Kalyan Loksabha Result : विजयाच्या गुलालाची उधळण करत डोंबिवलीत शिवसेनेचा जल्लोष

शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला |
Kalyan Loksabha Result : विजयाच्या गुलालाची उधळण करत डोंबिवलीत शिवसेनेचा जल्लोष
Kalyan Loksabha Resultsakal

Dombivali News : ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दमदार विजय संपादन केला आहे. महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाच्या उमेदवारास कोणत्याही फेरीत आघाडी घेऊ न देता शिंदे गटाने हा विजय मिळविल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विजयाच्या गुलालाची उधळण करीत ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरत हा विजय डोंबिवलीत साजरा करण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील निर्णयाकडे साऱ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या. महायुतीकडून खासदार शिंदे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती.

विजयाची हॅट्रीक सोबतच या मतदारसंघात शिंदे गटाचे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून येणे हे शिंदे यांचे उद्दीष्ट होते. हे उद्दीष्ट मोठ्या प्रमाणात साध्य करता आले नसले तरी पहिल्या फेरीपासूनच शिवसेना शिंदे गटाने लीड घेत ती कायम अबाधित ठेवत विजय संपादन केल्याने कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रिडासंकुल येथे सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरुवात झाली.

या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत होत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणी केंद्राच्या बाहेर सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी होईल असे वाटत असताना 10.30 वाजेपर्यंत केंद्राच्या बाहेर शुकशुकाट दिसून आला.

त्यानंतर हळूहळू कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. दुपारी 12 च्या दरम्यान शिंदे यांनी पाच सहा फेऱ्यांत लाखाचा लीड घेत आघाडीवर राहीले. यानंतर डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, मनसेचे प्रकाश भोईर, रुपेश पाटील यांसह अनेक कार्यकर्त्यांनी केंद्राच्या बाहेर जमत जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. एक ते दिडच्या सुमारास ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरत विजयाच्या गुलालाची उधळण करत प्रत्येक फेरीच्या घोषणेवर या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हरकत घेत पोलिस प्रशासनाकडे त्यांची तक्रार केली. यावेळी काही प्रमाणात पोलिस प्रशासन व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. परंतू पोलिसांनी त्वरीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पांगवत परिस्थिती आटोक्यात आणली. यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी येथून काढता पाय घेतला.

सायंकाळी 4 च्या दरम्यान विजयी उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे डोंबिवलीत दाखल झाले. डोंबिवलीत ते येताच फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांचा गजर आणि गुलालाची त्यांच्यावर उधळण करीत कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. खासदार शिंदे यांचे अभिनंदन करण्यासाठी सायंकाळ पासून उल्हासनगर, अंबरनाथ, कळवा मुंब्रा येथून शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी डोंबिवलीत येण्यास सुरुवात केली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे विजयी होताच त्यांचे कुटूंब आजोबा संभाजी शिंदे, आई लता शिंदे डोंबिवलीत दाखल झाले. यावेळी त्यांचे आजोबा संभाजी शिंदे यांनी नातवाचे कौतुक केले. माझ्या नातवाने भरपूर विकासकामे केली आहेत, त्यामुळे हा विजय त्याचा झाला आहे. आता आणखी कामे त्याला करायची आहेत, मला भरपूर आनंद झाला आहे अशी प्रतिक्रीया संभाजी शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com