Loksabha Election 2024 : ‘महायुती’ आणि ‘मविआ’त तिढा कायम ; शिंदे गट नाशिकसाठी आक्रमक,ठाकरे गट-काँग्रेस उत्तर मुंबईसाठी आग्रही

शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यामधील सांगलीच्या जागेचा वाद मिटला नसतानाच उत्तर मुंबईच्या जागेवरून महाविकास आघाडीच्या दोन घटक पक्षांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यामधील सांगलीच्या जागेचा वाद मिटला नसतानाच उत्तर मुंबईच्या जागेवरून महाविकास आघाडीच्या दोन घटक पक्षांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या वतीने उत्तर मुंबईचे उमेदवार म्हणून विनोद घोसाळकर यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या जागेबाबत काँग्रेसकडून प्रतिसाद येत नसल्याने ही जागा घोषित करण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला असल्याचे समजते. त्याचप्रमाणे, महायुतीत नाशिकमध्ये अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या संभाव्य उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध आहे.

काँग्रेस पक्ष हा दक्षिण मध्य आणि सांगलीच्या जागेसाठी आग्रही असून जागा मिळवण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. त्यातच आता उत्तर मुंबईच्या जागेच्या वादाची भर पडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील सांगली आणि उत्तर मुंबई या जागांवर काँग्रेसने दावा सांगितला आहे; मात्र सांगलीतून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. तर उत्तर मुंबईतून अद्याप उमेदवार घोषित झाला नसला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी थेट प्रचारालाच सुरुवात केली आहे. घोसाळकर यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केल्यानंतर आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

केवळ बदला घ्यायचाय का?

काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेकडून आघाडीचा धर्म पाळला जात नसल्याचा आरोप केला आहे. उत्तर मुंबईच्या जागेबाबत अद्याप चर्चा सुरू असताना अशा पद्धतीने थेट प्रचाराला सुरुवात करणे योग्य नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणायच्या आहेत की केवळ बदला घ्यायचा आहे, हे एकदा ठाकरे गटाने ठरवायला पाहिजे,’’ असेही म्हात्रे म्हणाल्या. नाशिक लोकसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) छगन भुजबळ यांना जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी शिवसेनेकडून (शिंदे गट) याला मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात आहे.

Loksabha Election 2024
Eknath Shinde : खरी परीक्षा मुख्यमंत्र्यांची!

नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत घमासान सुरूच असून शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा एकदा उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) देण्याबाबतची चर्चा सुरु आहे. नाशिकची जागा आम्हीच लढवणार, असा दावा पुन्हा एकदा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

नाशिक येथे झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसेच नाशिकचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. त्यानंतर महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा निर्माण झाला होता. भाजपची नाशिकमध्ये अधिक ताकद असल्याचे सांगत पक्षाच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांकडून या जागेवर दावा करण्यात आला आहे. मात्र त्यातच आपल्या नावाची चर्चा झाल्याचे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेसाठी शड्डू ठोकला. आता पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवरून महायुतीचा तिढा आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे.

शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनीही भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. ‘‘भुजबळ यांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक काम करणार नाहीत. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार आहे. नाशिक ही शिवसेनेचीच पारंपारिक जागा आहे,’’ असा दावा चौधरी यांनी केला आहे.

नाशिकमधून हेमंत गोडसेच लढणार नाशिकमधून भुजबळ नाही तर हेमंत गोडसेच निवडणूक लढणार, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. हेमंत गोडसे या जागेवरून निश्चितपणे निवडून येणार असल्याचा त्यांचा दावा आहे. जिंकून येऊ शकणारी जागा का सोडायची, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातले असल्याचे शिरसाट म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com