Loksabha 2019 : प्रज्ञासिंह यांच्याविरुद्ध 'एफआयआर'चे आदेश 

वृत्तसंस्था
Tuesday, 23 April 2019

"अयोध्येमध्ये 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्या वेळी मीही त्यात सहभागी होते. मला त्याचा अभिमान आहे,''

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाबरी मशिदप्रकरणी केलेल्या वक्तव्याबद्दल साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरुद्ध 'एफआयआर' दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या भोपाळमधील भाजपच्या उमेदवार आहेत. "अयोध्येमध्ये 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्या वेळी मीही त्यात सहभागी होते. मला त्याचा अभिमान आहे,'' असे वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते.
 
"आम्ही देशाचा कलंक मिटवला. आम्ही बाबरी मशीद पाडण्यासाठी गेलो होतो. बाबरी मशीद पाडताना मी सर्वांत वरती चढले होते. देवाने मला ही संधी दिली, त्याचा मला अभिमान आहे. त्या ठिकाणी निश्‍चितपणे राममंदिर बांधले जाईल,'' असे प्रज्ञासिंह म्हणाल्या होत्या. 
दोन समुदायांमध्ये तेढ, संघर्ष निर्माण केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांना नोटीस बजावण्यात आली. पण, त्या आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या. मी तिथे गेले होते. हे मी नाकारणार नाही. मी अयोध्येला जाऊन राममंदिर बांधण्यासाठी मदत करणार आहे. कोणीही मला त्यापासून थांबवू शकत नाही, असे साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले आहे.
 
साध्वी प्रज्ञासिंह यांनी हुतात्मा पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविरुद्धही आक्षेपार्ह विधाने केली होती. नंतर त्यांनी त्यांची विधाने मागे घेतली होती. दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह यांनी सोमवारी भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Commission Order for FIR against Pragya Singh