मनेका गांधींनी लगावला राहुल गांधींना असा टोला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मे 2019

राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाल्यानंतर भाजपा नेत्या मनेका गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली.

नवी दिल्ली: अमेठी लोकसभा मतदार संघातून भाजपच्या स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला असून, राजकारण हा काही पोरखेळ नाही, अशा शब्दांमध्ये भाजप नेत्या मनेका गांधी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.

अमेठी लोकसभा निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागले होते. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघामध्येही काँग्रेसला इतिहासामध्ये प्रथमच पराभव स्वीकारावा लागला आहे. राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाल्यानंतर भाजपा नेत्या मनेका गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली.

पत्रकारांशी बोलताना मनेका गांधी म्हणाल्या, 'राजकारण हा काही पोरखेळ नाही. निवडणूक प्रचारात एकही योग्य मुद्दा उचलला नाही. केवळ गाडीत बसून हात उंचावला म्हणजे निवडणूक प्रचार झाला असे होत नाही. राजकारण करायचे तर व्यवस्थित आणि गंभीरपणे करा.'

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावी जबाबदारी स्वीकारली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय, स्मृती इराणी यांना विजयासाठी शुभेच्छा देताना, अमेठी लोकसभा मतदारसंघाची काळजी घ्या अशी भावनिक साद घातली. 2004 पासून राहुल गांधी येथून विजय मिळवत आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader maneka gandhi targets rahul gandhi