...म्हणून खासदाराने पोलिस अधिकाऱयाला ठोकला सलाम

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मे 2019

माधव यांनी पोलिस अधिकाऱ्याला सलाम करतानाचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर  अनेकांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित केला. सोशल मीडीयावर चर्चांना उधानही आले.

हैदराबाद : विविध ठिकाणी खासदाराला पोलिस सलाम करताना दिसतात. मात्र, एका खासदाराने पोलिसांना सलाम केला असून, यामागील कारणही वेगळे आहे. संबंधित छायाचित्र सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहे.

आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमधील कादिरीचे मंडळ निरीक्षक गोरंतला माधव यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली. तेलुगू देसम पक्षाच्या क्रिस्ताप्पा निम्मला या विद्यमान खासदाराचा त्यांनी 1 लाख 40 हजार 748 मतांनी पराभव केला. खासदार झालेल्या माधव यांची गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक मेहबूब बशा यांच्याशी भेट झाली. सेवेत असताना बशा हे माधव यांना वरिष्ठ होते. त्यामुळेच बशा समोर येताच माधव यांनी त्यांना सलाम केला. बशा यांनीही खासदार झालेल्या माधव यांना सलाम ठोकला. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माधव यांनी पोलिस अधिकाऱ्याला सलाम करतानाचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर  अनेकांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित केला. सोशल मीडीयावर चर्चांना उधानही आले. त्यावर माधव यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, 'मला माझे जुने वरिष्ठ अधिकारी मतमोजणी केंद्रावर दिसले. त्यांना मी सलाम केला आणि मग त्यांनी मला सलाम केला. आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्याच भावनेतून आम्ही एकमेकांना सलाम केला.'

दरम्यान, माधव यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सेवानिवृत्ती घेतली. सेवानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांना लोकसभा निवडणकू लढवण्याची इच्छा व्यक्त केली. वायएसआर काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. यामधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रचारास सुरवात केली. परंतु, त्यांना आपण निवडून येऊ यावर विश्वास नव्हता. तेलुगू देसम पक्षाच्या क्रिस्ताप्पा निम्मला या विद्यमान खासदाराचा त्यांनी 1 लाख 40 हजार 748 मतांनी पराभव केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andhra inspector turns MP and Photo of him and former boss saluting each other is viral