Raju Shetti : ना युती, ना आघाडी, मी स्वतंत्र!

संपूर्ण राज्याचे लक्ष असणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दंड थोपटले आहेत.
Raju Shetti
Raju Shettisakal

संपूर्ण राज्याचे लक्ष असणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दंड थोपटले आहेत. कोणत्याही आघाडी आणि युतीत न जाता स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यावर ते ठाम आहेत. असे असले तरी या मतदारसंघात शिवसेनेचीही ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत....

प्रश्‍न - लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. तुम्ही हातकणंगले (जि. कोल्हापूर) लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीसोबत, महायुतीसोबत की स्वतंत्र लढणार आहात?

राजू शेट्टी - मी ना महाविकास आघाडी सोबत जाणार आहे ना महायुतीसोबत. मी स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २०२२ मध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणीत ठरले आहे. या निर्णयात बदल होणार नाही.

स्वतंत्र लढणार आहात, तर उद्धव ठाकरे यांची वारंवार भेट का घेत आहात?

- उद्धव ठाकरे यांना दोन वेळा भेटलो आहे. पहिली भेट पाटगाव (ता. भुदरगड ) येथे होऊ घातलेल्या अदानींच्या विद्युत प्रकल्पाला विरोध करण्यासाठी घेतली होती. कारण या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी तळकोकणात शिवसेनेची मदत पाहिजे होती. आता दुसऱ्यांदा भेट घेतली ती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात परिस्थिती अनुकूल आहे. मात्र, भाजप व मित्रपक्षांच्या विरोधातील मतांची मतविभागणी टाळण्यासाठी शिवसेनेने आपला उमेदवार देऊ नये, अशी विनंती ठाकरे यांना केली आहे.

तुमच्या विनंतीला उद्धव ठाकरे यांनी कसा प्रतिसाद दिला?

- उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर हातकणंगलेबाबतही सकारात्मकच भूमिका होईल, अशी अपेक्षा आहे.

आघाडी किंवा महायुतीसोबत आपण चर्चा केली आहे का?

- आज अखेर मी कोणाबरोबरही चर्चा केलेली नाही. कोणाशीही आघाडी करणार नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. भाजपविरोधात आम्ही लढत आहोत. मी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे.

मागील निवडणुकीत ‘वंचित’च्या उमेदवारीचा फटका बसला का?

- मागील निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराचा फटका काही अंशी बसला आहे, हे खरे आहे. मात्र निवडणुकीनंतर ‘वंचित’च्या अनेक कार्यकर्त्यांनी आपली चूक झाल्याचे कबूल केले आहे. ही मंडळी यावेळी माझ्यासोबतच राहतील.

गतवेळी महाविकास आघाडी सोबत होतात, आता न जाण्याची कारणे काय?

- महाविकास आघाडीच्या नेत्यांना एक सविस्तर पत्र लिहून महाविकास आघाडी सोडण्याची कारणे मी २०२२मध्येच स्पष्ट केली आहेत. त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे, विकास कामाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण करत असताना शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त असणारा भूमी अधिग्रहण कायदा २०१३ मधील दुरुस्ती. त्यावेळी महाविकास आघाडीचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळात दुरुस्ती आणून शेतकऱ्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे.

याचा फटका शक्तिपीठ महामार्गाला ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे, त्यांना बसणार आहे. या प्रकल्पात १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. जवळपास २७ हजार एकर जमीन कवडीमोल किमतीने अधिग्रहीत होणार आहे. याविरोधात कोणत्याही न्यायालयात दाद मागता येणार नाही. तसेच महाविकास आघाडीचे सरकार असतानाच ‘एफ.आर. पी.’चे तीन तुकडे करून साखर कारखानदारांचे कल्याण आणि ऊस उत्पादकांचे वाटोळे केले आहे. आघाडी सोडताना अशा प्रकारे सात कारणांची यादी देण्यात आली होती.

या निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे काय राहतील?

- ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, बारा बलुतेदार यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाबद्दल, शेतीमालाच्या आयात निर्यातीच्या धोरणावर, अन्न प्रक्रिया उद्योगाप्रती केंद्र सरकारचे धोरण, रासायनिक खतांची दरवाढ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, इथेनॅाल धोरण, विकासकामाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनींची होणारी लूटमार, भ्रष्टाचार, महागाई, बदल्यांचा बाजार, वस्त्रोद्योगातील समस्या, नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षण सम्राटांकडून होणारी पिळवणूक, सरकारच्या वाढत्या करांचा सामान्य नागरिकांना होणारा जाच, व्यापारी व उद्योजकांना होणारा उपद्रव, ईडी, प्राप्तिकर व ‘सीबीआय’च्या माध्यमातून केले जाणारे ‘ब्लॅकमेल’, नदी प्रदूषण, बदलेले कामगार कायदे यासह विविध मुद्यांवर या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठवले जाईल.

खासदार धैर्यशील माने यांनी हातकणंगले मतदारसंघात हजारो कोटींची कामे केल्याचा दावा केला आहे?

- विद्यमान खासदारांचे सर्व आकडे भुलभुलय्या करणारे आहेत. त्यांच्या विकासाच्या दाव्यात तथ्य नाही.

गत निवडणुकीत तुमचा पराभव का झाला?

- पुलवामा हल्ल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील तरुणांच्यावर पडलेला प्रभाव, मोदींना धोरणात्मक विरोध करणे म्हणजे देशाला विरोध करणे असा माझ्या विरोधात केलेला प्रचार, कारण नसताना इचलकरंजीतील पाणीप्रश्नास मी जबाबदार असल्याचे केलेले कटकारस्थान याचा फटका बसला. मराठा आरक्षणाचा फटका बसला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com