Loksabha 2019 : खरा गौतम गंभीर 'एसी'त; डुप्लिकेट उन्हात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मे 2019

गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून गंभीर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने क्रिकेटपटू गौतम गंभीरला पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून गंभीर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. गंभीरने त्याचा डुप्लिकेट मोटारीवर उन्हात उभा केला होता आणि स्वत: मोटारीत बसल्याने तो चर्चेत आला आहे.

गंभीरच्या विरोधात आम आदमी पक्षाकडून आतिशी मार्लेना या निवडणूकीच्या रिंगणात उभ्या आहेत. आतिशींनी गौतम गंभीरवर गंभीर आरोप केले आहेत. मतदासंघातल्या काही ठिकाणी आतिशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके वाटण्यात आली. यामागे भाजप आणि गौतम गंभीर असल्याचा आरोप मार्लेना यांनी पत्रकार परिषदेत केला होता. यावेळी त्यांना पत्रकातील मजकूर वाचून दाखवत असताना रडू कोसळले होते. या प्रकरणी आतिशी यांनी दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गंभीर विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

या सर्व प्रकरणांमुळे गंभीर ट्रोल होत होता. यामध्ये आता गंभीरच्या डुप्लीकेटची भर पडली आहे. गंभीरने प्रचार करत असताना मोटारीवर उन्हात त्याचा डुप्लिकेट उभा केला होता. डुप्लिकेट डोक्यावर टोपी घालून उभा असल्यामुळे लोकांच्या लक्षात येणार नाही, असा अंदाज होता. मात्र, स्वत: गंभीर त्या मोटारीत एसीमध्ये बसून होता. हे काही मतदारांनी ओळखले आणि छायाचित्र काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे गौतम गंभीर ट्रोल होऊ लागला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gautam Gambhir sat in cars AC and Duplicate standing in the sun Photo viral