esakal | कारणराजकारण : वाहतूक कोंडी ते बैलगाडा शर्यती (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

कारणराजकारण : वाहतूक कोंडी ते बैलगाडा शर्यती  (व्हिडिओ)

पुणे जिल्ह्यातील गावागावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘सकाळ’ सोशल मीडियावर मतदारांशी संवाद साधत आहे. स्थानिक प्रश्नांचा वेध घेतानाच कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणत आहे.

कारणराजकारण : वाहतूक कोंडी ते बैलगाडा शर्यती (व्हिडिओ)

sakal_logo
By
सम्राट फडणीस

पुणे -  ‘आयटी’त नोकरी करणारा हडपसरचा मतदार ते बैलगाडा शर्यतींसाठी हटून बसलेला शिरूर तालुक्‍यातला मतदार, अशा टोकाच्या अपेक्षांचा सामना शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रमुख उमेदवारांना करावा लागत आहे. एकीकडं तीनवेळच्या खासदारकीचा तगडा अनुभव असलेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि दुसरीकडं नवखे; मात्र वक्तृत्वात फर्डे राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे, असा थेट सामना आहे. ‘कोरेगाव भीमा’नंतर झालेलं ध्रुवीकरण वंचित बहुजन आघाडीला किती बळ देईल, यावर मतदारसंघाचं राजकीय भविष्य अवलंबून आहे.

पंधरा वर्षांची खासदारकी ‘अँटी इन्कंबन्सी’ स्वाभाविक आणते. तोच मुद्दा डॉ. कोल्हे यांनी प्रचारात आणला. ‘आढळरावांनी पंधरा वर्षांत केलं काय?’ हे खर्जातल्या आवाजात डॉ. कोल्हे मतदारांना विचारतात.   छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका करणारे डॉ. कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवखे असले, तरी मतदारांना टीव्ही मालिकेमुळं चेहरा परिचित आहे. परिणामी, पदयात्रांना गर्दी होते. ग्लॅमरची गर्दी मतांमध्ये किती बदलेल, हा प्रश्न आहे. आढळरावांचा प्रचाराचा जोर गावातल्या बुजुर्गांच्या भरवशावर आहे. लहान-लहान सभा, गाठीभेटी हा त्यांचा परंपरागत प्रचाराचा फंडा आहे. आजही दिवसभर आढळराव अशाच सभांमधून प्रचारात होते.

हवेली आणि शिरूर तालुक्‍यातून जाणाऱ्या नगर रस्त्यावरची वाहतूक कोंडी आढळरावांना त्रासदायक ठरेल, असं शहरी तोंडवळणाच्या गावांमधले मतदार सांगतात. या रस्त्यावरच्या कोंडीनं हजारो नागरिक त्रस्त आहेत. शिक्रापुरात सातशेंवर व्यापाऱ्यांच्या संघटनेचे प्रतिनिधी दोन्ही उमेदवारांकडं अपेक्षेनं पाहताहेत. त्याचवेळी ‘कोंडीनं आमचा व्यापार कोलमडलाय,’ असंही वैतागून सांगतात. चाकण आणि रांजणगाव औद्योगिक वसाहतीतून ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांमुळं ही गावं आणि शिक्रापूर त्रस्त आहे. लोणी काळभोरमध्येही वाहतूक कोंडीची मतदारांची तक्रार आहे.

शहरीकरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या थेऊर, लोणीकंद आदी गावांमध्ये मतदारांशी बोलताना शेतकऱ्यांचा, बंद पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याचा मुद्दा येतो. निवडणुकीत आढळरावांना ही दुखरी नस ठरेल, असं मतदारांच्या भावना सांगतात. पाच वर्षांपूर्वी आढळरावांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक प्रचारात यशवंत कारखाना शंभर दिवसांत सुरू करू, असं आश्वासन दिलं होतं, याची आठवण मतदारांना आहे.

कोरेगाव भीमा ग्रामस्थांचं आवाहन
कोरेगाव भीमाच्या दंगलीमुळं राज्यभर ध्रुवीकरणानं जोर धरला; मात्र इथले ग्रामस्थ जातीय सलोख्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, सणसवाडी आदी गावांतील मतदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलतात आणि आवर्जून सांगतात, ‘आमच्याकडं जातीय तणाव नाहीयं...’ ग्रामस्थांमधला हा समंजसपणा राजकारण्यांमध्येही उतरावा, अशी अपेक्षाही ते मांडतात.

loading image
go to top