Loksabha 2019 : भाजपला चुकून मत दिल्याने कापले स्वतःचे बोट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

बसप ऐवजी चुकून बीजेपी समोरील बटन दाबले गेल्यामुळे तो निराश झाला होता. मतदान करुन घरी आल्यानंतर रागाच्या भरात त्याने स्वत:चे बोट कापले.

लखनौः लोकसभा निवडणुकांसाठीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासमोरील चुकून बटन दाबले गेल्यामुळे भाजपला मतदान झाल्याच्या नैराश्यातून एकाने आपले बोटच कापल्याची घटना येथे घडली आहे.

पवन कुमार (वय 25) असे बोट कापलेल्या मतदाराचे नाव आहे. पवन कुमारला शिक्रापूर येथील अब्दुल्लापूर हुलासन गावात राहणाऱ्या उमेदवाराला मतदान करायचे होते. पण त्याने चुकून सिंग यांच्या नावासमोरचे बटन दाबले. मात्र, आपली चूक लक्षात येईपर्यंत त्याचे मत नोंदवले गेले होते. पवन कुमार हा बहुजन समाजवादी पक्षाचा (बसप) कार्यकर्ता आहे. बसप ऐवजी चुकून बीजेपी समोरील बटन दाबले गेल्यामुळे तो निराश झाला होता. मतदान करुन घरी आल्यानंतर रागाच्या भरात त्याने स्वत:चे बोट कापले. पवन याने एक व्हिडिओ ट्विटवर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली. माझ्याकडून झालेल्या चुकीसाठी व माझे मत भाजपला गेल्यामुळे मी स्वत:चे बोट कापल्याचे पवनने पत्रकारांशी बोलताना सांगितले. मतदान केल्यानंतर ज्या बोटाला शाई लावली जाते तेच डाव्या हाताचे बोट पवनने कापले आहे.

दरम्यान, बुलंदशहरमध्ये सध्याचे भाजप खासदार भोला सिंग आणि सपा-बसपा-राजद युतीचे योगेश वर्मा यांच्यामध्ये थेट लढत रंगली आहे. लोकसभा निवडणुकांसाठीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी (ता. 18) पार पडले. देशभरातील 95 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSP supporter votes for BJP by mistake after chops off his finger at UP