Loksabha 2019 : अभिनंदन मोदीजी. सुंदर पत्रकार परिषद! : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 18 मे 2019

अभिनंदन मोदीजी. सुंदर पत्रकार परिषद! आपण आलात हाच निम्मा विजय आहे. पुढच्यावेळी श्री. शहा तुम्हाला एक-दोन प्रश्‍नांची उत्तरे देण्याची संधी देतील. वेल डन! 
- राहुल गांधी, कॉंग्रेसचे अध्यक्ष 

नवी दिल्ली : "मोदी विचारसरणी खिळखिळी करण्यात आली असून, धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांची आघाडी विजयी होईल,' असा दावा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. या आघाडीच्या पंतप्रधानांचा निर्णय निकालांनंतरच केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. मायावती, ममता बॅनर्जी किंवा मुलायमसिंह यादव हे भाजपला पाठिंबा देणार नाहीत, असेही त्यांनी खात्रीलायकपणे सांगितले. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस होता. 19 मे रोजी मतदानाची शेवटची फेरी होत असून, त्यानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी त्याच वेळी भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सुरू असलेल्या पत्रकार परिषदेबाबतही काही कोपरखळ्या मारल्या आणि किमान आपल्या "पहिल्या पत्रकार परिषदेत' तरी पंतप्रधान विविध प्रश्‍नांना उत्तरे देतील अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतीय मतदारांनी मोदी यांना केवळ भाषणे देण्यासाठी पंतप्रधान केलेले नाही ही बाब बहुधा ते विसरलेले असावेत; कारण जनतेचे मुख्य प्रश्‍नच ते विसरून गेले आहेत व त्यांना देशाचे खरे चित्र काय आहे हेच स्मरणात राहिलेले नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. 

"मोदी विचारसरणी' अशी संज्ञा वापरून राहुल गांधी म्हणाले, की या विचारसरणीशी आम्ही यशस्वीपणे लढा दिला आहे आणि आता ही विचारसरणी 90 टक्के आम्ही खिळखिळी केली आहे आणि मोदींनी स्वतः उर्वरित दहा टक्के नष्ट केली आहे. ही विचारसरणी पराभूत करून देशातील लोकशाही संस्थांचे आम्ही भाजप व रा. स्व. संघप्रणीत विचारसरणीपासून रक्षण केले आहे. आम्ही आमचे काम केलेले आहे. बाकीचे काम जनता व देश करील आणि त्याची प्रतीक्षा आम्ही करू. 23 मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालांबाबतचे भाकित करण्याचे राहुल गांधी यांनी नाकारले. आम्ही आमचे काम केलेले आहे. आता जनतेच्या निर्णयाबाबत मी भाकित करू इच्छित नाही, कारण तो त्यांचा अधिकार आहे असे सांगून त्यांनी जनता धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांच्या आघाडीला कौल देईल आणि या आघाडीचे सरकार स्थापन होईल असा विश्‍वास त्यांनी प्रकट केला. संभाव्य आघाडी सरकारच्या पंतप्रधानांबाबत विचारलेल्या विविध प्रश्‍नांना उत्तरे देताना ते म्हणाले, की जनता कोणता कौल देते व याची आम्हाला प्रतीक्षा आहे. त्यानंतरच कॉंग्रेस पक्ष सरकार स्थापनेबाबत पुढाकार घेईल आणि त्याचबरोबर पंतप्रधानपदाबाबत ठरविण्यात येईल. 

निवडणूक आयोगावरही राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली. निवडणूक आयोगासारख्या संस्थेवर टीका करतानाही आपल्याला फारसे चांगले वाटत नसल्याचे सांगून ते म्हणाले की या निवडणुकीत आयोगाचे आचरण पूर्णपणे पक्षपाती होते. निवडणुकीचे वेळापत्रकही मोदी यांच्या सोयीनुसार तयार करण्यात आले होते हे आता स्पष्ट झाले आहे. प्रचारात देखील पंतप्रधान वाटेल ते बोलत होते; परंतु आयोगाने त्याबाबत मौन धारण केले होते. विरोधी पक्षांबाबत पूर्णपणे पक्षपात करण्यात आला होता. परंतु या निवडणुकीत सत्याचा विजय होईल याची खात्री आहे. 

प्रतिसाद प्रेमानेच देणार 
पंतप्रधानांनी राजीव गांधी यांना "भ्रष्टाचारी क्र. 1' म्हटले होते त्याबाबत विचारणा केली असता राहुल गांधी यांनी "मोदी यांच्याकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक तिरस्कारयुक्त विधानाला मी प्रेमानेच प्रतिसाद देईन,' असे उत्तर दिले. "पंतप्रधानांचे आई-वडील राजकारणात नाहीत. परंतु समजा त्यांच्या हातून काही अयोग्य कृती घडली, तरीही मी त्यांच्याबद्दल कधीच वाईट शब्द किंवा भाषा वापरणार नाही,' असेही ते म्हणाले. 

अभिनंदन मोदीजी. सुंदर पत्रकार परिषद! आपण आलात हाच निम्मा विजय आहे. पुढच्यावेळी श्री. शहा तुम्हाला एक-दोन प्रश्‍नांची उत्तरे देण्याची संधी देतील. वेल डन! 
- राहुल गांधी, कॉंग्रेसचे अध्यक्ष 

Web Title: Loksabha 2019 Rahul Gandhi mocks PM for attending first PC with Amit Shah days before polling ends