महात्मा गांधींच्या हत्येची विचारधारा जिंकली: दिग्विजय सिंह

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मे 2019

मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी दिग्विजय सिंह यांचा 3 लाख 64 हजार 822 मतांनी पराभव केला. दिग्विजय सिंह यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.

नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या हत्येची विचारधारा जिंकली आहे आणि देशात महात्मा गांधींची विचारधारा हरली ही सर्वात चिंतेची बाब आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी लोकसभा निवडणूकीच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे.

देशातील प्रतिष्ठेच्या ठरलेल्या भोपाळमधून दिग्विजय सिंह यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पराभवानंतर दिग्विजय सिंह यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, 'महात्मा गांधींच्या हत्येची विचारधारा जिंकली आहे आणि देशात महात्मा गांधींची विचारधारा हरली ही सर्वात चिंतेची बाब आहे. भोपाळच्या विकासासाठी जनतेला जी आश्वासने मी दिली ती पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करेन. पराभवानंतरही भोपाळच्या नागरिकांसोबत राहीन.'

भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावर मोठय़ा मताधिक्याने विजय मिळवला. मध्य प्रदेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून सत्ता हिसकावून घेणाऱ्या काँग्रेसची लोकसभेच्या निवडणुकीत दयनीय अवस्था झाली. राज्यातील 29 पैकी 28 जागांवर भाजपने विजय मिळवला असून, फक्त एका जागा काँग्रेसला मिळाली आहे. छिंदवाडा मतदारसंघातून मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल यांनी काँग्रेससाठी एकमेव विजय मिळवून दिला आहे.

मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी दिग्विजय सिंह यांचा 3 लाख 64 हजार 822 मतांनी पराभव केला. दिग्विजय सिंह यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. संपूर्ण देशाचे लक्ष या मतदार संघावर होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahatma gandhi killer ideology won digvijaya singh lok sabha election madhya pradesh election result