Loksabha Election Result : दिग्गजांना धक्का देणारे निकाल

या लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली. एकूण निकाल पाहता काही दिग्गजांची हार झाली, तर काही मातब्बरांनी लौकिकाला साजेसे यश मिळविले. काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांनी ठसा उमटविला. काही प्रमुख निकालांवरील दृष्टिक्षेप...
Loksabha Election Result
Loksabha Election Result sakal

या लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली. एकूण निकाल पाहता काही दिग्गजांची हार झाली, तर काही मातब्बरांनी लौकिकाला साजेसे यश मिळविले. काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांनी ठसा उमटविला. काही प्रमुख निकालांवरील दृष्टिक्षेप...

१) बीडमध्ये पंकजा पराभूत

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा पराभव केला. सोनवणेंना सहा लाख ८१ हजार ५६९, पंकजा यांना सहा लाख ७४ हजार मते मिळाली. सोनवणे ६५८५ मतांनी विजयी झाले. भाजपने या निवडणुकीत सलग दोनदा खासदार राहिलेल्या डॉ. प्रीतम मुंडेंची उमेदवारी टाळून पंकजा यांना रिंगणात उतरविले. भाजपने सलग दोनदा खासदार राहिलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांना टाळून पंकजा यांना रिंगणात उतरविले. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आलेल्या सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ऐनवेळी रिंगणात उतरविले. मागच्या वेळीही बजरंग सोनवणे प्रीतम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून रिंगणात होते. त्यांचा तब्बल एक लाख ६८ हजार मतांनी पराभव झाला होता. पंकजा यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेत्यांनी सभा घेतल्या. केंद्रात व राज्यातील सत्ता, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह भाजप आमदार सुरेश धस, लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा तसेच राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे तसेच खासदार डॉ. प्रीतम मुंडे आदी अर्धा डझन माजी आमदारांची फौज मैदानात होती. तरीही त्यांचा पराभव झाला.

२) नवनीत राणा यांचा पराभव

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांचा पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचा विजय झाला. या ठिकाणी प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांनीही चांगली लढत दिली. अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांत एकही भाजपचा आमदार नाही. गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी निवडणुकीनंतर भाजपला साथ दिली होती.

भाजपची बाजू मांडताना त्यांनी प्रसंगी उद्धव ठाकरे व ‘मविआ’ सरकारच्या नाकीनऊ आणले होते. ‘मातोश्री’ बाहेर हनुमानचालिसा पठण करण्याचा मुद्दाही विशेष चर्चेत राहिला. त्यांच्या बनावट जातप्रमाणपत्राचाही मुद्दा त्यांना उमेदवारी मिळेपर्यंत चर्चेत राहिला. कोर्टाने त्यांचे जात प्रमाणपत्र योग्य ठरविण्यापूर्वी भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली होती.

Loksabha Election Result
Kalyan Loksabha Result : विजयाच्या गुलालाची उधळण करत डोंबिवलीत शिवसेनेचा जल्लोष

३) उदयनराजेंची मोहीम फत्ते

सातारा : सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज झालेल्या मतमोजणीत महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा तब्बल ३२ हजार ७७१ मतांनी पराभव केला. सुरुवातीला शशिकांत शिंदेंनी १९ हजारांचे मताधिक्य घेऊन आघाडी घेतली आणि विजयी जल्लोषही केला; पण १४ व्या फेरीनंतर बाजी पलटली आणि उदयनराजेंचे मताधिक्य वाढत जाऊन त्यांनी विजयश्री खेचून आणली. शशिकांत शिंदेंना पराभवाचा धक्का दिला. शिंदेंना वाई, कऱ्हाड उत्तर आणि पाटण मतदारसंघांनी अल्पसे मताधिक्य दिले, तर सातारा, कऱ्हाड दक्षिण व कोरेगाव मतदारसंघांनी उदयनराजेंचा विजय सुकर केला. सुरुवातीच्या टप्प्यात महाविकास आघाडी प्रचारात आघाडीवर होती. त्यामुळे शशिकांत शिंदे यांना चांगले वातावरण होते; परंतु अखेरच्या टप्प्यात भाजप व उदयनराजे यांनी अनेक डावपेच टाकले. त्याचेच प्रतिबिंब आजच्या निकालात दिसून आले.

४) विशाल पाटील यांची बाजी

सांगली : राज्यातील सर्वाधिक चर्चेतील निवडणूक ठरली ती सांगलीची. अपक्ष विशाल पाटील यांनी भाजपच्या संजय पाटील यांचा एक लाख मतांनी पराभव केला. विशाल पाटील यांनी सातव्या आणि अठराव्या फेरीचा अपवाद वगळता उर्वरित २२ फेऱ्यांमध्‍ये आघाडी घेतली. टपाली मतांशिवाय विशाल पाटील यांना पाच लाख ६५ हजार ७९९ मते मिळाली. संजय पाटील यांना चार लाख ६६ हजार ७२६ मते मिळाली. शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांना ५९ हजार ७९२ मतांवर समाधान मानावे लागले. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. मात्र, हे बंड काँग्रेसचेच असल्याचे सांगत निवडणूक सांगलीच्या अस्मितेची आणि काँग्रेसच्या अस्तित्वाची केली. त्यातून सहानुभूतीची लाट आली आणि विशाल पाटील यांचे बंड यशस्वी झाले. त्यात आमदार विश्वजित कदम यांच्या भूमिकेची व मदतीची सर्वाधिक चर्चा होते आहे.

५) ॲड. गोवाल पाडवी विजयी

नंदुरबार : अत्यंत काटे टक्कर असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदार संघात दहा वर्ष खासदार असलेल्या डॉ. हीना गावित यांचा एक लाख ५९ हजार १२० मतांची आघाडी घेत ॲड गोवाल पाडवी यांनी पराभव केला. या विजयातून डॉ. गावित यांची हॅटट्रिक रोखून कॉंग्रेसला नवसंजीवनी देण्याचे काम या निवडणुकीतून झाले आहे. गोवाल पाडवी यांना ७ लाख ४४ हजार ८७९ मते मिळाले आहेत. डॉ.हीना गावित यांना ५ लाख ८५ हजार ८४७ मते मिळाली आहेत.

नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी चौथ्या टप्यात मतदान झाले होते. अत्यंत चुरशीच्या लढतीत नंदुरबार मतदार संघात ७० .६५ टक्के मतदान झाले होते. यावेळी दहा वर्ष खासदार असलेल्या डॉ. हीना गावित यांच्यासमोर नवा चेहरा असलेल्या ॲड. गोवाल पाडवी यांनी तगडे आव्हान उभे केले होते. त्यामुळे निकाल कोणाचा बाजूने लागतो हे सांगणे कठीण होते. दोन्ही गटाकडून विजयाचा दावा केला जात होता. मात्र आज निकालानंतर कॉंग्रेसचा विजयाचा दावा खरा ठरला.

६) भारती पवार यांना धक्का

नाशिक : कांदा प्रश्नामुळे देशाचे लक्ष लागलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रात पहिल्यांदाच संधी मिळालेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. भारती पवार यांना मतदारांनी नाकारले. पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांनी मतांमध्ये घेतलेली आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. भगरे यांनी डॉ. पवार यांचा तब्बल एक लाख १३ हजार १९९ मतांनी पराभव केला. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांचा पराभव हा भाजपला मोठा धक्का आहे. शिक्षक असलेले भगरे यांच्या झालेल्या विजयाने ‘राष्ट्रवादी’ची मतदारसंघ काबीजची स्वप्नपूर्ती झाली असून, भगरे यांना लोकसभेच्या पहिल्याच निवडणुकीत दिल्लीला पोहोचविले आहे. पहिल्या फेरीपासून सुरू झालेली ही आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कमी-अधिक फरकाने कायम होती. भगरे यांनी मतांमध्ये घेतलेला लीड अखेरपर्यंत डॉ. पवार यांना मोडता आला नाही. फेरीनिहाय हा लीड वाढत-वाढत गेला. त्यामुळे भगरे हे अखेरपर्यंत आघाडीवर राहिले.

७) मुनगंटीवारांवर नामुष्की

चंद्रपूर : भाजप सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि सतत मुख्यमंत्रिपदाचे दावेदार समजण्यात येणारे सुधीर मुनगंटीवार यांची इच्छा नसतानाही त्यांना पक्षश्रेष्ठीमुळे खासदारकी लढवावी लागली. येथे पक्षश्रेष्ठींचा निर्णय चुकल्याचे दिसते. कॉंग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचा अडीच लाखांहून जास्त मतांनी पराभव केला. भाजपला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागणारा आहे. पती बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर प्रतिभाताईंनी त्यांच्या नेतृत्वाची चुणूक दाखवली.

८) नीलेश लंके जायंट किलर

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांना पराभवाचा सामना करावा लागला. ऐनवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेऊन लोकसभेचे तिकीट मिळविणारे नीलेश लंके हे विखेंसाठी जायंट किलर ठरले. प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या मतदारसंघात झालेला पराभव महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा धक्का देणारा ठरला. मागील निवडणुकीत मिळवलेली सत्ता महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना गमावण्याची वेळ आली. जनतेशी थेट संवाद नसल्याने विखेंना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला, हेच या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

९) शिर्डीत भाऊच ‘साहेब’

शिर्डी : शिर्डी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले. गेली दहा वर्षे खासदार असलेले सदाशिव लोखंडे यांना मतदारांनी पुन्हा ‘मुंबई’ला पाठविले. ऐनवेळी निवडणूक रिंगणात उतरून लढत तिरंगी केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनीही ९० हजार ६६८ मते मिळवून चांगली लढत दिली. वाकचौरेंच्या विजयाने शिर्डीत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची ताकद असल्याचे सिद्ध झाले आहे.

१०) सोलापूरची लेक संसदेत

सोलापूर : सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे दणदणीत मताधिक्याने विजयी झाले. प्रणिती शिंदे यांनी ७४ हजार १९८ मताधिक्याने विजय मिळविला आहे. मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा, सोलापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघाने त्यांना मोठे मताधिक्य दिले. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना अक्कलकोट, सोलापूर दक्षिण व सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेपेक्षा कमी मताधिक्य मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील तर धैर्यशील मोहिते-पाटील हे १ लाख २० हजार ७६० मतांनी विजयी झाले. त्यांना माळशिरस, माढा, करमाळा या विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना त्यांच्या फलटण व माणमधून मोठे मताधिक्य न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com