कॉंग्रेस व भाजपकडून वेगळ्या क्षेत्रांतील नामवंत राजकीय आखाड्यात

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 14 May 2019

मध्य प्रदेशमधील देवास लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा आगळी ठरण्याची चिन्हे आहेत. येथे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांनी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. यात कॉंग्रेसकडून लोकगायक प्रल्हाद सिंह टिपणीया, तर भाजपकडून निवृत्त दिवाणी न्यायाधीश महेंद्रसिंह सोलंकी हे आमनेसामने आहेत.

इंदूर ः मध्य प्रदेशमधील देवास लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा आगळी ठरण्याची चिन्हे आहेत. येथे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांनी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. यात कॉंग्रेसकडून लोकगायक प्रल्हाद सिंह टिपणीया, तर भाजपकडून निवृत्त दिवाणी न्यायाधीश महेंद्रसिंह सोलंकी हे आमनेसामने आहेत.

टिपणीया (वय 65) हे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवर उभे आहेत. पद्मश्री पुरस्काराने त्यांना पूर्वी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या प्रचाराची पद्धत वेगळी आहे. हातात तंबोरा घेऊन माळवी लोककलेनुसार ते कबीराची भजने सादर करीत मत देण्याचे आवाहन मतदारांना करीत आहेत. देवासमधील निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची शनिवारी (ता. 11) प्रचारसभा झाली. त्या वेळी टिपणीया यांनी त्यांचे एक लोकप्रिय गाणे गायले होते. त्या वेळी राहुल गांधी यांनी त्यांच्या सादरीकरणाचे स्वतःच्या मोबाईलमधून छायाचित्रण केले होते. ते नंतर त्यांनी त्यांच्या ट्‌विटर हॅंडलवर अपलोड केले होते. 

"नागरिकांमध्ये सकारात्मक विचार निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने मी राजकारणात उतरलो आहे. यासाठी लोककलेची मोठी मदत मिळेल,'' अशी प्रतिक्रिया टिपणीया यांनी "पीटीआय'शी बोलताना दिली. जर मी जिंकलो तर नागरिकांना मूलभूत सेवांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करीन. तसेच, लोकसंगीताच्या प्रसारासाठीही काम करणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

देवासमधील भाजपचे उमेदवार महेंद्रसिंह सोलंकी (वय 35) हे दिवाणी न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. निवडणूक प्रचारात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांवर आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील सरकारच्या भूमिकेवर भर देत आहेत. ""मी जेव्हा न्यायाधीश होतो, तेव्हा माझ्या न्यायालयात येणाऱ्यांचीच दुःखे मला समजत होती; पण राजकारणात प्रवेश केल्यानंतर माझा लोकसेवेचा परीघ विस्तारला आहे. राजकारणी म्हणून मी तळागाळातील, दुःखी-कष्टी लोकांपर्यंत पोचू शकतो आणि त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम करू शकतो,'' असे सोलंकी म्हणाले. 

देवासची जागा 2014मध्ये भाजपकडे होती. मनोहर उंटवाल येथून निवडून आले होते. गेल्या वर्षी मध्य प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ते अगार मतदारसंघातूनही निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. 

देवास मतदारसंघ 
19 मे - मतदानाची तारीख 
10.97 लाख - एकूण मतदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP and Congress have fielded two Reputed names in Devas Loksabha