राहुल -अखिलेश यांनी जागा दाखविली

लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अखिलेश आणि राहुल यांच्या ‘टीम’चा विजय असल्याचेच अधोरेखित झाले आहे.
rahul gandhi and akhilesh yadav election in lok sabha election 2024
rahul gandhi and akhilesh yadav election in lok sabha election 2024Sakal

- शरत प्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या दोघांचा उल्लेख सातत्याने पराभूत असा केला होता, त्याच अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान आणि सर्व शक्तिमान सत्ताधीशांनासुद्धा पराभूत करत पंतप्रधान मोदी आणि भाजपला जागा दाखवली आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अखिलेश आणि राहुल यांच्या ‘टीम’चा विजय असल्याचेच अधोरेखित झाले आहे. विशेषतः २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात मोठा वाटा असणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजप ८० जागा जिंकेल हा अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांचा दावा या जोडगोळीने फोल करून दाखवाल आहे.

मताधिक्य घटल्याचा धक्का

यावेळी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा सुरू झाल्यापासूनच मतदारांना आकर्षित करण्यासाठी ब्रॅंड मोदींची दमछाक होत असल्याचे स्पष्ट झाले होते. ही दमछाक सातव्या टप्प्यापर्यंत अधिक ठळकपणे दिसली.

मात्र भाजपला बसलेला सर्वांत मोठा धक्का जर कोणता असेल तर तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे मताधिक्य. पंतप्रधान मोदी यांना यावेळी मिळालेले मताधिक्य हे सुमारे दीड लाख एवढे आहे, तर मागील निवडणुकीत त्यांना ४ लाख ६० हजार ४६७ एवढे मताधिक्य मिळाले होते.

तर यावेळी मोदींना दहा लाख मतांनी विजयी करण्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. या उलट राहुल गांधी यांना रायबरेली येथून तीन लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे.

संपूर्ण राज्यात त्यांचे मताधिक्य सर्वाधिक आहे. याशिवाय उत्तर प्रदेशात भाजपला बसलेला आणखी एक मोठा धक्का म्हणजे अमेठी. येथील भाजप उमेदवार स्मृती इराणी यांचा झालेला पराभव हा भाजपसाठी आणखी एक धक्का मानला जात आहे.

राममंदिराच्या मुद्द्याचा लाभ नाही

पंतप्रधान मोदी यांच्या प्रभावाशिवाय भाजप हा आणखी जर कोणत्या मुद्द्यावर अवलंबून असेल तर तो मुद्दा म्हणजे राममंदिर. अयोध्येतील राम मंदिर निर्मितीच्या मुद्द्याचा लाभ घेण्याचा भाजपकडून पुरेपूर प्रयत्न करण्यात आला.

भाजपच्या एकाही नेत्याने याचे श्रेय कधीही सर्वोच्च न्यायालयाला दिले नाही, ज्या न्यायालयाच्या निकालाने राम मंदिराच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला. अयोध्येमध्ये झालेल्या भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आणि राममंदिराच्या निर्मितीचे श्रेय भाजपला मिळून त्याचे रूपांत मतांमध्ये होईल अशी आशा भाजपला होती.

अयोध्या आणि उत्तर प्रदेशातील पूर्वांचल येथे तरी याचा लाभ होईल अशी भाजपला आशा होती. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये भव्य रोड शोचे आयोजनही केले होते. मात्र, रामममंदिराच्या मुद्द्याचा लाभ भाजपला झाला नाही हे निकालावरून स्पष्ट झाले.

फैजाबाद मतदार संघात (अयोध्या) समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश कुमार यांनी भाजपच्या लालूसिंह यांचा ५० हजारहून अधिक मतांनी पराभव केला. इतकेच नव्हे तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मताधिक्य देखील मागील वर्षीच्या तुलनेमध्ये ६० हजाराने कमी झाले असून हासुद्धा भाजपसाठी धोक्याचा इशारा ठरला आहे.

भाजपचे स्टार प्रचारक असलेल्या अमित शहा यांनी सातत्याने ज्या पक्षाच्या नेत्यांचा उल्लेख पराभूत असा केला होता त्या अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या पक्षांसह इंडिया आघाडीने उत्तर प्रदेशात ४०च्या वर जागांवर विजय मिळविला आहे.

पूर्वेतिहास पाहता कांशीराम यांनी दलित मतदार हा समाजवादी पक्षापसून दूर नेला असल्यामुळे समाजवादी पक्षाकडे दलित मतदार जाणार नाहीत हा भाजपचा अंदाजही चुकीचा ठरला. कारण बहुसंख्य दलित मतदारांनी यावेळी ‘एनडीए’ऐवजी ‘इंडिया’ आघाडीला मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे.

राहुल आणि अखिलेश यांनी महागाई आणि बेरोजगारी यांसारखे मुद्दे उपस्थित केल्याने त्यांना युवावर्गाचा चांगला पाठिंबा मिळाला.सरतेशेवटी हुकुमशाहीला आणि बुलडोझरच्या धोरणाला उत्तर प्रदेशातील जनतेने मतपेट्यांतून उत्तर देत या धोरणांबाबत नापसंती दर्शवली आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनाविरुद्धही लोकांच्या मनातील असलेला असंतोष आणि खदखद या निकालांतून व्यक्त झाली आहे. त्‍याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित न करता धार्मिक ध्रुवीकरण केलेले जनतेला रुचलेले नसल्याचे या निकालाने दाखवून दिले आहे.

राज्यघटनेचा मुद्दा ठरला महत्त्वाचा

भाजपला जर ४००पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर भाजप राज्यघटना बदलेल. त्याचप्रमाणे मागासवर्गीयांचे आरक्षण हिरावून घेईल असा आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारात केला होता, तो मुद्दा दलित समुदायातील अनेकांना पटला. राहुल गांधी यांनी हा मुद्दा लोकांना पटवून दिला. याला प्रत्युत्तर देण्यास भाजपने केलेला प्रयत्न फोल ठरल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com