LokSabha 2019 : आम्ही जिंकण्यासाठी नाही; भाजपला पराभूत करण्यासाठी लढतोय : प्रियांका गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मे 2019

केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड या पट्ट्यातील जागांवर काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांची भिस्त आहे. गेल्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेसला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला होता.

लखनौ : 'उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्ष कमकुवत आहे. त्यामुळे इथे आम्ही जिंकण्यासाठी नव्हे, तर भाजपला पराभूत करण्यासाठी लढत आहोत', असे विधान काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी आज (बुधवार) केले. 'काँग्रेसमुळे सप-बसप युतीवर काहीही परिणाम होणार नाही; उलट भाजपचीच मते कमी होणार आहेत', असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.

केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड या पट्ट्यातील जागांवर काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांची भिस्त आहे. गेल्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेसला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला होता.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील उत्तर प्रदेशच्या राजकीय चित्राविषयी प्रियांका गांधी म्हणाल्या, 'येथे आम्ही एकतर जिंकणारे उमेदवार निवडले आहेत किंवा भाजपला नुकसान करणारे उमेदवार निवडले आहेत. आमच्या उमेदवारांमुळे सप-बसप युतीचे काहीही नुकसान होणार नाही. आम्ही आत्ता २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा अजिबात विचार करत नाही. सध्याचे आमचे लक्ष्य आहे २०१९ मध्ये भाजपला पराभूत करणे!''

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोक दल या तीन पक्षांनी युती केली आहे. पण 'भाजपविरोधात महागठबंधन करू' अशी भाषा करणार्‍या काँग्रेसला या तीनही पक्षांनी त्यांच्या युतीमध्ये स्थान दिलेले नाही. त्यामुळे काँग्रेस आणि या युतीमध्ये मतांची विभागणी होत भाजपला फायदा होईल, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress will damage BJP in Uttar Pradesh says Priyanka Gandhi