Loksabha 2019: 1 कोटींची रोकड जप्त; प्राप्तिकर अधिकाऱ्यांची कारवाई 

वृत्तसंस्था
बुधवार, 17 एप्रिल 2019

- दक्षिणेमध्ये "नोट फॉर व्होट'वरून नवे राजकारण
- एएमएमके' पक्षाच्या समर्थकांनी ठेवलेली 1 कोटी 48 लाख रुपयांची रक्कम

चेन्नई : देशभर निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना दक्षिणेमध्ये "नोट फॉर व्होट'वरून नवे राजकारण सुरू झाले आहे. तमिळनाडूतील थेनी जिल्ह्यामध्ये टी. टी. व्ही. दिनकरन यांच्या "एएमएमके' पक्षाच्या समर्थकांनी साठवून ठेवलेली 1 कोटी 48 लाख रुपयांची रक्कम प्राप्तिकर विभागाने आज जप्त केली.

ही सगळी रक्कम 94 पाकिटे आणि लिफाफ्यांमध्ये ठेवण्यात आली होती. त्यावर वॉर्ड क्रमांक, मतदारांची संख्या तसेच प्रत्येक मतदाराला तीनशे रुपये देण्याची सूचना देण्यात आल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात बोलताना प्राप्तिकर विभागाच्या तपास खात्याचे महासंचालक बी. मुराली कुमार म्हणाले, रात्रभर चाललेली ही कारवाई आज सकाळी साडेपाचच्या सुमारास संपुष्टात आली. अंडीपत्ती विधानसभा मतदारसंघातील वॉर्डांमध्ये उद्या (ता.18) मतदान होणार आहे. ज्या कार्यालयातून ही रक्कम जप्त करण्यात आली ते कार्यालय एएमएमके' पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे आहे. आता यासंदर्भातील अहवाल हा केंद्रीय थेट कर मंडळ, कर विभाग आणि निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे. 

पोलिसांकडून गोळीबार 
रात्री पोलिसांची कारवाई सुरू असताना त्यामध्ये राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. या वेळी "एएमएमके'च्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I T officials seizes Rs 1.48 crore cash from TTV Dhinakarans party functionary in Theni