Ramdas Athawale Interview : संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न; रामदास आठवले,आंबेडकरी समाज एकत्र यावा

यावेळच्या निवडणुकीत आरक्षण, राज्यघटना या सारख्या अनेक मुद्यांवर जनतेत संभ्रम निर्माण करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाला असल्याची कबुली ‘एनडीए’चे घटक असलेले रिपाइं नेते रामदास आठवले यांनी दिली आहे.
Ramdas Athawale Interview
Ramdas Athawale Interview sakal

यावेळच्या निवडणुकीत आरक्षण, राज्यघटना या सारख्या अनेक मुद्यांवर जनतेत संभ्रम निर्माण करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाला असल्याची कबुली ‘एनडीए’चे घटक असलेले रिपाइं नेते रामदास आठवले यांनी दिली आहे. महाराष्ट्रात विजयाचे ‘मार्जिन’ कमी राहील, मात्र तरीही भाजप सत्तेत परतेल असे त्यांनी सांगितले. ‘सकाळ’सोबत बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर चर्चा केली.

- विनोद राऊत

तीन टप्प्यांत झालेल्या मतदानात जनतेचा कल कसा आहे, असे तुम्हाला वाटते?

- या टप्प्यात दोन ते तीन टक्के मतदान कमी झाले आहे. देशभरातील उष्णतेच्या लाटेचा हा परिणाम आहे. पहिल्या तीन टप्प्यांत महायुतीला चांगल्या जागा मिळतील असा विश्वास आहे. नरेंद्र मोदी यांची विकासकामे बघता, जनता त्यांना संधी देईल असे वाटते.

देशात विशेषतः महाराष्ट्रात मोदींची लाट नसल्याचे बोलले जाते. तुमचे आकलन काय आहे?

- मोदींची लाट नाही असे म्हणता येणार नाही. मात्र यावेळी विरोधक आक्रमक आहेत, त्यांनी चांगली आघाडी बांधण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यघटना बदलणार, लोकशाही धोक्यात आहे, आरक्षण बंद होईल अशा चुकीच्या गोष्टी ते सातत्याने लोकांना सांगत आहेत. ४०० पारची घोषणा दिल्यानंतर काही भाजप नेत्यांनी राज्यघटना बदलण्याबद्दलच जे वक्तव्य केले, त्यामुळेही अजून गैरसमज आणि नाराजी पसरली. मात्र मोदी यांची भूमिका कायम राज्य घटनेच्या बाजूने आहे. त्यांच्या कार्यकाळात इंदू मिल स्मारक, बाबासाहेबांची १२५ वी जयंती, दिल्लीतील स्मारक या गोष्टी झाल्या.

४०० पारची घोषणा चुकली का ?

- गेल्या वेळी भाजपला ३०२ जागा भाजपला मिळाल्या होत्या. गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकास कामांमुळे यावेळी ४०० जागा मिळतील या अंदाजाने नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा दिली होती. मात्र त्याचा भलताच अर्थ विरोधक काढू पाहताहेत. कुणाचा बाप आला तरी राज्यघटना बदलता येणार नाही. मात्र काँग्रेसच्या विधानामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. तरीही भाजपला चांगल्या जागा मिळतील असे मला वाटते.

महाराष्ट्रात महायुतीला विजयासाठी झुंजावे लागत आहे असे चित्र आहे?

- महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत काँग्रेस पक्ष जरा डळमळीत आहे. अनेक ठिकाणी काँग्रेस नेते भाजपमध्ये गेले. या ठिकाणी मोदींचा प्रभाव आहे. मात्र महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आले. सरकार पाडल्यामुळे ते अधिकच चवताळले आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला असला तरी या तिघांनीही महायुतीपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. गेल्यावेळी आम्हाला ४२ जागा मिळाल्या होत्या. मात्र तेव्हा उद्धव ठाकरे आमच्यासोबत होते. यावेळी चुरशीची लढत आहे, विजय-पराभवाचे अंतर फारसे राहणार नाही. ३५ ते ४० जागा मिळतील असे वाटते.

पंतप्रधान विकासावर बोलताना दिसत नाहीत, त्यांचे मुद्दे भरकटलेले आहेत अशी टीका केली जाते...

- प्रचार भरकटलेला वाटत असला तरी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर द्यावे लागेल. दहा वर्षांत देशाचा झालेला विकास लोकांच्या डोळ्यासमोर आहे.

आपल्या पक्षाचा प्रचार कसा सुरू आहे?

-मणिपूर, तेलंगण, आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एक तर आसाममध्ये चार अशा एकूण सात जागांवर आमच्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत. भाजपने आम्हाला या जागा सोडल्या नाहीत. त्यामुळे स्वतंत्रपणे या जागा लढवतो आहोत. महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या सभेला मी उपस्थित राहतो. याशिवाय महायुतीतील प्रचार सभा, रॅली जिथे मला बोलावतात तिथे मी जात असतो. देशभरात आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात मी प्रचार करतोय.

तुम्ही यावेळी शिर्डीचे तिकीट मागितले होते, मात्र तुम्हाला मिळाले नाही?

- माझा पक्ष महायुतीमधील सर्वांत जुना पक्ष आहे. मात्र इतर दोन नवे पक्ष आल्यामुळे आमचा विसर पडला असेच म्हणावे लागेल. यावेळी सोलापूर, शिर्डी या दोन जागा आम्ही मागितल्या होत्या. मी जनतेतून निवडून यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. खरे तर ‘रिपाइं’ला एखादी जागा देणे सहज शक्य होते. मात्र दिली नाही. त्यामुळे कार्यकर्ते, जनतेत नाराजी आहे. मात्र वैयक्तिक नाराजी सोडून मी महायुतीचा प्रचार करत असून पक्ष कार्यकर्त्यांनाही मी प्रचाराला लावले आहे.

महाराष्ट्रात आंबेडकरी पक्षांचा प्रभाव घटत चालला आहे का?

-बाळासाहेब आंबेडकर माझ्यापेक्षा ‘डॅशिंग’ आहेत. मी मवाळ आहे. मात्र ज्यांच्यासोबत जातो, त्यांची भूमिका मांडतो. फटाफट निर्णय घेऊन त्याचा फायदा होत नाही. बाबासाहेबांनी सत्तेत जाण्यास सांगितले होते. एकट्या दलित समाजाच्या भरवशावर ते शक्य नाही. त्यामुळे सत्तेत जाण्यासाठी कुणातरी सोबत जावे लागते.

मुस्लीम आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे?

-धार्मिक आधारावर आरक्षण देता येणार नाही. तसेही ओबीसींच्या यादीत ८० टक्के मुस्लीम समाज आहे. मुस्लिमांना आमचा विरोध नाही. धर्म म्हणून आरक्षण देता येणार नाही. केवळ मुस्लिमांची मते हवीत म्हणून काँग्रेस असा प्रचार करतोय, मात्र ७० वर्षे सत्तेत असताना काँग्रेसने मुस्लिमांना आरक्षण का दिले नाही? हा प्रश्न आहे.

आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. त्याकडे तुम्ही कसे बघता ..

-५० टक्के आरक्षणाची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिली आहे. काँग्रेसची एवढे वर्षे हाती सत्ता होती. मग राहुल गांधी यांनी आरक्षणाची मर्यादा का वाढवली नाही. दलित-सवर्णांमधील वादाचे कारण आरक्षण आहे, म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्या असे म्हणणारा मी पहिला नेता होतो.

पवार, ठाकरेंसोबत तुमचे संबंध कसे आहेत?

- उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यासोबत माझा वैयक्तिक वाद नाही. राज्यसभेत असल्यामुळे शरद पवारांसोबत संपर्कात असतो. काँग्रेससोबत अनेक वर्षे सोबत होतो. भाजप-सेना युतीत काही मतभेद झाले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या जागी बाळासाहेब असते तर त्यांनी एकदम टोकाची भूमिका घेतली नसती. बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला कित्येकदा फटकारले, अपमान केला मात्र भाजपसोबतची युती तोडली नाही. मात्र उद्धव ठाकरेंना ते वाद मिटविता आले नाहीत.

प्रकाश आंबेडकर हे भाजपची ‘बी टिम’ आहे असा आरोप केला जातो?

-प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाशी बोलणी करताना काँग्रेसने त्यांचा अपमान केला. काही लोक त्यांना भाजपची ‘बी टिम’ म्हणतात मात्र आजपर्यंत प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण बघता यामध्ये तथ्य नाही. सर्व समाज घटकांना एकत्र आणणे ही त्यांची राजकीय भूमिका आहे. आंबेडकरी समाज एकत्र येत असेल तर मी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com