Loksabha 2019 : भाजपच्या स्वप्नाला अडथळा बंगाली अस्मितेचा!

श्रीमंत माने
गुरुवार, 9 मे 2019

काळ्या झेंड्याऐवजी जय श्रीराम!
भाजपने हवा बनवलेल्या ‘जय श्रीराम’ घोषणेबद्दल एका ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितले, की हे आधीच्या काळ्या झेंड्यांचे नवे रूप आहे. यापूर्वी विरोधी विचारांच्या नेत्यांचा ताफा जात असताना रस्त्याच्या कडेला लोक काळे झेंडे दाखवायचे. आता विशेषत: तृणमूलच्या नेत्यांना ऐकू जाईल, अशा ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या जातात.

पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे.

पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या अंतिम टप्प्यात बंगाली अस्मितेचा सामना करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप नेते नरेंद्र मोदींच्या चौफेर हल्ल्याचा सामना करताना देवी दुर्गा, काली माता यांच्या रूपाने तसे संकेत दिले आहेत. भाजपचे पश्‍चिम बंगालमध्ये ‘मिशन २३’ यशस्वी होईल का? ‘तृणमूल’च्या बालेकिल्ल्यात भाजपला नेमक्‍या किती जागा मिळतील, हेच प्रश्‍न सध्या प्रत्येकाला पडलेत. त्याचे उत्तर हे, की भाजपला निश्‍चितपणे दोनअंकी जागांची संधी आहे. ‘जय श्रीराम’ घोषणेची हवा मतदान यंत्रात उतरवण्यासाठी ‘बूथ वर्कर’ची फळी जिथे असेल, त्या जागांवर विजयाची शक्‍यता अधिक असेल.

सोळाव्या लोकसभेत दार्जिलिंगमधून केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया आणि आसनसोलमधून दुसरे मंत्री बाबूल सुप्रियो असे भाजपचे दोन खासदार होते. या दोन्हीही जागा अडचणीत असल्याचे बोलले जाते. गोरखालॅंड आंदोलनाचा लाभ अहलुवालियांना झाला होता. ते आंदोलन ममतांनी मोडून काढलंय. परिणामी, अहलूवालियांना मतदारसंघ बदलावा लागला. ते आता वर्धमान-दुर्गापूरमधून लढताहेत. दार्जिलिंगमध्ये भाजपने ‘त्रिपुरा’ प्रयोग केलाय. दिल्लीतील व्यावसायिक विप्लवकुमार देव यांना जसे त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदी बसवण्यात आले, त्याच पद्धतीने दिल्लीतील सूर्या रोशनी कंपनीचे मालक राजू बिश्‍ता यांना दार्जिलिंगची उमेदवारी देण्यात आली आहे.

बंगालच्या उत्तर भागातील अलिपूरद्वार, दार्जिलिंग, बालूरघाट अशा काही जागांवर भाजपला अधिक संधी आहे; परंतु त्याही भागात ममतांनी बंगाली अस्मितेला साद घातली आहे. मतदानाच्या पाच टप्प्यामध्ये जसजसा प्रचार पुढे सरकला तसे भाजपने हिंदुत्व अधिक जवळ केले. कोलकाता, तसेच दक्षिण भागातील हिंदी भाषिक, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमधून पोटापाण्यासाठी बंगालमध्ये आलेल्या लोकांमध्ये भाजपची हवा आहे.

रसवंती, पानपट्टी चालवणारे, टॅक्‍सीचालक आणि अन्य भैया, बिहारी लोकांच्या तोंडी भाजपला ‘बारा ते पंधरा नक्की’ अशी भाषा आहे. या हक्‍काच्या मतदारांशिवाय तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल मंडळींसोबत स्थानिक बंगाली मतदार किती जातो, यावर यशाची गणिते अवलंबून आहेत.

लांगूलचालन अंगाशी येणार?
राज्यातील ३० ते ३२ टक्के मुस्लिम मतदार ही ममता दीदींची व्होटबॅंक आहे; परंतु हाच मुद्दा त्यांच्या विरुद्धही जाण्याचा धोका आहे. अगदी बिनदिक्कतपणे त्यांनी केलेले मुस्लिमांचे लांगूलचालन लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे परंपरागत डावे पक्ष आणि काँग्रेस यांना मतदान करणारे भाजपकडे वळू शकतात. तृणमूलमध्येही कमी-अधिक प्रमाणात धुसफुस आहे. तिचा फटका काही जागांवर दीदींना बसू शकतो. म्हणूनच अखेरच्या टप्प्यात त्यांनी आक्रमकपणे बंगाली अस्मितेवर साद घालण्याचा प्रयत्न चालवला आहे.

झारग्राम आणि तामलूक येथील ६ मेच्या प्रचारसभांमध्ये मोदींनी बंगालमध्ये ‘जय श्रीराम’ घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात असल्याचा आरोप केला. विष्णूपूरच्या सभेत ममतांनी बंगाली जनता जयदुर्गा, जय कालिमाता म्हणेल. भाजपला हवे म्हणून ‘जय श्रीराम’च्या घोषणा कशाला देईल, असा प्रश्‍न केला. त्याशिवाय दोन्ही नेत्यांनी अनुक्रमे खंडणीवसुली आणि गुजरातमधील रक्तपाताचे हातावर डाग, असे आरोपही प्रतिस्पर्ध्यांवर केलेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Mamta Banerjee BJP Politics West Bengal