samajwadi paksh akhilesh yadav lok sabha election result 2024 bjp lose
samajwadi paksh akhilesh yadav lok sabha election result 2024 bjp loseSakal

दीर्घ काळानंतर धावली ‘सप’ची सायकल

देशातील अन्य भागाप्रमाणे उत्तर प्रदेशात बेरोजगारी आणि महागाईचा प्रश्न तीव्र आहे. या मुद्द्याचा ‘सप’ने निवडणुकीत पुरेपूर वापर केला.

- सागर पाटील / शरत प्रधान

राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वपूर्ण राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात दीर्घकाळानंतर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची (सप) सायकल धावली आहे. भाजपच्या अनेक धुरंधर नेत्यांचा ‘सप’ उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत सुपडा साफ केला. उत्तर प्रदेशातील खराब कामगिरीबद्दल अर्थातच भाजपला विश्लेषण करावे लागणार आहे.

राम मंदिराची उभारणी, काशी कॉरिडॉर, राज्यातील उत्तम कायदा-सुव्यवस्था, योगींचे स्थिर सरकार अशा मुद्द्यांचा निवडणुकीत मोठा लाभ होण्याची आणि पैकीच्या पैकी जागा जिंकण्याची भाजपला आशा होती. तथापि ‘इंडिया’ आघाडीच्या कामगिरीपुढे भाजप फिका पडला. पूर्वांचल, मध्य आणि पश्चिम उत्तर प्रदेशसह सर्व भागात सपने घवघवीत यश मिळवले.

देशातील अन्य भागाप्रमाणे उत्तर प्रदेशात बेरोजगारी आणि महागाईचा प्रश्न तीव्र आहे. या मुद्द्याचा ‘सप’ने निवडणुकीत पुरेपूर वापर केला. उमेदवारी देताना जातीय समीकरणांची योग्य सांगड त्यांनी घातली होती.

मुस्लिम आणि यादव मते आपल्यासोबत राहतील, याची दक्षता घेतानाच गैर-यादव ओबीसी, दलित आणि इतर समाजाची मते घेण्यासाठी अखिलेश यांनी विशेष व्यूहरचना रचली होती. विशेष म्हणजे यादव समाजातील केवळ पाचजणांना मैदानात उतरवण्यात आले होते. हे पाचही जण  अखिलेश यांच्या कुटुंबातले  सदस्य होते. 

निवडणुकीत दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. मात्र जनमनाची नस ओळखण्यात सप-काँग्रेस आघाडीला यश आले. अनेक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांबद्दल नाराजी होती. याचाही आपसूक लाभ सप-काँग्रेस आघाडीला मिळाला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘सप’ने ३७ जागा लढवत अवघ्या पाच जागा जिंकल्या होत्या.

त्यावेळी भाजपला ६२ तर बसपला १० जागा मिळाल्या होत्या. यावेळी सपने ६२ जागा लढवत ३० पेक्षा जास्त जागा जिंकल्या. उत्तर प्रदेश हा भाजपचा बालेकिल्ला असल्याची समजूत अखिलेश यादव यांनी खोडून काढली आहे. ‘सप’च्या दमदार कामगिरीमुळेच भाजपला स्वबळावर २७२ चा बहुमताचा आकडा गाठता आला नाही, हे वास्तव आहे.

काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा

मागील काही लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला फारशी कमाल करता आली नव्हती. मात्र यावेळी काँग्रेसने चमकदार यश प्राप्त केले आहे. २०१९ च्या निवडणुकीत केवळ रायबरेलीमध्ये काँग्रेसला यश मिळाले होते. यावेळी उत्तर प्रदेशातील सात मतदारसंघात काँग्रेसचा विजय मिळवताना दिसत आहे. काँग्रेसच्या  मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत भरीव वाढ झाली असून हे पक्षाच्या दृष्टीने सुचिन्ह मानले जात आहे.

मागासवर्गाला जोडण्यात यश

मुस्लिम-यादवांचा पक्ष अशी ओळख असलेल्या ‘सप’ने मागील काही काळात पिछडा म्हणजे मागास समाजाला स्वत:सोबत जोडण्याची धडपड चालवली आहे. या सूत्राला पीडीए (पिछडा, दलित आणि अल्पसंख्यांक) असे संबोधले जाते. या सूत्राचा अवलंब करीत ‘सप’ने नेत्रदीपक कामगिरी केली. यादव कुटुंबातील पाच सदस्य वगळता सपने यावेळी २७ ओबीसी, ११ उच्चवर्णीय तर चार मुस्लिमांना तिकीट दिले होते. तर राखीव मतदारसंघात १५ दलितांना मैदानात उतरवले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com