Loksabha 2019 ः 'आप' नेते कुमार विश्वास भाजपच्या वाटेवर?

वृत्तसंस्था
बुधवार, 3 एप्रिल 2019

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे राज्यसभा निवडणुकीची आपकडून उमेदवारी देताना कुमार विश्वास यांचा पत्ता कापण्यात आला होता. पक्षाच्या विविध कार्यक्रमांतही त्यांना डावलण्यात आले. त्यानंतर  कुमार विश्वास आणि आपमधील दुरावा आणखीच वाढल्याचे दिसून येते.

नवी दिल्लीः आम आदमी पक्षाचा बंडखोर नेते आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असून, भाजपचा प्रचार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्लीतील भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सोमवारी (ता. 1) रात्री कुमार विश्वास यांची भेट घेतली. यावरुन कुमार विश्वास आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत असतील, अशी चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. कुमार विश्वास भाजपमध्ये गेले तर त्यांना भाजपा पूर्व दिल्ली मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतो. शिवाय, कुमार विश्वास पूर्व दिल्ली मतदारसंघातून आपच्या उमेदवार आतिशी यांच्याविरोधात प्रचार करण्याची शक्यता आहे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मनोज तिवारी आणि कुमार विश्वास यांच्यात सोमवारी रात्री सुमारे एक तास चर्चा झाली. त्यानंतर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघासाठी कुमार विश्वास यांच्या नावाची शिफारस केली. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत. दिल्ली भाजप प्रदेश युनिटने दिल्लीच्या लोकसभा जागेसाठी आधीच अनेक नावांची शिफारस केली आहे. भाजप 5 एप्रिल रोजी दिल्लीच्या सात मतदारसंघातीन उमेदवारांची घोषणा करणार असल्याचा अंदाज आहे.

दिल्ली पू्र्व मतदारसंघात भाजपचे महेश गिरी विद्यमान खासदार आहेत. त्यांना गुजरातच्या जुनागडचं तिकीट दिले जाऊ शकते. मनोज तिवारी आणि कुमार विश्वास यापूर्वी अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये एकमेकांना भेटले आहेत. यावेळी त्यांच्यातील मैत्रीचे संबंधं समोर आले होते. एवढेच नाही तर मनोज तिवारी यांनी आपल्याला पक्षात सामील होण्याची ऑफरही दिल्याचे कुमार विश्वास यांनी सांगितले.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे राज्यसभा निवडणुकीची आपकडून उमेदवारी देताना कुमार विश्वास यांचा पत्ता कापण्यात आला होता. पक्षाच्या विविध कार्यक्रमांतही त्यांना डावलण्यात आले. त्यानंतर आता राजस्थानच्या प्रभारीपदावरून दूर करण्यात आल्याने कुमार विश्वास आणि आपमधील दुरावा आणखीच वाढल्याचे दिसून आले. याचबरोबर, गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून कुमार विश्वास टीका करताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुका जवळ येत असताना राजकीय पक्षांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, व्यापक जनाधार असलेल्या नेत्यांसोबत लोकप्रिय कलाकर मंडळींनाही पक्षात सामील करुन घेण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. यात भाजप सुद्धा आघाडीवर आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भोजपुरी अभिनेता रवी किशन आणि दिनेश लाल यादव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aap leader Kumar Vishwas likely to campaign Loksabha election 2019 from BJP in Delhi