Loksabha 2019: शहा यांच्या सभेला परवानगी नाकारल्यामुळे भाजप संतप्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मे 2019

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची पश्‍चिम बंगालमधील जादवपूर येथील नियोजित सभा रद्द करण्यात आली. राज्यातील तृणमूल कॉंग्रेस सरकारने शहा यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यास आणि सभा घेण्यास परवानगी नाकारल्याचा आरोप भाजपने केला आहे. ही ममतांची हुकूमशाही असल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला आहे. 

कोलकता / नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची पश्‍चिम बंगालमधील जादवपूर येथील नियोजित सभा रद्द करण्यात आली. राज्यातील तृणमूल कॉंग्रेस सरकारने शहा यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यास आणि सभा घेण्यास परवानगी नाकारल्याचा आरोप भाजपने केला आहे. ही ममतांची हुकूमशाही असल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला आहे. 

अमित शहा यांची सभा रद्द झाल्यानंतर भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसने एकमेकांवर आरोप केले आहेत. "येथील जिल्हा न्यायदंडाधिकारी हे तृणमूलचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. त्यांनी सुरवातीला हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली आणि नंतर सभेलाच परवानगी नाकारली,' असा दावा भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केला. बंगाल सरकार लोकशाही सोडून हुकूमशाहीचा अवलंब करत असून, निवडणूक आयोगही या घटनेचा मूक साक्षीदार बनला आहे, असा आरोपही विजयवर्गीय यांनी केला. तृणमूलने मात्र सभा रद्द होण्याशी आपला संबंध असल्याचे अमान्य करत या सभेला गर्दी होण्याची शक्‍यता नसल्याने भाजपने स्वत:हूनच ही सभा रद्द केल्याचा दावा केला. 

पश्‍चिम बंगालमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, जादवपूरमधील शहा यांची सभा रद्द झाल्यानंतरही नियोजनानुसार त्यानंतरची बारुईपूरची सभा होणार होती. मात्र, या सभेसाठी जमीन भाड्याने दिलेल्या व्यक्तीने अखेरच्या क्षणी जमीन देण्याचे नाकारले. तृणमूल कॉंग्रेसच्या दबावामुळेच हे झाल्याचा भाजपने आरोप केला आहे. तृणमूलच्या या अत्याचाराविरोधात निदर्शने करण्याचा आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपने सांगितले. बारुईपूरची सभा रद्द झाल्यानंतर भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. 

"विजययात्रा कशी रोखाल?' 
सभा रद्द झाल्यामुळे संतप्त झालेले भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ममतांना, ""सभा घेण्यापासून मला रोखाल; पण राज्यातील भाजपची विजययात्रा कशी रोखाल?' असा सवाल विचारला आहे. भाजपच्या जोरामुळे ममता हतबल झाल्या असून, मला सभा घेऊ न दिल्याने त्या तृणमूलचा पराभव टाळू शकत नाहीत, असे शहा म्हणाले. "जय श्रीराम'चा घोष केल्याबद्दल ममतांनी मला अटक करून दाखवावी, असे आव्हानही शहा यांनी दिले आहे. "जय श्रीराम'च्या घोषणा देत असलेल्या लोकांवर ममता ओरडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचा संदर्भ देत शहा म्हणाले, की "कोणी जय श्रीराम म्हटले की ममता चिडतात. मी आता येथे जय श्रीराम म्हणतो. ममतांमध्ये हिंमत असल्यास त्यांनी मला अटक करून दाखवावी. मी उद्या कोलकात्यात येणार आहे.' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah denied permission to hold rally in Bengal, BJP cries Mamatas dictatorship