मोदींच्या मतदारसंघात जाण्यासाठी प्रियांकांचा जलमार्ग!

Priyanka Gandhi Rahul Gandhi
Priyanka Gandhi Rahul Gandhi

लखनौ : प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. मात्र, वाराणसीला भेट देण्यासाठी त्यांनी जलमार्ग निवडल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. प्रयागराज ते वाराणसी हा प्रवास प्रियांका गंगेतून नौकेने करणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह अन्य महत्त्वाचे मतदारसंघ असलेल्या पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियांका यांच्याकडे आहे. त्यातही वाराणसी सर्वांत प्रतिष्ठेचा मतदारसंघ असल्यामुळे प्रियांका या मतदारसंघाचा दौरा कधी करणार, याची उत्सुकता होती. त्या 17 मार्चला लखनौमध्ये येत असून, 20 मार्चला प्रयागराजपासून गंगेतून जलप्रवास करत वाराणसीला जातील.

नदीकाठावर राहणाऱ्या तळागाळातील नागरिकांचे प्रश्‍न समजून घेण्यासाठी प्रियांका यांनी हा निर्णय केल्याचे उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी सांगितले. या नागरिकांच्या प्रगतीसाठी भाजप आणि बसप यांनी काही केले नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

दलित आणि अतिमागास वर्गाचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रियांका यांनी हा निर्णय घेतल्याचे बब्बर यांच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. नदीकाठी राहून उपजीविका करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने मल्लाह आणि निषाद या समाजांचा समावेश होतो. या समाजांबरोबरच अल्पसंख्यकांकडेही (मुस्लिम) काँग्रेसचे लक्ष आहे.

हा समाज प्रामुख्याने समाजवादी पक्षाचा पाठीराखा मानला जातो; पण बसपवर त्यांचा विश्‍वास नाही. बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपबरोबर पूर्वी केलेली जवळीक हे त्याचे कारण आहे. मोदींवर नाराज असलेल्या ब्राह्मण समाजालाही आपल्याकडे वळवायचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. हा वर्ग सप-बसपला मतदान करणार नाही, हे गृहित धरून काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com