Loksabha 2019 : दिग्गीराजा, भोपाळ आणि साध्वी

Digvijay and Pragya
Digvijay and Pragya

भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सध्या एकच चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह ऊर्फ दिग्गीराजा यांच्यासमोर साध्वींचेच आव्हान का उभे राहते आणि या वेळीदेखील साध्वी त्यांना मात देतील काय? उमा भारती आणि प्रज्ञासिंह ठाकूर या दोन साध्वी.

एकेकाळी मध्य प्रदेशात तीन राजकीय व्यक्तींचा बोलबाला होता. त्यांना मध्य देशी लोक ‘तीन देवियाँ’ म्हणत. त्यातल्या पहिल्या उमा भारती. त्यांनी दिग्विजयसिंह यांना मुख्यमंत्री पदावरून घालवले. इंदूरच्या खासदारकीचा मान आठ वेळा मिळवलेल्या सुमित्रा महाजन दुसऱ्या आणि विदिशाची खासदारकी दोनदा भूषवलेल्या सुषमा स्वराज तिसऱ्या. या तिघीही आता मैदानात नाहीत आणि महिला नेत्यांच्या अनुपस्थितीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात एका साध्वीने म्हणजे प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. 

दिग्विजयसिंह भोपाळमधून काँग्रेसचे, तर प्रज्ञासिंह ठाकूर भाजपच्या उमेदवार आहेत. मालेगावच्या स्फोटात संशयित म्हणून प्रज्ञासिंह यांचे नाव आल्यानंतर दिग्विजयसिंह यांनीच ‘भगवा दहशतवाद’ असा शब्द वापरला होता. त्याच दिग्गीराजांसमोर आता त्याच प्रज्ञासिंह उभ्या ठाकल्यात आणि आम्ही हे ठरवून केले, असे भाजपचे नेते म्हणत आहेत. ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द वापरणाऱ्या दिग्विजयसिंहांच्या पराभवासाठी त्यांनी जिच्या निमित्ताने समस्त हिंदू समाजाला नावे ठेवली, तिलाच मैदानात उतरवणे आम्हाला योग्य वाटले, असा तर्क भाजपचे लोक देतात. 

दिग्विजयसिंह यांच्या राजकीय जीवनातले हे वेगळे वळण आहे. तब्बल दशकभर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी राहिल्यानंतर त्यांचे सरकार घालवण्यात उमा भारतींनी त्यांच्या आक्रमक शैलीत मोठी कामगिरी केली होती. ते वर्ष होते २००३. उमा भारती १९९९ मध्ये भोपाळच्या खासदार निवडल्यानंतर त्यांनी दिग्विजयसिंह सरकारविरुद्ध मोहीम उभारली आणि त्यांचे सरकार घालवूनच त्या शांत बसल्या. त्यानंतर तब्बल पंधरा वर्षे मध्य प्रदेशात भाजपचे सरकार होते. ते गतवर्षी सत्तेवरून गेले आणि कमलनाथांचे काँग्रेसचे सरकार आले. राज्यात आपल्याच पक्षाचे सरकार असले तरी दिग्विजयसिंह सावध आहेत. प्रज्ञासिंह यांना आपल्या कोणत्याही वक्तव्याचा फायदा घेता येऊ नये, याची काळजी ते घेताहेत. 

हिंदुत्वाचा नवा चेहेरा
दुसरीकडे प्रज्ञासिंह यांची वक्तव्ये वादग्रस्त ठरताहेत. खरे तर वादग्रस्त विधाने करणे ही सवय दिग्विजयसिंहांची. ते बचावात्मक पवित्र्यात असताना प्रज्ञासिंह यांच्या माध्यमातून भोपाळचीच नव्हे; तर मध्य प्रदेशातील एकूणच निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्यावर केंद्रित करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय. ही निवडणूक ‘एच-एम’ म्हणजे हिंदू-मुस्लिम वळणावर जाऊ नये, असे समंजस लोक म्हणतात. ‘ये चुनाव एच-एम फॉर्म्युला तय करेगा’, असे स्थानिक सांगतात. प्रज्ञासिंहांच्या रूपाने भाजपला उमा भारतींनंतर हिंदुत्वाचा नवा चेहरा गवसलाय, असे राजकीय निरीक्षक म्हणतात. उमा भारती आणि प्रज्ञासिंह यांच्यातील साम्यस्थळेही ते अधोरेखित करतात.

दोघींच्याही वेश आणि केशभूषेपासून ते आक्रमक शैलीपर्यंतची साम्यस्थळे हा चर्चेचा विषय. उमा भारती बालपणापासून संघाच्या कामाने प्रभावीत झालेल्या होत्या. प्रज्ञासिंहदेखील संघाशी जोडलेल्या आहेत. उमा भारतींच्या काळापासून नव्हे तर त्याच्याही आधीपासून भोपाळ भाजपचा गड आहे. भोपाळमधून काँग्रेसचा खासदार शेवटचा निवडून आला त्याला आता युग लोटले. 

१९८९ ते २०१४ या काळात इंदूरप्रमाणेच भोपाळही भाजपच्याच ताब्यातील लोकसभा मतदारसंघ. या पार्श्वभूमीवर दिग्विजयसिंह यांनी भोपाळसारखा कठीण मतदारसंघ निवडला. मागच्या निवडणुकीतही काँग्रेसचा उमेदवार भोपाळमधून मोठ्या फरकाने पराभूत झाला होता. काँग्रेसने दिग्विजयसिंहांना उमेदवारीद्वारे संधी दिली, की त्यांच्या भविष्याची दारे बंद केलीत, हे सांगणे आताच कठीण आहे. दिग्विजयसिंह यांच्यावरचा रोष कमी झाला असल्याचे एक ज्येष्ठ संपादक सांगतात आणि प्रज्ञासिंहांनी हेमंत करकरेंसंदर्भात केलेले वक्तव्य हे त्याचे कारण म्हणून सांगतात. 

दिग्विजयसिंहांना हरवणे अवघड
वरिष्ठ प्रशासकीय वर्तुळात भाजपच्या निवडीबद्दल फारसे समाधान नाही. भोपाळच्या मतदारांमध्ये सुशिक्षितांचे, विचारी लोकांचे प्रमाण मोठे आहे. इथे कितीही प्रयत्न केला तरी जातीय वळणावर निवडणूक नेणे कठीण आहे, असे ही मंडळी म्हणतात; पण ती त्या दिशेने जाताना दिसतेय, हे खरे. भोपाळ मतदारसंघ ७५ टक्के शहरी, तर २५ टक्के ग्रामीण आहे. अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्या वीसेक टक्के आहे. काँग्रेसला हिंमत देणाऱ्या या आकड्यांना मोठ्या संख्येने भोपाळमध्ये वसलेल्या मुस्लिम मतदारांचे पाठबळ आहेच, हे विसरून चालणार नाही. या साऱ्या मुद्यांचा विचार केला तरी दिग्विजयसिंहांना हरवणे सोपे नाही; पण भाजपचा पद्धतशीर निर्धारदेखील डोळ्याआड करता येत नाही. मोदींची लाट ओसरली असली तरी, लोकांना पर्याय दिसत नाही. मोदी लाट नसेल, पण मोदी हा मुद्दा आहेच. तो देशात इतरत्र आहे, तसा मध्य प्रदेशातही आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी हुतात्म्यांच्या नावावर मते मागतात आणि त्यांच्या पक्षाची उमेदवार करकरेंच्या हौतात्म्यावर टीकाटिप्पणी करते, यातला विरोधाभास लोकांच्या लक्षात येईल, असे काँग्रेसजनांना वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com