Loksabha 2019: बंगालमध्ये भाजपला यंदा "मोठा रसगुल्ला'- ममता बॅनर्जी

वृत्तसंस्था
शनिवार, 20 एप्रिल 2019

मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाद मिठाईपर्यंत
या निवडणुकीत बंगालमधून भाजपला "मोठा रसगुल्ला'

बालुरघाट/गंगारामपूर (पश्‍चिम बंगाल): पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद आता मिठाईपर्यंत पोचला आहे! या निवडणुकीत बंगालमधून भाजपला "मोठा रसगुल्ला' (शून्य जागा किंवा भोपळा) मिळेल, असा हल्ला दीदींनी आज केला. 

एरव्ही गोडीसाठी प्रसिद्ध असलेल्या रसगुल्ल्याला बंगालमध्ये एक कुत्सित छटाही आहे. परीक्षेत अपयश आलेल्यांच्या संदर्भात तेथे हा शब्द वापरला जातो. 2014 मध्ये भाजपला राज्यात दोन जागा मिळाल्या होत्या, यंदा एकही जागा मिळू देणार नाही, असे ममता म्हणाल्या. बालुरघाट आणि गंगारामपूर येथे झालेल्या प्रचार सभांमध्ये बोलताना त्यांनी हे टीकास्त्र सोडले. बंगाली जनतेच्या दोन्ही हातांत "लाडू' देण्याचे आश्‍वासन मोदींना पाळता आले नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, की राज्यात भाजपचे सरकार आल्यास केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातही भाजप सरकारच्या रूपाने बंगाली जनतेच्या दोन्ही हातांत लाडू मिळतील, असे मोदींनी 2016 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगितले होते; पण काही झाले नाही, असे त्या म्हणाल्या. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला शंभरपेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असे सांगून, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या दक्षिणेकडील राज्यांत भाजपला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशात भाजपला गेल्या वेळी 73 जागा मिळाल्या होत्या, यंदा तेरा तरी मिळतील की नाही, याची शंका आहे. ईशान्य भारत आणि ओडिशात भाजप खातेही उघडू शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला. 

दिल्ली का लड्डू जो खाया वो पछताया. - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्‍चिम बंगाल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mamata Banerjee says BJP will get rosogolla in West Bengal