तृणमूल काँग्रेसच्या आमदाराचे जवानांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

वृत्तसंस्था
बुधवार, 17 एप्रिल 2019

निवडणुकीच्या कामासाठी तैनात केलेल्या जवानांना कोणीही घाबरु नये, जर काही झाले तर त्यांच्यावर हल्ला करा.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) आमदार रत्ना घोष यांनी जवानांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. घोष यांचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कार्यकर्त्यांशी बोलताना रत्ना घोष म्हणाल्या की, 'जर तुम्हाला युद्ध जिंकायचे असेल तर काय बरोबर, काय चूक याचा विचार करत बसू नका. लोकशाहीच्या मार्गाने अथवा त्याच्या विरोधात जाऊन आपल्याला जिंकावच लागेल. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला जिंकावच लागले. मी 2016 मध्ये पाहिले आहे की, सुरक्षाबलातील जवान आमच्या मुलांना (कार्यकर्त्यांना) मारतात. निवडणुकांमध्ये मोठ्याप्रमाणात रक्तपात होतो. यावर्षीची निवडणूक ही अधिकच आव्हानात्मक आहे. परंतु घाबरण्याची गरज नाही. निवडणुकीच्या कामासाठी तैनात केलेल्या जवानांना कोणीही घाबरु नये, जर काही झाले तर त्यांच्यावर हल्ला करा.' रत्ना घोष यांचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त विधाने केल्याप्रकरणी बहुजन पार्टीच्या प्रमुख मायावती, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, समाजवादवादी पार्टीचे नेते आझम खान आणि भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करताना प्रचारबंधी घातली आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या या कारवाईनंतरही बाकीच्या राजकीय नेत्यांवर काही परिणाम होताना दिसत नाही. कारण, केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

Web Title: If need then chase and attack on Central forces says TMC MLA Ratna Ghosh