Loksabha 2019 : कर्नाटकात देवेगौडांचे संपूर्ण कुटुंबच उतरलंय रणांगणात

 Loksabha 2019 : कर्नाटकात देवेगौडांचे संपूर्ण कुटुंबच उतरलंय रणांगणात

माजी पंतप्रधान आणि कर्नाटकाचे भूमिपुत्र (‘मन्नीन मगा’) एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे दोन नातू लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. सध्या त्यांच्या कुटुंबात एक मुख्यमंत्री, एक कॅबिनेट खात्याचे मंत्री, एक आमदार, एक जिल्हा पंचायत सदस्य अशी पदे आहेत. आता देवेगौडांच्या संपूर्ण कुटुंबानेच लोकसभेसाठी प्रचाराच्या मैदानात उडी घेतली आहे.

‘मन्नीन मगा’ असे बिरुद स्वतःच लावून घेतलेले देवेगौडा सात वेळा आमदार आणि सहा वेळा खासदार झाले आहेत. ते ५०-५५ वर्षे राजकारणात आहेत. एकदा त्यांना पंतप्रधानपदाचा ‘जॅकपॉट’ही लागला आहे. ८५ वर्षे ओलांडलेल्या देवेगौडांना आता दोन नातवंडांसोबत लोकसभेत प्रवेश करायचा आहे. ते धर्मनिरपेक्ष जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

२०१४ च्या निवडणुकीत हासन या घरच्या मतदारसंघातून ते खासदार झाले. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची एकदा राज्यसभेवर निवड झाली. तसेच कनकपुरातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. येथूनच एकदा त्यांचा पराभवही झाला आहे. गुरुवारी (ता. १८) झालेल्या मतदानात आता देवेगौडा आणि त्यांच्या दोन्ही नातवांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे.

एच. डी. देवेगौडा

कर्नाटकातील तुमकूर मतदार संघातून सातव्यांदा लोकसभेसाठी नशीब आजमावित आहेत. त्यांचा सामना भाजपच्या जी. एस. बसवराजू यांच्याशी आहे. या मतदारसंघात वक्कलिग मतदार जास्त आहेत. तसेच हासन जिल्ह्याला लागून असल्याने या मतदारसंघावर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे तेथून विजय मिळेल, असा होरा देवेगौडा यांनी बांधला आहे.

प्रज्वल रेवण्णा
नातू प्रज्वल रेवण्णा यांच्यासाठी देवेगौडा यांनी हासन मतदारसंघ सोडला. देवेगौडांचे ज्येष्ठ पुत्र एच. डी. रेवण्णा यांचे प्रज्वल पुत्र आहेत. प्रज्वल यांचा सामना भाजपच्या ए. मंजू यांच्याशी आहे. काँग्रेसचे बंडखोर ए. मंजू यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. २०१४ मध्ये मंजू यांनी देवेगौडा यांना टक्कर देत पराभव स्वीकारला होता.

निखिल कुमारस्वामी

मंड्या या लोकसभा मतदारसंघातून देवेगौडा यांचे आणखी एक नातू निखिलगौडा ऊर्फ निखिल कुमारस्वामी रिंगणात आहेत. एच. डी. कुमारस्वामी यांचे ते पुत्र आहेत. तेथून अपक्ष उमेदवार आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुमलता अंबरीश यांच्याशी त्यांचा मुकाबला आहे. या एकाच मतदारसंघात भाजपने उमेदवार दिलेला नाही. 

एच. डी. कुमारस्वामी

कनकपूर मतदारसंघातून १९९६ मध्ये लोकसभेत. २००६ मध्ये पहिल्यांदा कर्नाटकाचे मुख्यमंत्री बनले. २३ मे २०१८ पासून मुख्यमंित्रपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली.

एच. डी. रेवण्णा

रेवण्णा हे देवेगौडांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. हासन जिल्ह्यातील होळेनरसिंहपूर या विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करतात. २००४ पासून ते सतत प्रतिनिधीत्व करत आहेत.

अनिता कुमारस्वामी

अनिता कुमारस्वामी या एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी आहेत. त्या रामनगरम येथून निवडून आल्या आहेत. त्यांचे पुत्र निखिल मंड्या लोकसभेसाठी रिंगणात आहेत.

भवानी रेवण्णा
भवानी रेवण्णा या एच. डी. रेवण्णा यांच्या पत्नी आहेत. त्या हळेकोटे मतदारसंघातून जिल्हा पंचायतीवर गेल्या आहेत. त्यांचे पुत्र प्रज्वल हासन मतदारसंघातून लोकसभेसाठी रिंगणात आहेत.



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com