, याबद्दल खूप समाधान वाटले.

—अमोल अरुणराव पदे, (किल्किनी, आयर्लंड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com