अमित शहा यांना मिळणार 'वजनदार' मंत्रिपद?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मे 2019

- केंद्रात मिळणार महत्त्वाचे मंत्रिपद.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. या विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यानुसार आता अमित शहा यांना केंद्रात 'वजनदार' मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

भाजपच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आता काही दिवसांत होणार आहे. तत्पूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळते याकडे भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांसह विद्यमान मंत्र्यांचे लक्ष लागले आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र, तेव्हा अमित शहा यांना कोणतेही मंत्रिपद देण्यात आले नव्हते. आता यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांना मोठे मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेल्या शिवसेना, संयुक्त जनता दलाच्या खासदारांसह अन्य पक्षांच्या खासदारांना स्थान मिळेल की नाही,याबाबतची शंका व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah may get Important Cabinet Ministry