Loksabha 2019 : काश्मीरमध्ये भाजप भगव्याऐवजी हिरव्या रंगात

वृत्तसंस्था
सोमवार, 8 एप्रिल 2019

भाजपने भगव्याऐवजी हिरव्या रंगाचा वापर केला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या राजकीय प्रचारात प्रथमच ही बाब घडल्याचे निदर्शनास आली आहे.

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने काढलेल्या रॅलीदरम्यान पक्षाच्या प्रचार जाहिरातींमधून भगवा रंगाऐवजी हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला. या जाहिरातींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही छायाचित्र छापण्यात आले आहे. नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शेखर खालिद जहाँगिर यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली होती. स्थानिक मतदारांना आकर्षिक करण्यासाठी शेख खालिद यांनी हिरव्या रंगात आपल्या जाहिराती प्रकाशित केल्या आहेत.  वर्तमानपत्रांना दिलेल्या जाहिरातींमध्ये भाजपने भगव्याऐवजी हिरव्या रंगाचा वापर केला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या राजकीय प्रचारात प्रथमच ही बाब घडल्याचे निदर्शनास आली आहे. काश्मीरमधील प्रसिद्ध वर्तमानपत्र असलेल्या ग्रेटर काश्मीर आणि काश्मीर उजमा या वर्तमानपत्रात भाजपने शेख खालिद यांच्या प्रचारार्थ जाहिराती दिल्या आहेत. या जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्रही वापरण्यात आले आहे. भाजपचे नावही हिरव्या रंगात लिहिले आहे. भाजपचे चिन्ह कमळ हे पांढऱ्या रंगात दाखविण्यात आले आहे. 'खोट सोडा, खरा बोला आणि भाजपाला मत द्या,' असा संदेशही उर्दु भाषेमधून या जाहिरातींवर देण्यात आला आहे.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील भाजपचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी या जाहिरातींचे समर्थन केले आहे. भाजपच्या झेंड्यात हिरवा आणि भगवा हे दोन्ही रंग वापरात आहेत. हिरवा रंग शांती आणि प्रगतीचे प्रतिक आहे. भाजप पक्ष रंगांवर विश्वास ठेवत नसून, सबका साथ सबका विकास हेच आमचे ध्येय आहे, असे ठाकूर यांनी म्हटले. केवळ भाजपच्याच झेंड्यात सर्वधर्मीय रंगांचा समावेश केला आहे. याउलट पीडीपीचा झेंडा हा हिरवा आहे, तर नॅशनल कॉन्फरन्सचा झेंडा लाल आहे, असेही स्पष्टीकरण ठाकूर यांनी दिले आहे.

नॅशनल कॉन्फ्रेन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी भाजपच्या या जाहिरातीवर टीका केली आहे. काश्मीरमध्ये पोहोचताच भगव्या रंगाची भाजप हिरव्या रंगात बदलली. भाजपकडून मतदारांना मूर्ख बनविण्यात येत आहे. काश्मीरमध्ये प्रचारासाठी भाजप आपल्या खऱ्या रंगाचा वापर का करत नाही?, असा प्रश्न अब्दुल्ला यांनी विचारला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp is in a new fashion, instead of saffron green color at jammu kashmir