राज्य-मिती : प्रस्थापितांच्या विरोधी लाट की भाजपचा थाट?

राजस्थानातील जनता मागील खेपेप्रमाणे हिंदुत्वाला साथ देते की प्रस्थापित विरोधी लाटेवर स्वार होते? या प्रश्नाचे उत्तर राज्यातील विजेता ठरवेल. सध्या प्रचारात सत्ताधाऱ्यांनी आघाडी घेतली असलीतरीसुद्धा ऐनवेळी चित्र पालटू शकते.
राज्य-मिती
राज्य-मितीsakal

राजस्थान :

राजस्थानातील जनता मागील खेपेप्रमाणे हिंदुत्वाला साथ देते की प्रस्थापित विरोधी लाटेवर स्वार होते? या प्रश्नाचे उत्तर राज्यातील विजेता ठरवेल. सध्या प्रचारात सत्ताधाऱ्यांनी आघाडी घेतली असलीतरीसुद्धा ऐनवेळी चित्र पालटू शकते. भाजपच्या पाठीशी विधानसभा निवडणुकीतील दणदणीत यश असून काँग्रेसला मात्र निकराचा संघर्ष करावा लागेल.

‘‘ आज दुश्मन को भी पता है यह मोदी है,

यह नया भारत है, यह नया भारत घर में घुसकर मारता है। ’’

‘‘ उनको लगने लगा है की अगर राम का नाम लिया पता नहीं कब राम-राम हो जाए। ’’

राजस्थानच्या चुरू येथील सभेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे उद्‍गार प्रचाराची दिशा निश्चित करणारे ठरले. हिंदी पट्ट्यातील भाजपच्या भगव्या राजकारणाची हक्काची प्रयोगशाळा बनलेल्या राजस्थानच्या रणात लोकसभेचे वारे वाहू लागले आहेत.

राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाची कॅप्सूल मतदारांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत असताना दुसऱ्या बाजूला विरोधी काँग्रेसने मात्र ‘लोकशाही बचाओ’चा नारा दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ‘राम लहर’ भाजपच्या मदतीला धावून आली होती. आताही सत्ताधाऱ्यांकडून रामनामाचा जप सुरू असून त्याला राष्ट्रवादाची फोडणी दिली जात आहे. मोदींच्या चुरू येथील सभेत त्याची चुणूक दिसून आली.

दुसऱ्या बाजूला जयपूरमध्ये झालेल्या सभेत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी नेमका याच मुद्द्याला स्पर्श करत पंतप्रधान हे स्वतःला देशापेक्षाही मोठे समजतात. सध्या तेच राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. जातीय समीकरणे प्रबळ असलेल्या राजस्थानात नेहमीच प्रस्थापित विरोधी वावटळ उठताना पाहायला मिळते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फटका काँग्रेसला बसला होता. आता लोकसभेच्या निमित्ताने भाजपचाही कस लागणार आहे.

राज्य-मिती
Narendra Modi : काँग्रेसची भाषा विभाजनवादी ; चंद्रपुरातून फोडला प्रचाराचा नारळ,उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा

मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजपनेच येथे बाजी मारली होती. २०१४ मध्ये सर्वच म्हणजे २५ आणि २०१९ मध्ये २४ जागा भाजपच्या पारड्यात पडल्या होत्या. आता हाच स्ट्राईक रेट कायम ठेवायचा असेल तर नेत्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. दुसरीकडे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसने बरोबर कळीच्या मुद्यांना हात घातला आहे. त्यात आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना (ईडब्लूएस) आरक्षणाचे आश्वासन देतानाच शेतमालाच्या किमान हमी भावासाठी (एमएसपी) कायदा करू असे वचन देण्यात आले आहे. याचा परिणाम उत्तर राजस्थानमध्ये पाहायला मिळू शकतो. याशिवाय महागाई आणि वाढती बेरोजगारी हे दोन मुद्दे जोडीला आहेतच.

राज्यात येत्या १९ एप्रिल रोजी गंगानगर, बिकानेर, चुरू, झुनझुनू, सिकर, जयपूर शहर, जयपूर ग्रामीण, अलवर, भरतपूर, करौली- धोलपूर, दौसा आणि नागौर या बारा मतदारसंघांत मतदान होत आहे. बिकानेरमध्ये केंद्रीयमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्याविरोधात माजी मंत्री गोविंदराम मेघवाल हे मैदानात आहेत.

चुरू येथून भाजपने राहुल कासवान यांच्या उमेदवारीला कात्री लावतानाच पॅरा ऑलिंपियन देवेंद्र झाजरिया यांना मैदानात उतरविले आहे. उमेदवारी न मिळाल्याने बंडाचे निशाण रोवणारे राहुल यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश करत येथून उमेदवारी मिळविली. काँग्रेसने सीकरची जागा मित्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकप) सोडली असून येथे सुमेधानंद सरस्वती विरुद्ध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमराराम यांच्यात थेट लढत असेल. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या समस्यांवर लाखोंचे मोर्चे काढणारे आमराराम यांना आता किती मते मिळतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शेखावती सांगतो राज्याचा नूर

सिकर हा मतदारसंघ कधीकाळी राजस्थानातील ऐतिहासिक प्रदेश असलेल्या शेखावतीचा भाग मानला जातो. राज्याच्या राजकारणातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत? याचा अचूक वेध येथील हवेलीतून घेता येतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासारा यांचा सिकर बालेकिल्ला असल्याने येथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत आमराराम यांना विजयी करायचेच असा निश्चय त्यांनी केला आहे. ‘इंडिया’ आघाडीचाच घटक पक्ष असलेल्या काँग्रेस अन् डाव्या पक्षांत मागील काही दिवसांपासून सातत्याने वाद होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे येथील संघटनात्मक बळ डाव्यांना कसे साथ देते? याकडे सर्वांचे लक्ष असेल.

दौसात पायलट यांची प्रतिष्ठा पणाला

जयपूर शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचा प्रभाव असला तरीसुद्धा काँग्रेस येथे तुल्यबळ लढत देऊ शकते. जयपूर ग्रामीण येथून भाजपचे राव राजेंद्रसिंह विरुद्ध काँग्रेसचे अनिल चोपडा अशी लढत होईल. मागील खेपेस येथूनच राज्यवर्धनसिंह राठोड विजयी झाले होते. काँग्रेसचे चोपडा हे विद्यार्थी नेते असून याआधी त्यांनी राजस्थान विद्यापीठाची निवडणूक गाजविली होती. शहर मतदारसंघात भाजपच्या मंजू शर्मा विरुद्ध काँग्रेसचे प्रतापसिंह खाचरियावास अशी लढत आहे. दौसा या मीणाबहुल मतदारसंघात काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथून त्यांचे समर्थक माजीमंत्री मुरारीलाल मीणा मैदानामध्ये असून त्यांची टक्कर भाजपच्या कन्हैय्यालाल मीणा यांच्याशी होईल. नागौरची जागा काँग्रेसने मित्र पक्ष राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाला (आरएलपी) सोडली असून भाजपने ज्योती मिर्धा यांना उमेदवार केले आहे. ‘आरएलपी’चे प्रमुख हनुमान बेनीवाल येथून मैदानात उतरले आहेत. येथे जाट आणि मुस्लिम मते निर्णायक मानली जातात. बेनीवाल आणि मिर्धा हे दोघेही जाट असले तरीसुद्धा त्यांना मुस्लिम मते मिळविण्यासाठी मात्र तारेवरची कसरत करावी लागेल. अलवरमधून केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव विरुद्ध ललित यादव असा संघर्ष रंगणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com