West Bengal CM Mamata Banerjee
West Bengal CM Mamata Banerjee esakal

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

वर्धमान (पश्चिम बंगाल)ः पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसकडून भ्रष्टाचार आणि लांगूलचालनाचे राजकारण केले जात असून राज्यात हिंदूंना दुसऱ्या श्रेणीतील नागरिक बनविण्याचा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पंतप्रधानांनी शुक्रवारी राज्यातील वर्धमान, दुर्गापूर आणि कृष्णनगर येथे एका पाठोपाठ एक जाहीर सभा घेत विरोधकांवर टीकास्त्रे सोडली.

मोदी म्हणाले, ‘‘ राज्यामध्ये तृणमूल काँग्रेसकडून लांगूलचालनाचे राजकारण केले जाऊ लागले असून त्यामुळेच त्यांनी संदेशखालीतील मुख्य आरोपीला हात लावलेला नाही. येथील महिलांवरील अत्याचार पाहून अवघा देश संतप्त झाला होता पण या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम तृणमूल काँग्रेसने केले.

मुख्य सूत्रधाराला अखेरपर्यंत संरक्षण देण्याचे काम तृणमूल काँग्रेसनेच केले होते. हिंदूंनी या राज्यामध्ये द्वितीय श्रेणीचे नागरिक का व्हावे? तृणमूल काँग्रेसच्या आमदाराने हिंदूंना आम्ही भागीरथी नदीमध्ये फेकून देऊ असे विधान केले होते. हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे? तृणमूल काँग्रेससाठी मानवतेपेक्षाही लांगूलचालन महत्त्वाचे आहे का?’’ ‘तृणमूल’चे मुर्शिदाबाद जिल्ह्यातील आमदार हुमायूँ कबीर यांनी केलेल्या विधानावर देखील मोदींनी टीका केली. संदेशखालीत मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडला होता. ही सगळी शस्त्रे राज्यातील लोकशाही मजबूत करण्यासाठी आणण्यात आली होती का? तृणमूल काँग्रेसने नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला होता, असेही मोदींनी सांगितले.

'त्या' उमेदवारांसाठी वेगळा सेल

राज्यातील शालेय सेवा आयोगाने केलेल्या गैरव्यवहारामुळे हजारो प्रामाणिक शिक्षक आणि उमेदवारांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. या शिक्षकांना मदत करण्यासाठी पश्चिम बंगाल भाजपने वेगळा कायदेशीर विभाग तयार करावा असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या गैरव्यवहारातील दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी पण निष्पाप लोकांना त्रास होता कामा नये असेही मोदी म्हणाले. ‘‘ तृणमूल काँग्रेसने केलेला गैरव्यवहार ही लाजीरवाणी गोष्ट आहे. यामुळे अनेक प्रामाणिक उमेदवारांना त्रास सहन करावा लागला. या उमेदवारांना मदत करण्यासाठी प्रदेश भाजपला वेगळा कायदेशीर सेल तयार करण्यास आम्ही सांगितले आहे,’’ असे मोदी यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com