अस्थिर कौटुंबिक जीवनामुळे पत्नीनेच संपविले पतीला

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 एप्रिल 2019

- दिल्लीतील रोहित तिवारी खून प्रकरणाला वेगळे वळण
- पोलिसांनी आज रोहितची पत्नी अपूर्वाला खूनप्रकरणी केली अटक
- असमाधानी कौटुंबिक जीवनामुळे अपूर्वाने तिच्या पतीला संपविल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवी दिल्ली: दिल्लीतील रोहित तिवारी खून प्रकरणाला आज वेगळे वळण मिळाले. दिल्ली पोलिसांनी आज रोहितची वकील पत्नी अपूर्वाला पतीच्या खूनप्रकरणी अटक केली. अस्थिर आणि काहीशा असमाधानी कौटुंबिक जीवनामुळे अपूर्वाने तिच्या पतीला संपविल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. रोहित शेखर हा दिवंगत ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांचा मुलगा होता. त्याचा काही दिवसांपूर्वी खून करण्यात आला होता. रोहितच्या तोंडावर उशी ठेवून त्याला मारण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले होते.

ज्या दिवशी रोहितचा खून झाला होता, त्या दिवशी अपूर्वा आणि त्याच्यात नातेवाइकांवरून कडाक्‍याचे भांडण झाले होते. उत्तराखंड ते दिल्ली दरम्यानच्या प्रवासात रोहितने खूप मद्य प्राशन केले होते, त्यामुळे त्याच्यात पत्नीचा प्रतिकार करण्याची ताकदच शिल्लक नव्हती. अपूर्वाने झटापटीमध्ये रोहितला पलंगावर ढकलून देत त्याच्या तोंडावर उशी ठेवून त्याला ठार मारले, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त राजीव रंजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मागील अनेक दिवसांपासून या दाम्पत्यामध्ये बेबनाव होता. रोहितचे कुटुंबीय घटस्फोटाबाबत गांभीर्याने विचार करत होते. त्यामुळे अपूर्वा काहीशी अस्वस्थ झाली होती. लग्न झाल्यापासून अपूर्वा रोहितवर नाराज होती, प्रत्यक्ष भांडण झाले त्या दिवशीदेखील रोहितचा खून करण्याचा तिचा इरादा नव्हता, असेही रंजन यांनी नमूद केले. 

संपत्ती बळकावण्याचा इरादा 
अपूर्वा ही वकील असून, सध्या ती सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली करते. रोहितची आई उज्ज्वला यांनीही अपूर्वा आणि तिच्या कुटुंबीयांवर याआधीच आरोप केले होते. अपूर्वाच्या कुटुंबीयांचा रोहितची मालमत्ता बळकावण्याचा इरादा होता, असे त्यांनी म्हटले आहे. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून अपूर्वा रोहितशी भांडत होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apoorva Shukla Tiwari Arrested For Killing Husband Rohit Tiwari