Loksabha 2019 : विरोधकांनो, तुमचा एक्झिट पोलवर भरवसा नाय का?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बहुतेक मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त झाला असला, तरी विरोधक मात्र या चाचण्यांवर विश्‍वास ठेवण्यास तयार नाहीत. विशेषत: प्रादेशिक पक्षांनी या चाचण्यांकडे दुर्लक्ष करीत प्रत्यक्ष निकालाची वाट पाहण्यास पसंती दिली आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बहुतेक मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त झाला असला, तरी विरोधक मात्र या चाचण्यांवर विश्‍वास ठेवण्यास तयार नाहीत. विशेषत: प्रादेशिक पक्षांनी या चाचण्यांकडे दुर्लक्ष करीत प्रत्यक्ष निकालाची वाट पाहण्यास पसंती दिली आहे.

अंदाज खोटा ठरेल - पलानीस्वामी
सालेम (तमिळनाडू) -
 लोकसभा निवडणुकीत अण्णा द्रमुक पक्षाची कामगिरी खराब होईल, हा सर्वेक्षण संस्थांनी वर्तविलेला अंदाज खोटा ठरेल, असा विश्‍वास या पक्षाचे नेते आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी आज व्यक्त केला. ‘‘२०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी पराभूत होईल आणि आमच्या पक्षाला केवळ तीन जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. पण, मी जिंकलो आणि पक्षालाही दहा जागा मिळाल्या. आताही राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा आणि पुद्दुच्चेरीची जागा आमची आघाडी जिंकेल,’ असा दावा पलानीस्वामी यांनी केला. गेल्या निवडणुकीत अण्णाद्रमुकने मोठा विजय मिळविला होता.

प्रत्यक्ष निकालाकडे लक्ष - स्टॅलिन
चेन्नई -
 मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये तमिळनाडूमधील द्रमुक पक्षाला बऱ्याच जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला, तरी या पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी या चाचण्यांवर विश्‍वास नसल्याचे म्हटले आहे. या चाचण्यांनी केलेल्या अंदाजांना मी गंभीरपणे घेत नसून, जनतेने दिलेला खरा कौल समजण्यासाठी आणखी तीन दिवस वाट पाहणार आहे, असे स्टॅलिन यांनी स्पष्ट केले. ‘यूपीए’ अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मतमोजणीच्या दिवशीच विरोधकांची बैठक बोलाविली असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता स्टॅलिन यांनी, अशा बातम्या फक्त माध्यमांमध्येच येतात. निकाल जाहीर झाल्यानंतरच अशा बैठकीला अर्थ आहे,’ असे उत्तर दिले.

हा गैरव्यवहार - तेजस्वी यादव
पाटणा -
 लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विजय प्राप्त होईल, हा कल चाचण्यांनी व्यक्त केलेला अंदाज म्हणजे गैरव्यवहार असल्याची टीका राष्ट्रीय जनता दलाने केली आहे. जनतेमध्ये भाजपबद्दल नाराजी असून, या वास्तवाला छेद देणारे हे अंदाज आहेत, असा दावा ‘राजद’चे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. बिहारमधील चाळीस जागांपैकी भाजप, जेडीयू आणि लोजप या आघाडीला ३० हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज कल चाचण्यांमध्ये वर्तविण्यात आला आहे. ‘हे अंदाज खोटे असून, दुर्लक्षित घटकांची दिशाभूल करण्यासाठीची संघ आणि त्यांच्या संलग्न संस्थांची नेहमीची खेळी आहे,’ असा आरोपही यादव यांनी केला.

चिंता नाही - तृणमूल 
कोलकता -
 एक्‍झिट पोलच्या अंदाजानंतरही आम्हाला चिंता वाटत नाही. कारण, अनेकदा असे अंदाज खोटे ठरतात, असे मत तृणमूल काँग्रेसने व्यक्त केले आहे. जिल्हापातळीवरील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही आमची राजकीय गणिते करीत आहोत, असे तृणमूलच्या एका नेत्याने सांगितले. तृणमूलचे नेते विविध प्रादेशिक पक्षांबरोबरही चर्चा करीत आहेत. पश्‍चिम बंगालमधील एकूण ४२ जागांपैकी तृणमूलला २४, भाजपला १६, काँग्रेसला दोन जागांचा अंदाज कल चाचण्यांमध्ये वर्तविण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Result Exit Poll Opposition Party Trust Politics