आएंगे तो मोदीही : एक्झिट पोलचा अंदाज

Exit-Poll
Exit-Poll

काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी
नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल जाहीर झाले. यंदा भारतीय जनसागरात मोदी लाट नसली तरीसुद्धा सत्ता सिंहासनी मात्र पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच विराजमान होणार असल्याचे चित्र कल चाचण्यांमधून पुढे आले आहे. विशेष म्हणजे यंदा काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या जागाही वाढण्याचा अंदाज आहे. 

देशाच्या राजकारणातील सर्वांत मोठे कुरुक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये यंदा भाजपला मोठा फटका बसण्याची शक्‍यता असून, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी येथे मुसंडी मारणार असून, भाजपला केवळ चाळीस जागांवरच समाधान मानावे लागू शकते, असे ‘रिपब्लिक टीव्ही’ने म्हटले आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत मायावतींच्या ‘बसप’ला खातेही उघडता आले नव्हते. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये भाजपला मोठे यश मिळेल असा अंदाज ‘इंडिया टुडे-ॲक्‍सिस माय इंडिया’ने व्यक्त केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) जागा वाढणार असून, यात दुपटीने भर पडू शकते, असेही कल चाचण्यांच्या अंदाजातून स्पष्ट होते.

यंदा प्रादेशिक घटकदेखील राष्ट्रीय पक्षांना भारी ठरणार असून, दक्षिणेचा विचार केला तर आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष, कर्नाटकमधील धर्मनिरपेक्ष जनता दल, तेलंगणमधील तेलंगण राष्ट्र समिती, तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक या पक्षांच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होणार असून, सत्तास्थापनेमध्ये हे पक्ष महत्त्वाचा घटक ठरू शकतात.

बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाची आघाडी जोरदार मुसंडी मारेल असे ‘आजतक आणि ॲक्‍सिस माय इंडिया’ने म्हटले आहे. येथे भाजपला ३८ ते ४० जागा मिळू शकता. पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला २५ आणि भाजपप्रणीत ‘एनडीए’ला पंधरा जागा मिळतील असा अंदाज ‘टाइम्स नाऊ आणि व्हीएमआर’ने व्यक्त केला आहे. कर्नाटकमध्येही धर्मनिरपेक्ष जनता दल काँग्रेस आघाडीला ७ आणि भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीएला) २१ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समितीला तेरा जागा मिळतील असा ‘टाइम्स नाऊ व्हीएमआर’चा अंदाज आहे. हरियानामध्येही यंदा भाजपचाच वरचष्मा राहू शकतो, तर ओडिशामध्ये भाजपच्या पदरात मोठे माप पडण्याची शक्‍यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com