Loksabha 2019 : नेतृत्वाचा कस लावणारी निवडणूक

Politics
Politics

तमिळनाडूच्या राजकारणावर हुकमत गाजवणारे जयललिता आणि एम. करुणानिधी हे परस्परांचे कट्टर विरोधक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडे अनुक्रमे अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांची सूत्रे आहेत. त्यांच्या गैरहजेरीतील या निवडणुकीने वारसदारांचा कस लागणार आहे.

तमिळनाडूच्या समाजकारण आणि राजकारणावर चित्रपटांचा मोठा प्रभाव आहे. चित्रपटाच्या भाषेतच सांगायचे तर, आगामी लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्ष मुख्य, तर भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष सहायक अभिनेत्यांच्या भूमिकेत आहेत. तमिळनाडूत लोकसभेच्या ३९ जागा आहेत. गतनिवडणुकीत, म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत जे. जयललिता यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने (एआयएडीएमके) ३९ पैकी ३७ जागा जिंकून विक्रम प्रस्थापित केला होता. उर्वरित दोन जागांपैकी एक त्यांचा मित्र पक्ष पट्टली मककल काची (पीएमके) आणि दुसरी भाजपने जिंकली होती. २-जी स्पेक्‍ट्रम घोटाळ्यात द्रमुकचे ए. राजा आणि करुणानिधींच्या कन्या कनिमोळी यांची नावे पुढे आली आणि त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्याचाही परिणाम २०१४ च्या निवडणुकीत जाणवला. 

द्रमुक आणि काँग्रेस आघाडीचा तमिळनाडूत पूर्णपणे सफाया झाला होता. भाजप आणि काँग्रेसनंतर अण्णा द्रमुक हा लोकसभेतील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष झाला. मात्र, गेल्या पाच वर्षात तमिळनाडूच्या राजकारणातील दोन उत्तुंग नेते काळाच्या पडद्याआड गेले. अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांचे डिसेंबर २०१६ मध्ये, तर ‘द्रमुक’चे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचे ७ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले. यामुळे अण्णा द्रमुकचा कारभार मुख्यमंत्री ई. के. पलानी स्वामी आणि उपमुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते पनिरसेल्वम; तर द्रमुकचा कारभार फायर ब्रॅंड नेते आणि करुणानिधींचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांच्याकडे आहे. राज्यात सत्ताधारी अण्णा द्रमुकला लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभेच्या २१ जागांच्या पोटनिवडणुकाही महत्त्वाच्या आहेत. जयललितांच्या निधनानंतरच्या सत्तासंघर्षात पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र ठरवलेल्या १८ आमदारांच्या मतदारसंघांत पोटनिवडणुका होत आहेत. शिवाय आमदारांचे निधन आणि अन्य कारणांनी तीन जागा रिक्त आहेत. विधानसभेच्या एकूण २१ जागांपैकी किमान आठ जागा मिळवणे सत्तारूढ अण्णा द्रमुकला आवश्‍यक आहे. आठ आमदार निवडून आले तर अण्णा द्रमुकला २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील आपले सरकार स्थिर ठेवता येणार आहे.दोन्ही आघाड्यांचे जागावाटप पूर्ण झाले आहे. अण्णा द्रमुक ३९ पैकी २७ जागा लढवत असून, त्यांनी ७ जागा ‘पीएमके’ला सोडल्यात. ‘पीएमके’चे उत्तर तमिळनाडूत १५ टक्के, तर संपूर्ण राज्यात ७ टक्के हक्काचे मतदार आहेत. भाजप शहरी भागात पाय रोवण्यासाठी प्रयत्नशील आहे. द्रमुक पक्ष ३९ पैकी २० जागा लढवणार असून, काँग्रेससाठी ९ जागा सोडल्यात. सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके या पक्षांना प्रत्येकी दोन जागा दिल्यात. तर एमडीएमके, आययूएमएल, आयजेके आणि केएमडीके या पक्षांना प्रत्येकी एक जागा ‘द्रमुक’ने सोडली आहे.  

केंद्रात या वेळी भाजप किंवा काँग्रेसला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल एवढे खासदार निवडून येतील का? याबाबत साशंकता आहे. अशा वेळी प्रादेशिक मित्र पक्षांचा आधार बहुमतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल भाजपतर्फे तमिळनाडूतील आघाडीची सूत्रे हलवत आहेत. तमिळनाडूच्या राजकारणात ग्लॅमरचे महत्त्व आहे. म्हणूनच चित्रपट अभिनेते रजनीकांत आणि कमल हसन यांनी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. पण अखेरच्या टप्प्यात या अभिनेत्यांनी आपल्या बाजूने बोलावे, यासाठी दोन्ही राष्ट्रीय पक्षांतर्फे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

२०१४ चे पक्षीय बलाबल
    एकूण जागा ३९
    अण्णा द्रमुक ३७
    भाजप १
    पीएमके १

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com